सुश्री प्रभा हर्षे
इंद्रधनुष्य
☆ प्रवास पुस्तकाचा… सादर नमन… — हिन्दी लेखक : श्री. प्रदीप शर्मा ☆ भावानुवाद – सुश्री प्रभा हर्षे ☆
एखाद्या पुस्तकाचा प्रवास खरंतर तेव्हा सुरू होतो, जेव्हा एखादा वाचक ते पुस्तक वाचायला सुरुवात करतो. या प्रवासाची सुरुवात कुठूनही कशीही होऊ शकते.. कधी ठरवून तर कधी अचानक… कधी स्टडी रूममधून.. कधी बेडरूम मधून.. तर कधी लायब्ररीमधून. इतकंच नाही तर कधी ऑफिसमध्ये
किंवा कॉलेजमध्ये कुणाच्या लक्षात येऊ न देता.. इतरांचा डोळा चुकवून ! नाहीतर मग ट्रेनच्या लांबच्या प्रवासाच्या साथीने…
आणि पुस्तक वाचण्याची प्रत्येकाची पध्दतही अगदी वेगळी असते. काहीजण फक्त पानं चाळून बघतात, काहीजण फक्त काही पाने वरवर वाचून मजकुराचा अंदाज घेतात.. काहीजण ‘फक्त’ ते पूर्ण वाचतात. आणि अगदी मोजकेच वाचक असे असतात की जे पुस्तक अगदी मनापासून.. चवीने परत परत वाचतात.. ते पूर्ण समजेपर्यंत.. मनाचे समाधान होईपर्यंत वाचतात.!
पुस्तकाची मजा कशी घ्यायची हे खरंच वाळवीकडून शिकावं ! काही जण अगदी ‘ पुस्तकातला किडा ‘ म्हणावेत असे असतात, तर काही जण पुस्तकांवर अगदी मनापासून खूप प्रेम करतात … इतकं प्रेम की त्यांची नसलेली.. इतरांकडची पुस्तकेही त्यांना आपलीच वाटतात.. त्यांच्या घरातल्या पुस्तकांना ते वर्तमान पत्राइतकीच किंमत देतात आणि परक्यांच्या पुस्तकांवर मात्र जणू स्वतःचाच हक्क असल्याचे समजतात.
त्यांना दुसऱ्याची पुस्तके हडप करण्याचा जणू छंदच असतो. पुस्तकप्रेमी माणसांना पुस्तक मागायला लाज वाटता कामा नये, असा एक समज आहे. स्वतः विकत घेतलेल्या पुस्तकांना स्वतःची वैयक्तिक लायब्ररी म्हटले जाते.. मग ती पुस्तके कुणी वाचो किंवा न वाचो. पण चांगल्यातली चांगली आणि महागातली महाग पुस्तके स्वतः विकत घेणे हीच खरं म्हणजे सुशिक्षित आणि बुद्धिजीवी माणसाची ओळख ठरते.
एखाद्याने पुस्तक स्वतः खरेदी केलेलं आहे की दुसऱ्या कुणाकडून मागून आणलंय हे ते पुस्तक स्वतः कधीच कुणाला सांगत नाही. त्याच्या मालकाने त्याला कधी हात तरी लावलाय का हेही रहस्य ते बिचारे पुस्तक कधीच कुणाला सांगत नाही. काही बिचारी दुर्दैवी पुस्तके तर कुणी आजवर हातातही घेतलेली नाहीत हे त्यांच्या चिकटलेल्या पानांवरुन समजते. पण असे ‘ कुमारी ’.. ‘ अछूत ’ पुस्तक जेव्हा एखादा सच्चा पुस्तकप्रेमी हातात घेतो तेव्हा ती चिकटलेली पानं फडफडायला लागतात… जणू त्यांचं भाग्य उजळलेलं असतं.
कुठलंही पुस्तक आकाशातून पडावं इतक्या सहजपणे जन्माला येत नाही. प्रत्येक पुस्तकाच्या जन्माची स्वतःची अशी एक वेगळीच… विशेष अशी कथा असते. प्रत्येक पुस्तक ही कुणाची तरी कलाकृती असते … त्याचाही कुणीतरी रचनाकार असतो … निर्माता असतो. त्या रचनेला कुणी लेखक शब्दरूप देतो आणि त्यालाही ‘ सृजनाची प्रक्रिया ‘ असंच म्हटलं जातं. जेव्हा त्याची ती रचना पुस्तकरूपात प्रकाशित होऊन वाचकांपर्यंत पोहोचते तेव्हा लेखकाच्या अनेक वर्षांच्या तपस्येचं ते फळ असतं.
तो लेखकच त्याच्या रचनेला एक नाव देतो. ‘ हा मुलगा कुणाचा आहे ‘ ही ओळख जशी सांगितली जाते, तशीच ओळख त्या पुस्तकाची असते … ‘ ज्याने लिहिले त्याचे पुस्तक ‘. ‘ छान आहे हे पुस्तक – लेखक कोण आहे ?’ असेच विचारले जाते. ते पुस्तक प्रकाशकाचं नसतं … विकत घेणाऱ्याचं नसतं … आणि वाचकालाही ते वारसाहक्काने मिळालेलं नसतं. ते एका लेखकाचं …त्याच्या मेहनतीचं फळ असतं … त्याने कितीतरी वर्षं पाहिलेलं स्वप्न असतं ते.
प्रत्येक पुस्तक एका सूज्ञ वाचकापर्यंत पोहोचावं हाच त्या पुस्तकाचा अंतिम उद्देश असतो. धनवान लोकांच्या अति महागड्या वस्तूंनी गच्च भरलेल्या शेल्फातल्या त्या वस्तूंप्रमाणे, ती पुस्तकेही पुस्तकांच्या दुकानांची.. ग्रंथालयांची किंवा एखादाच्या घरातल्या पुस्तकाच्या कपाटाची केवळ शोभा वाढवण्यासाठी साठवलेली असू नयेत….. लक्ष्मीला कुठे जखडून ठेवलेले असते ते सगळेच जाणतात.
सरस्वतीचं वाहन आहे ‘हंस‘… आणि नीर क्षीर विवेकाचं प्रतीक अशी त्याची ओळख आहे. पुस्तकं म्हणजे ज्ञानाचं भांडार तर आहेच, पण असंख्य गोष्टी स्वतः आपणहून शिकण्यासाठीचा तो सर्वश्रेष्ठ पर्याय आहे हे ध्यानात ठेवायलाच हवे. … सरस्वतीला कधीच कैदेत जखडून ठेऊन चालणार नाही …. त्यामुळे पुस्तकांचा प्रवास अविरत सुरू रहायला हवा.
एक प्रगल्भ वाचकच कुठल्याही चांगल्या पुस्तकाचे ‘ वाहन ‘ होऊ शकतो …. सरस्वतीच्या हंसासारखा ….
हे वीणावादिनी … असा वर दे … वर दे.. !!
मूळ हिंदी लेखक : श्री. प्रदीप शर्मा
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈