श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ स्टान्जीन पद्मा: आपल्या सेनेचा ‘स’पोर्टर! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
स्टान्जीन पद्मा: आपल्या सेनेचा ‘स’पोर्टर!
The (sup)porters of the Indian Army !
स्टान्जीन पद्मा सियाचीन ग्लेशियर परिसरातील नुब्रा खोऱ्यातील एका दुर्गम गावात राहतो. या भागातील जीवन अतिशय कष्टाचे आणि जिकीरीचे. तापमान कायमच जवळजवळ शून्याच्या खाली. उदरनिर्वाह करणे खूपच कठीण. पण येथील मूळच्या लोकांना या हवामानाची सवय झालेली असते. यांपैकीच एक तरुण, स्टान्जीन पद्मा. याने सुमारे बारा वर्षे भारतीय सैन्यासाठी भारवाहक म्हणून सेवा बजावताना संकटात सापडलेल्या जवानांचे प्राण वाचवलेले आहेत. शिवाय गिर्यारोहक, सैनिक यांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला अनमोल सहाय्य केले आहे.
१९८४ मध्ये भारतीय सेनेने ‘ऑपरेशन मेघदूत’ हाती घेतले आणि सियाचीन ग्लेशिअर वर वर्चस्व प्रस्थापित केले. या अतिशय धाडसी, रोमांचक आणि शौर्यपूर्ण कामगिरीस या वर्षी एप्रिल मध्ये चाळीस वर्षे पूर्ण झाली. पाकिस्तानी सैन्याने याच ठिकाणी आपल्या आधी पोहोचून त्यांच्या सैन्य चौक्या प्रस्थापित करण्याची गुप्त योजना आखली होती…. पण भारतीय सैन्य त्यांच्या आधी तेथे पोहोचले! तिथे टिकून राहण्यासाठी अत्यावश्यक रसद हवाई मार्गाने पोहोचवली गेली. आणि हजारो सैनिक बर्फातून तीन दिवस-रात्र चालत इच्छित स्थळी पोहोचले. आणि म्हणूनच आज ती सीमा भारतासाठी सुरक्षित करण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे… आणि पाकिस्तान आपल्याकडे पहात थयथयाट करीत बसला आहे… अन्यथा आज चित्र काहीसे वेगळे असले असते. असो.
सियाचीन ग्लेशिअरवर तापमान उणे चाळीस आणि आणखीही खाली जात असते. अशा भयावह, जीवघेण्या हवामानात निव्वळ श्वास घेणे हेच मोठे आव्हान ठरते. तेथील हवामानात हेलीकॉप्टर उडवणे हे अत्यंत धोक्याचे ठरते. पण बरेचदा यातूनच रसद खाली टाकावी लागते, आणि मग ही रसद पाठीवर लादून घेऊन वरपर्यंत पोहोचवावी लागते. काहीवेळा या कामासाठी याक सारख्या प्राण्यांचा वापर केला जातो, पण हे प्राणीसुद्धा या हवामानात फार काळ तग धरू शकत नाहीत, किंवा त्या उंचीवर पोहोचू शकत नाहीत. मग हे वाहतुकीचे काम कोण करणार? जिथे मोकळ्या माणसाला बर्फात एक-एक पाऊल टाकीत पुढे जायला कित्येक तास लागतात, पायांखाली शेकडो फूट बर्फाची दरी असू शकते, शरीराचा कोणताही भाग काही वेळासाठी उघडा राहिला तर हिमदंश होतो, साधा श्वास घ्यायला त्रास होतो तिथे हे काम कोण उत्तम करू शकेल?
सियाचीन परिसरातील निसर्गसुंदर नुब्रा खोऱ्यातील रहिवासी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून हे काम अक्षरश: अंगावर घेतात. पाठीवर सुमारे वीस किलो वजनाचे सामान घेऊन उंच पर्वत चढतात…. सियाचीन येथे बर्फातील चौक्यांवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी खाद्यपदार्थ, इंधन पोहोचवतात…. पिण्यायोग्य पाणी बनविण्यासाठी बर्फ खोदून देतात, डोंगर कड्यांवर पोहोचण्यासाठी शिड्या, दोर लावून देतात. सुमारे बावीस हजार फूट उंचीवर तैनात असलेल्या आपल्या सैनिकांसाठी हे पोर्टर-तरुण खूप महत्वाची भूमिका बजावतात.
बर्फाळ भागात आयुष्य गेल्यामुळे ह्या लोकांना त्या परिसराची, हवामानाच्या लहरीपणाची खूप जवळून ओळख असते. या ठिकाणी वारंवार घडणाऱ्या हिमस्खलनाच्या घटनांत या पोर्टर्सची खूप मोठी मदत होते. काही ठिकाणी तर केवळ दोरीच्याच साहाय्याने पोहोचता येते. आणि यात या लोकांचा हातखंडा आहे.
वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी तर सैनिकाना त्वरीत हलवावे लागते… अशा वेळी हेच पोर्टर्स मदतीला धावून येतात. भारतीय लष्कर या लोकांना सलग नव्वद दिवसच काम देऊ शकते. एरव्ही हे तरुण तेथे येणाऱ्या गिर्यारोहकांचे वाटाडे म्हणून काम करतात.
जेंव्हा पोर्टरचे काम उपलब्ध नसते तेंव्हा जवळच्या शहरात जाऊन हे लोक मिळेल ते काम करतात. आणि पोर्टर म्हणून भरती होण्यासाठी अक्षरश: दोन अडीचशे किलोमीटर्सचे अंतर बर्फातून चालत पार करतात. भरती करून घेताना या लोकांची रीतसर शारीरिक चाचणी, निवड स्पर्धा घेतली जाते. सियाचीन मध्ये सुमारे शंभर लोकांची या कामासाठी निवड केली जाते.
अतिधोकादायक ठिकाणी भारवाहकाचे काम करणाऱ्यास एका दिवसासाठी रुपये ८५७ आणि तळावर काम करण्यासाठी रुपये ६९४ इतका मोबदला दिला जातो. आता या दरांमध्ये बदल झाला असेल. कामाच्या ठिकाणी असलेली हवामानाची आव्हाने, शत्रूपासून असलेला धोका यांमुळे काही भारवाहकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.
एकदा पदमाला आपल्या सेनेच्या अतिउंचीवरील चौकीवर तातडीने अन्नपदार्थ पोहोचवण्याचे आदेश मिळाले. अत्यंत प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता हा गडी स्नो स्कूटर घेऊन निघाला आणि चौकीवर अन्न पोहोचवले. मात्र माघारी येत असताना त्याची स्कूटर नादुरुस्त झाली ती तशीच ठेवून तो पायी खाली निघाला. मात्र धुक्यामुळे पुढचे काही दिसू न शकल्याने एका अत्यंत खोल दरीत कोसळला आणि बेशुद्ध पडला. त्याच्या सुदैवाने सकाळी एक गस्ती पथक त्याला शोधायला येऊ शकले. आणि मोठ्या परीश्रमाने त्याला तिथून बाहेर काढले गेले.
त्याचा एक सहकारी निमा नोर्बु असाच एका दरीत कोसळला होता. त्याच्या सुटकेचे सर्व प्रयत्न विफल झाले होते. पण पदमाने अगदी हट्टाला पेटून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून हेलीकॉप्टरची व्यवस्था करवून घेतली आणि निमाचा ठावठिकाणा शोधून काढला. स्वत: बर्फाच्या खोल दरीत उतरून काही तासांच्या अथक परिश्रमाने निमाला मृत्यूच्या खाईतून सुरक्षित बाहेर काढले… परंतू बर्फदंशामुळे निमाचा एक हात आणि दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत कापावे लागले!
सियाचीन मध्ये सैनिक जेवढे कष्ट, त्रास भोगतात तेवढेच हे आपले स’पोर्टर्स’ ही कष्ट करतात… पण त्यांचे देशप्रेम अतूट आहे.
तांत्रिक कारणामुळे एका भारवाहकास सलग नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस कामावर ठेवता येत नाही. ८९ दिवस भरल्यावर हे तरुण पुन्हा आपल्या गावी परततात, वैद्यकीय तपासणी करून घेतात आणि काही दिवसांनी पुन्हा कामावर येऊ शकतात…
पदमा वर्षातून किमान तीन वेळातरी सियाचीन वर जायचा.. ! लेह मधील जवाहर नवोदय विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या पदमाने आपल्या सहकारी भारवाहकांचा हिशेब ठेवण्याची, त्यांच्या कामाचे नियोजन, पर्यवेक्षण करण्याचीही जबाबदारीही उत्तमरीत्या पार पाडली आहे.
२०१३ मध्ये पाच सैनिक बर्फाखाली गाडले गेले होते. त्यांना वाचवण्यासाठी पाच जणांचे पथक धाडले गेले, त्यात पदमाही होता. पण या बचाव पथकावर एक बर्फाचा कडा कोसळला. या पाचपैकी एक जण केवळ कमरेइतकाच गाडला गेल्याने तो बाहेर पडला आणि त्याने इतरांना बाहेर काढले. आपल्या जीवाची पर्वा न करता हे पाचही जण दुसऱ्या दिवशी पुन्हा बचाव मोहिमेवर गेले आणि त्यांनी दोन सैनिकांचा जीव वाचवण्यात यश मिळवले!
स्टान्जीन पद्मा याला भारताच्या राष्ट्रपती महोदयांनी ‘जीवन रक्षा पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे. भारतीय सैनिकांच्या पाठीशी आणि मागे पुढे उभ्या असणाऱ्या या भारवाहकांचे आभार!
शत्रू या भारवाहकांवर गोळीबार करायला कमी करत नाही. काल परवाच कश्मीरमध्ये दोन पोर्टर्स अतिरेक्यांच्या गोळीबारात मरण पावले. आपल्या देशाच्या सीमा राखायला असे अनेक तरुण कामी येतात…. त्यांच्या प्रती आपण आभारी असायला पाहिजे!
कृपया या शूर, हिम्मतवान, साहसी देशभक्तांविषयीची ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवावी. मी ही माहिती आंतरजालावरून इंग्रजी भाषेतील ‘दी बेटर इंडिया’, ‘द कॅरावान’ अशा स्रोतामधून मिळवली असून भाषांतरित केली आहे..
जय हिंद !
© श्री संभाजी बबन गायके
९८८१२९८२६०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈