श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “आईशी खोटं बोलणारा सैनिक !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
कान्हा गोपगड्यांसह एखाद्या गवळणीच्या घरात चोरपावलांनी शिरून शिंक्यावर टांगलेलं लोणी फस्त करायचा! गवळणी यशोदेकडे गाऱ्हाणं मांडायच्या… ती बाळकृष्णाचा कान धरायची… पण मेघःश्याम म्हणायचा… ‘मैं नहीं माखन खायो!’ आणि त्या भोळ्या माउलीला तेच खरं वाटायचं… ती उलटून गोपिकांना म्हणायची… ‘तुमची एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी!’
याचीही आई अशीच भोळी यशोदा… पोरगं नुकतंच फौजेत गेलं आहे. काही महिन्यांसाठी त्याला विशेष लढाऊ विभागात पाठवलं गेलं आहे… अतिरेक्यांशी प्रत्यक्ष लढण्याचा अनुभव यावा म्हणून. हा कालावधी लवकरच पूर्ण होणार आहे. तिथून तो माघारी आला रे आला की त्याला चतुर्भुज करण्याचा चंग यशोदेने बांधला आहे.
ती रोज त्याला विडिओ कॉल करून त्याची याची देही याची डोळा ख्यालीखुशाली विचारल्याशिवाय झोपायची नाही.
त्या दिवशीच्या रात्रीही तिने त्याला फोन लावलाच. आधुनिक सोय आहे आणि शक्य आहे तर का नाही बोलायचं लेकाशी? तो बालवर्गात जायचा तेंव्हा ही त्याची शाळा सुटेपर्यंत व्हरांड्यात बसून राहायची शाळेच्या. एकुलता एक, नवसाने झालेला मुलगा तो.. नाव दीपक ठेवलं होतं… कुलदीपक. दोन मुलींच्या पाठीवर झालेला दीपक!
फोन लागला… दीपक बनियान वरच निवांत बसलेला दिसला तिला. नेहमीचा संवाद सुरू झाला मायलेकात.
“दीपक, बेटा, सब ठीक?”
“हां मां, सब ठीक! शांती है!”
“खाना खाया?”
“हां मां!”
आणि असंच बोलणं होत राहिलं… “लवकर सुट्टीवर ये.. तू मामा झाला आहेस… भाचा वाट पाहतोय मामाची! तुझ्या विना घर सुनेसुने वाटते!”
“हां मां.. बस यहाँ का काम पुरा होते ही घर आऊंगा! बस, अब देर हो रही है! तुम सो जावो!”
“और, तुम बेटे? कब सोने जावोगे?”
“बस मां, अभी सोने ही जा रहा था! अच्छा, गुडनाईट!”
कॅप्टन दीपक, राष्ट्रीय रायफल्स. जम्मू – काश्मीर मध्ये तैनात. २०२० मध्ये भरती. वय चोवीस. वडील उत्तराखंड मध्ये पोलिस अधिकारी.
आईशी दीपक विडिओ कॉल वर असताना लांबून स्क्रीनमध्ये डोकावणाऱ्या वडिलांच्या नजरेतून काही गोष्टी सुटायच्या नाहीत! दीपक जरी बनियान घालून बसलेला दिसत असला तरी मागे त्याचे मळलेले बूट दिसताहेत… रायफल टेकवून ठेवलेली असली तरी वापरलेली दिसते बरीच! मागे त्याचे सहकारी थकून भागून बसलेले दिसत आहेत!.. दिपकच्या डोळ्यांत लालसर झाक दिसते आहे आणि आवाजात काहीसा कंप.
दीपक खोटं बोलतोय आईशी! दिवसभर मोहिमेवर होता… आणि आज रात्रीही निघायची तयारी सुरू आहे… आणि आईला म्हणतोय… झोपायला निघालो आहे!
दिपकच्या वडिलांनी पोलिसातून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. ते आपल्या मुलाला पुरते ओळखून आहेत… दीपक धाडसी आहे, पुढे होऊन नेतृत्व करणारा आहे. स्वतः प्रयत्न करून सैनिक अधिकारी झाला आहे. काश्मीर मध्ये गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानी अतिरेक्यांची घुसखोरी वाढली आहे.. काही सैनिक व अधिकाऱ्यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे.
दीपकचे वडील टीव्हीवर काश्मिरच्या बातम्या लागल्या की टीव्ही बंद करून टाकायचे दीपकची आई खोलीत आली की!
त्याच रात्री कॅप्टन दीपक अतिरेकीविरोधी शोध आणि नाश मोहिमेवर गेला… अतिरेक्यांना शोधले… पुढे होऊन एका अतिरेक्याच्या मेंदूत चार गोळ्या डागल्या… पण बदल्यात आपल्या छातीवर तीन गोळ्या झेलल्या… आणि तरीही लढत राहिला… मोहिमेचे नेतृत्व करीत राहिला!
साथीदारांनी इस्पितळात पोहचवले…. रात्री आईला सांगितल्याप्रमाणे झोपी गेला… कायमचा! एका कुळाचा एक कुलदीपक विझून गेला!
रात्रंदिन युद्धाचा प्रसंग आहे काश्मिरात. या काळोखात जीव तळहातावर घेऊन तरुण कोवळे अधिकारी, जवान मृत्युला आव्हान देत असतात! त्यांना तुमचे आशीर्वाद पाहिजेत!
स्वातंत्र्यदिनाच्या आधल्या रात्री कॅप्टन दीपक सिंग हुतात्मा झाले ! भावपूर्ण श्रद्धांजली !
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈