श्री जगदीश काबरे
इंद्रधनुष्य
☆ “मकर संक्रांत आणि खगोलशास्त्र…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे सूर्याच्या मागील अवकाशाची पार्श्वभूमी बदलते आणि सूर्य वेगवेगळ्या नक्षत्रांमधून जात असल्याचे दिसते. संपूर्ण चक्र 12 भागांमध्ये विभागले गेले आहे ज्याला राशिचक्र म्हणून ओळखले जाते आणि ज्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. त्या दिवशी मकर संक्रमण होते. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताना, सूर्याच्या पार्श्वभूमीवर राशीचक्र बदलत असताना पृथ्वीच्या अक्षाचा कल सारखाच राहतो. परंतु, त्यामुळे एक गोलार्ध सूर्यासमोर सहा महिने आणि दुसरा सहा महिने सूर्याच्या मागे राहतो. यामुळे पृथ्वीवरील सूर्यकिरणांचा कोन सतत बदलत राहतो आणि सूर्य सहा महिने उत्तरेकडे आणि सहा महिने दक्षिणेकडे फिरल्याचा आभास देतो. यालाच भौगोलिक भाषेत उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात. मकर संक्रांतीत सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. कारण सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीनंतर, उत्तर गोलार्धात सूर्य उत्तरेकडे जाऊ लागतो आणि हिवाळा कमी होऊ लागतो. भारतासह उत्तर गोलार्धात उन्हाळा वाढू लागतो. हे 21 जूनपर्यंत होते, त्यानंतर सूर्याचे दक्षिणायन सुरू होते.
मकर संक्रांतीनंतर दिवस मोठे होतात आणि रात्री लहान होतात, उत्तर गोलार्धात 14-15 जानेवारीपर्यंत सूर्यास्ताची वेळ हळूहळू पुढे सरकते. त्यानंतर 21 मार्च ही तारीख येते, जेव्हा दिवस आणि रात्र अगदी समान असतात त्याला इक्विनॉक्स म्हणतात. याचा अर्थ सूर्य जवळजवळ उत्तर गोलार्धाच्या मध्यभागी असतो. सूर्यास्ताच्या वेळेत हळूहळू बदल होणे म्हणजे हिवाळा कमी होतो, त्यानंतर उन्हाळा वाढायला सुरुवात होते. कारण सूर्य उत्तर गोलार्धात जास्त काळ राहणार असतो.
सूर्याभोवती पृथ्वी फिरते हे सर्वज्ञात आहे, पण पृथ्वीवरून पाहताना पृथ्वीभोवती सूर्य फिरतो असं भासतं. याला सूर्याचं भासमान भ्रमण असं म्हणतात. सूर्य उगवताना ज्या तारकासमूहांच्या पार्श्वभूमीवर तो दिसतो ती जागादेखील रोज बदलते. एक-दोन दिवसांमध्ये सूर्याच्या स्थानातला बदल फार लक्षणीय नसतो. पण महिन्याभरात ही जागा अगदी निश्चितपणे बदललेली दिसते. आणि वर्षभरानंतर सूर्य पुन्हा नेमक्या त्याच तारकासमूहाच्या पार्श्वभूमीवर नेमक्या त्याच जागी दिसू लागतो. या तारखासमूहांना त्यांच्या आकारावरून जी नावे दिली गेली त्यांनाच आपण राशी म्हणतो. थोडक्यात, वर्षभरात सूर्य या विविध तारकासमूहांमधून भ्रमण करतो आहे असं भासतं म्हणजेच सूर्य विविध राशीमधून प्रवास करत असतो. वर्षभरात सूर्याच्या या भासमान भ्रमणाचा जो मार्ग त्याला ‘क्रांतिवृत्त’ असं म्हणतात.
या क्रांतिवृत्तावर सूर्याचं नेमकं स्थान कसं सांगायचं? मग त्यासाठी या क्रांतिवृत्ताचे बारा भाग पाडले आहेत. या बारा भागांना नावं देणं आलं. त्या प्रत्येक भागात दिसणाऱ्या तारकासमूहातले तारे काल्पनिक रेषांनी जोडले (हे म्हणजे लहानपणी ‘बिंदू जोडून आकृती तयार करा’ असा खेळ असायचा तसंच झालं!) तर तयार होणाऱ्या आकृतीचं पृथ्वीवरच्या विविध गोष्टींशी साधर्म्य आहे असं लक्षात आलं आणि नावांचा प्रश्न सुटला. मग ज्या तारकासमूहातली आकृती मगरीसारखी दिसत होती त्याला नाव दिलं मकर रास, वगैरे वगैरे. अनेकांना असं वाटतं की, राशींनी या अथांग अंतराळाचे बारा भाग केले आहेत. तसं मुळीच नाही. राशी या केवळ सूर्याच्या भासमान भ्रमणमार्गाचे भाग आहेत. आणि सूर्याचा भासमान भ्रमणमार्ग हा या अथांग अंतराळावर मारलेला एक छोटासा काल्पनिक पट्टा आहे.
वैज्ञानिकदृष्ट्या बोलायचे झाले तर सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात खरे तर 21 डिसेंबर होते, जेव्हा सूर्य दक्षिणायन संपवून उत्तरेकडे सरकायला लागतो. परंतु, भारत आणि उत्तर ध्रुवाच्या दरम्यान असलेल्या देशांमध्ये हा प्रभाव मकर संक्रांतीच्या दिवशी अधिक प्रभावी मानला जातो. ती तारीख 14 किंवा 15 जानेवारी असते. सध्या हा फरक 24 दिवसांचा आहे. तसेच दर वर्षीचा नऊ मिनिटे दहा सेकंद हा काळ साठत साठत जाऊन दर 157 वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो. दर 1500 वर्षांनी पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या अक्षात होणाऱ्या बदलामुळे हा फरक दिसून येतो. आजपासून 1200 वर्षांनंतर ही तारीख बदलून फेब्रुवारी महिन्यात येईल. 2001 ते 2007 पर्यंत 14 जानेवारीला मकर संक्रांत येत होती. पण 2008 मध्ये 14 जानेवारीला 12. 07 मिनिटांनी संक्रांत आली, त्यामुळे संक्रांतीचा सण त्याच वर्षी 15 जानेवारीला झाला. दरवर्षी ही वेळ 6 तास 9 मिनिटांनी पुढे सरकते आणि चार वर्षांत ती 24 तास 36 मिनिटांनी पुढे सरकते. परंतु, लीप वर्षामुळे ती 24 तासांनी मागे सरकते म्हणजेच दर चार वर्षांनी ती 36 मिनिटांनी पुढे सरकते. काही वर्षांत संक्रांतीची तारीख पुढे सरकते. सन 2009 ते 2012 पर्यंत संक्रांतीचा दिवस 14-14-15-15 होता. हे चक्र 2048 पर्यंत चालू राहील, त्यानंतर ते 14-15-15-15 असेल. नंतर 2089 पासून ते 15-15-15 -15 होईल. हे दर 40 वर्षांनी होईल. परंतु, 2100 हे वर्ष लीप वर्ष असूनही, 400 ने भागल्यास लीप वर्ष मानले जाणार नाही, कारण ग्रेगरियन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास चारशेनी भाग जात नसेल, तर त्या वर्षी लीप वर्ष धरले जात नाही. त्यामुळे दर चारशे वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस तीन दिवसांनी पुढे जातो. म्हणून 2100 ते 2104 पर्यंत संक्रांतीच्या तारखा 16-16-16-16 अशा असतील.
सामान्यतः भारतातील सर्व सण हे चंद्राच्या चक्रानुसार असतात, त्यामुळे इंग्रजी दिनदर्शिकेनुसार त्यांच्या तारखा दरवर्षी बदलतात. म्हणूनच होळी, दिवाळीसारखे सण वेगवेगळ्या तारखांना येतात. परंतु मकर संक्रांती हा एकमेव सण आहे, जो सूर्याच्या भासामान भ्रमाणावर आधारित असतो. इंग्रजी कॅलेंडर देखील सूर्याच्या यात गतीवर आधारित आहे. म्हणून मकर संक्रांत दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला सध्या येते.
© जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
माहिती पूर्ण लेख.