श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “भारतीय सेनेतील योद्धा धन्वंतरी… – भाग – ३” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
(खरंच तसंच झालं होतं…. त्याच्या डोक्याला एक गोळी चाटून गेली होती ! डॉक्टरसाहेबांनी त्याला धीर नसता दिला तर तो कदाचित घाबरल्याने आणखीन गंभीर झाला असता !) – इथून पुढे —
दुसरी रात्र… पुन्हा एक चढाई.. आज आणखी एक शिखर काबीज करायचे होते…. जाताना एक सैनिक म्हणाला… ”जा रहा हूं साहब. ” त्यावर डॉक्टर साहेब सहज म्हणाले होते… ”देखो, जा तो रहे हो… लेकीन जीत के ही वापस आना!” तासाभरात तोच सैनिक जखमी होऊन उपचारासाठी परत आला! प्रचंड गोळीबारात त्याच्या कमरेला गोळी लागली होती… पण कमरेला बांधलेल्या गोळ्यांच्या सहा मॅगझीन (गोळ्या ठेवण्यासाठीची व्यवस्था) पैकी एका मॅगझीन मधल्या एका स्प्रिंगमध्ये ती गोळी अडकून बसली… हा बचावला! दुसरी गोळी डाव्या खांद्याला लागली…. हा उजव्या हाताने लढला… मग उजव्या हातालाही गोळी लागली… नाईलाज झाला! “साहब, मुझे पैरोंसे फायरींग सिखाई गयी होती तो मैं पैरोंसे भी लडता! लेकीन वापस नहीं आता… आप मुझे ठीक कर दो.. मै फिरसे जाना चाहता हूं लडने के लिये!”
एका सैनिकाच्या तर नाकात गोळी घुसली होती… त्याचे नाकच नाहीसे झाले होते… पण निष्णात डॉक्टर राजेश यांनी त्यालाही वाचवले… आता तो माजी सैनिक व्यवस्थित आहे.
हे एवढे देशप्रेम, एवढी हिंमत सैनिकांच्या मनात येते तरी कुठून हा प्रश्न तर अजूनही अनुत्तरीत आहे डॉक्टरांच्या मनातला. पण यातून एक निश्चित होते.. ते म्हणजे आपल्या देशाला अशा सैनिकांची वानवा नाही… आणि असणारही नाही!
आपल्या महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यात एक गांव आहे.. आष्टी नावाचे. या गावाला शहीद आष्टी म्हणून इतिहासात ओळख आहे… १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात या गावातील पाच नागरीकांनी महाराष्ट्रात सर्वांत प्रथम प्राणांची आहुती दिली होती म्हणून हे गाव शहीद अर्थात हुतात्मा आष्टी! येथे एक हुतात्मा स्मारक उभारले गेले आहे. राजेश यांचा जन्म याच गावातला. वडील वामनराव डॉक्टर तर आईचे नाव कुमुदिनी. त्यांची शाळा या स्मारकामध्ये दरवर्षी स्वातंत्र्य दिनी विशेष कार्यक्रम करीत असे. या कार्यक्रमात देशभक्तीपर गीते गायली जात… शाळकरी राजेश या गाण्यांच्या वाद्यवृंदामध्ये बासरी वाजवणा-या मुलांच्या पहिल्या रांगेत असत. तिथूनच त्यांच्यावर देशप्रेमाचे संस्कार झाले. राजेश यांनी पुढे उत्तम शिक्षण घेऊन डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजात एम. बी. बी. एस. साठी प्रवेश मिळवला आणि डॉक्टर झाले! समाजासाठी काही तरी उत्तुंग करण्याची त्यांची मनोमन इच्छा होती. आपण आय. ए. एस. अधिकारी व्हावं, ग्रामीण भागात जनतेची प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून सेवा करावी, असे त्यांच्या मनाने घेतले आणि ते घरी न सांगता थेट दिल्लीला पळून गेले… तेथे त्यांनी आय. ए. एस. होण्यासाठीच्या प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला. दिल्लीत राहण्याची सोय नव्हती म्हणून खासदार महोदयांच्या निवासस्थानी मुक्काम केला. यु. पी. एस. सी. ची तयारी करीत असताना काही पैसे कमवावेत म्हणून त्यांनी तिथल्या सफदरजंग रुग्णालयात डॉक्टर म्हणून तात्पुरती नोकरी स्वीकारली.. दिवसातील जवळजवळ वीस तास ते डॉक्टर म्हणून सेवा बजावत. त्यातच त्यांच्या एका वरिष्ठ सहकारी डॉक्टरांनी त्यांना लष्करी डॉक्टर होण्याचा सल्ला दिला… आणि तीन हजार उमेदवारांमधून डॉक्टर राजेश आढाव पहिल्या साडेतीनशे मध्ये निवडले गेले. पहिलेच जबाबदारी मिळाली ती जम्मू-कश्मीर मध्ये तैनात असलेल्या १३, जम्मू & काश्मीर रायफल्सचे वैद्यकीय अधिकारी म्हणून. सुमारे आठशे ते हजार सैनिक-अधिकारी यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे काम! लवकरच डॉक्टर राजेश या कामांत रुळले… सैनिकी गणवेश अंगावर चढताच त्यांच्यातील देशभक्त, समाजसेवक पूर्ण जागा झाला!
जवान राजेश यांना डॉक्टर देवता म्हणून संबोधत असत. त्यांनी उपचार केले तर रुग्ण निश्चित जगतो.. असे ते मानीत असत. आणि ते खरे ही होते.. कारगिल लढाईत त्यांनी ९७ जवान आणि अधिकारी यांचे प्राण वाचवण्यात मोठी भूमिका बजावली. त्यासाठी त्यांना विशेष सन्मान देण्यात आला!
सैनिकांचा खूप विश्वास त्यांनी कमावला होता. लढाईच्या काळात…. उंच पहाडावर असलेल्या सैनिकांना जेवण पोहोचवले जायचे. पहाटे बनवलेले खाद्यपदार्थ पहाडावर पोहचेपर्यंत खूप उशीर व्हायचा. एकदा भात दही असा बेत होता. तेथील वातावरणामुळे त्या भातावर असलेल्या दह्यावर एक वेगळाच थर दिसू लागला. जवानाना वाटले की दही खराब झाले… खायचे कसे? यावेळी डॉक्टर राजेश यांनी स्वत: ते दही खाल्ले… आणि म्हणाले… ”अगर मुझे आधे घंटे तक कुछ नहीं होता है.. तो यह दही खाने लायक है ऐसा समझो… ! ते पाहून ते भुकेलेले सर्वजण दही भातावर तुटून पडले! जवान मजेने म्हणायचे यह डॉक्टर साहब तो जादू टोना के डॉक्टर है!
एल. ओ. सी. कारगिल चित्रपटात मिलिंद गुणाजी यांनी डॉक्टर राजेश यांची भूमिका केली होती. विक्रम बात्रा साहेबांच्या जीवनावर आधारीत चित्रपटातही डॉक्टर राजेश यांची भूमिका दाखवली गेली आहे.
कर्नल डॉक्टर राजेश आढाव यांच्या पत्नी दिपाली या प्रसिद्ध डॉक्टर आहेत. कारगिल मधून परतल्यावर 2 डिसेंबर २००१ रोजी डॉक्टर साहेब दिपाली यांचेशी विवाहबद्ध झाले… आणि तेरा दिवसांनी कर्तव्यावर पोहोचले… ऑपरेशन पराक्रम मध्ये भाग घेण्यासाठी!
त्यांचे चिरंजीव ओम एम. बी. बी. एस. चा अभ्यास करत आहे. ओम लहान असताना जेंव्हा राजेश साहेबांच्या कारगिलच्या कहाण्या ऐकायचा… तेंव्हा त्याला त्या ख-या वाटत नसत… पण तो मोठा झाला आणि त्याला आपल्या पित्याची महान कामगिरी माहीत झाली!
कारगिल लढाईत एका डॉक्टर साहेबांना गोळी लागून ते हुतात्मा झाल्याची बातमी पसरली होती. ही बातमी घेऊन जेंव्हा बातमीदार डॉक्टर राजेश यांच्या घरी पोहोचले तेंव्हा यांच्या मातोश्री यांनी दिलेले उत्तर मोठे मार्मिक होते… त्या म्हणाल्या… आम्ही दूध विकतो.. त्यात मी कधी एक थेंब पाणी मिसळले नाही… माझ्या मुलाला असे काही होणारच नाही! आणि त्यांचे शब्द खरे झाले… डॉक्टर साहेब सुखरूप होते… बातमी अर्धवट होती… राजेश यांना बॉम्बमधील धारदार splinter लागून त्यांना जखम झाली होती! दुधात थेंबभरही पाणी न घालणे याचाच अर्थ पूर्ण प्रामाणिक व्यवहार! यातून संस्कारही दिसतात!
कारगिल युद्धावेळी captain असलले डॉक्टर राजेश पुढे कर्नल पदावर पोहचले… त्यांना सेना मेडल दिले गेले. अशी कामगिरी करणा-या मोजक्या आर्मी डॉक्टर्समध्ये राजेश साहेबांचा समावेश आहे.
पुढे कोरोना काळातही डॉक्टर राजेश यांनी सैन्याची काळजी यशस्वीरीत्या घेतली. त्याबद्दल त्यांचे कौतुकही झाले.
२९ जानेवारी, २०२५… आफ्रिकेतील कांगो येथून एक बातमी आली… संयुक्त राष्ट्र शांतीसेनेत तिथल्या लष्करी रुग्णालयाचे प्रमुख कर्नल डॉक्टर राजेश आढाव यांच्या निवासस्थानाच्या कुंपणावर एक नव्हे तर दोन RPG अर्थात Rocket Propelled Grenade म्हणजे रॉकेटवर बसवून डागला जाणारा हातगोळा पडला! पण सुदैवाने राजेश साहेब केवळ दहा सेकंद आधीच तिथून बाहेर पडले होते! त्यांचे आई-वडील, पत्नी यांची पुण्याई थोर आहे.. हेच खरे!
काल ६ फेब्रुवारी रोजी कर्नल डॉक्टर राजेश आढाव साहेबांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त माहिती घेऊन हा लेख लिहिला आहे. यात चुका तर असतीलच. पण डॉक्टर साहेबांचा पराक्रम अधिक लोकांना माहीत व्हावा… म्हणून हे धाडस केले आहे. विविध मुलाखाती, बातम्या पहिल्या… आणि किंचित लेखन स्वातंत्र्य घेऊन, कोणाचीही परवानगी न घेता लिहिले आहे.. क्षमस्व! पण माझी भावना प्रामाणिक आहे! कर्नल डॉक्टर राजेश अढाऊ (Adhau असे spelling लिहिले जाते बऱ्याच ठिकाणी) यांच्यावर एक छान चित्रपट निघावा.. ही इच्छा आहे. किमान नव्या पिढीला आपल्या बहाद्दर माणसाची माहिती तर होईल. जयहिंद.
Happy Birthday, Colonel साहेब !
– समाप्त –
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मातृभूमि चे असे हे शूरवीर देवतुल्य पुत्र अमर असो। आपण खूपच महत्वाची माहिती पुरवली, आभार। 🙏🌹🇮🇳🇮🇳