डाॅ. मीना श्रीवास्तव
इंद्रधनुष्य
☆ ‘कृतीला गतिमान करा…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव
(आंतरराष्ट्रीय महिला दिवस- ८ मार्च २०२५ या निमित्ताने)
नमस्कार प्रिय मैत्रांनो!
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः।।”
(अर्थ- जेथे स्त्रियांची पूजा केली जाते, अर्थात त्यांना मान दिला जातो, तेथे देवता आनंदपूर्वक निवास करतात. जेथे त्यांची पूजा होत नाही, अर्थात त्यांचा मान राखला जात नाही तेथील सर्व चांगली कर्मे देखील निष्फळ होतात. ) या ओळी आपण सर्वजण प्राचीन काळापासून वाचत आणि ऐकत आलो आहोत. हा श्लोक चिरंतन आहे, अर्थपूर्ण आहे अन म्हणूनच आजच्या काळात देखील तितकाच महत्वाचा आहे.
८ मार्च या अंतर्राष्ट्रीय महिला दिनानिमित्य अभिनंदन आणि शुभेच्छा! या सर्वांनाच लागू होतात. कारण आजचा काळ असा आहे की पुरुषांची म्हणून लेबल लावलेली कामे महिला बिनधास्तपणे करतात, तर या उलट स्त्रियांची पारंपारिक कामे कधी कधी पुरुषमंडळी अगदी निगुतीने करतात. (या साठी पुरावा म्हणून मास्टर शेफचे एपिसोड आहेतच).
मंडळी महिला दिनाचा इतिहास थोडक्यात सांगते. अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ संपूर्ण जगातील स्त्रियांना २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. १९०७ साली स्टटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यात क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे. ‘ अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यू यॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड निदर्शने केली. त्यात दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या प्रमुख मागण्या होत्या. सोबतच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक स्तरावर समानता आणि सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क हे देखील मुद्दे होते. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ रोजी या अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा क्लाराने मांडलेला ठराव मंजूर झाला. नंतर युरोप, अमेरिका आणि इतर देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून इंग्लंड येथे १९१८ साली आणि अमेरिकेत १९१९ साली या मागण्यांना यश मिळाले. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्री संघटनांना बळकटी आली. जसजसे बदलत्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.
या निमित्याने मी एक आठवण शेअर करीत आहे. प्रवासात असतांना त्या त्या प्रदेशातल्या स्त्रिया कशा वागतात, त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य कितपत विकसित आहे, हे मी उत्सुकता म्हणून बघत असे. साधारण २००३ चा काळ होता. (मैत्रांनो, हा काळ जवळपास २२ वर्षे जुना) मी केरळ येथे फिरायला गेले होते, देवभूमीचा हा सुंदर प्रवास रम्य अशा हिरवाईतून करीत होते. नारळांच्या वृक्षांच्या रांगा अन लगत समुद्राचे निळेशार पाणी (समुद्र कुठला ते विचारू नका प्लीज) बसमधून अतिशय रमणीय असे विहंगम दृश्य दिसत होते. बस कंडक्टर एक मुलगी होती, विशीतली असावी असे मला वाटले. अत्यंत आत्मविश्वासाने ती आपले काम करीत होती. बस मध्ये फक्त महिलांसाठी असे समोरचे २-३ बेंच आरक्षित होते. त्यावर तसे स्पष्ट लिहिले होते. कांही तरुण त्यावर बसले होते. एका स्टॉपवर कांही स्त्रिया बसमध्ये चढल्या. नियमानुसार त्या राखीव जागांवरून तरुणांनी उठून जायला हवे होते. त्यांनी तसे केले नाही. त्या स्त्रिया उभ्याच होत्या. तेवढ्यात ती कंडक्टर आली आणि मल्याळम भाषेत त्या तरुणांना जागा रिकामी करा असे तिने सांगितले, मात्र ते तरुण हसत होते आणि तसेच बसले होते. मी आता बघितले की, ती रोडकीशी मुलगी रागाने लाल झाली. तिने त्यांच्यापैकी एकाची कॉलर पकडली अन त्याला जबरदस्तीने उभे केले. बाकीचे तरुण आपोआप उठले. तिने नम्रपणे त्या स्त्रियांना बसायला जागा करून दिली, अन जणू कांही झालेच नाही असे दाखवत आपले काम करू लागली.
मैत्रांनो मला आपल्या ‘जय महाराष्ट्राची’ आठवण आली. असे वाटले की इथं काय झाले असते? तिथल्या साक्षरतेचे प्रमाण १०० टक्के! (तेव्हां आणि आत्ताही) मी २०२२ साली मेघालयाचा प्रवास केला, त्यातील प्रामुख्याने जी गोष्ट मला जाणवली ती सर्वांगाने दृश्यमान होणारे स्त्री स्वातंत्र्य. तेथे देखील या स्त्री स्वातंत्र्यसूर्याच्या उदयाला कारणीभूत आहे स्त्रियांची संपूर्ण साक्षरता आणि मत्रीसत्ताक पद्धतीमुळे गावलेली आर्थिक सुबत्ता! याच्या परिणामस्वरूप तेथे स्त्री शक्तीचे अद्भुत रूप मी ठायी ठायी अनुभवले.
मतदानाचा हक्क महत्त्वाचाच मंडळी, पण त्या योगे स्त्री स्वतंत्र झाली असे समजायचे कां? तो तर दर पाच वर्षांनी मिळणारा अधिकार आहे. स्त्रीला घरात आपले मत मांडण्याचा अधिकार आहे का? बरे, मांडले तरी ते विचारात घेतल्या जाते कां? हे सुद्धा बघायला नको कां? अगदी साडी खरेदी करायची असेल तर आर्थिक स्वातंत्र्य आहे कां, अन ते असले तरी स्वतःच्या पसंतीची साडी घेता येते कां? मंडळी प्रश्न साधा आहे पण उत्तर तितके सोपे आहे कां? ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी’ हे शब्द अजूनही जिवंत कां आहेत? १९५० साली आलेल्या ‘बाळा जो जो रे’ या सिनेमातील ग दि माडगूळकरांची ही रचना आज देखील सत्याशी निगडित कां वाटावी? जिथं स्त्रीला देवीच्या रूपात पुजल्या जाते तिथे तिची अशी अवस्था कां व्हावी?
यंदाच्या युनायटेड नेशन्सच्या आंतरराष्ट्रीय महिला दिवस ८ मार्च २०२५ साठी “Accelerate Action” अर्थात “कृतीला गती द्या” हा विषय निवडण्यात आला आहे. याचा मुख्य उद्देश महिलांना पुरुषांबरोबर समान दर्जा देण्याच्या प्रक्रियेला गतिमान करणे होय. ही थीम सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये महिलांना येणाऱ्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करण्यासोबतच त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ठोस पावले उचलण्यावर भर देते. म्ह्नणजेच केवळ चर्चा करण्याएवजी आता महिलांचे अधिकार सुनिश्चित करण्यासाठी निश्चितपणे परिणाम साधणारी प्रभावी पावले उचलण्याची गरज आहे. याअंतर्गत महिलांसाठी विशिष्ट योजना लागू करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरुन महिलांना रोजगार आणि निर्णय घेण्याची क्षमता मिळेल. (यात लाडकी बहीण सारख्या योजनेचे प्रयोजन नसावे, अशी इच्छा! ) स्त्रीचे समाजातील दुय्यम स्थान यावर सामाजिक विचारमंथन होणे आवश्यक आहे. भलेही संविधानात नमूद केल्याप्रमाणे कुठल्याही स्तरावर लिंगभेद नसावा हे स्पष्ट आहे, पण त्याची अंमलबजावणी करणे हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.
मला या दिनाविषयी इतकेच वाटते की स्त्रीला देवी म्हणून मखरात बसवू नये तसेच तिला ‘पायाची दासी’ देखील बनवू नये. पुरुषाइतकाच तिचा समाजात मान असावा. ‘चूल आणि मूल’ या सेवाभावाकरता सकल आयुष्य खर्ची घालणाऱ्या स्त्रीचे सामाजिक स्थान अत्यंत महत्वाचे आहे आणि ते सर्वमान्य व्हावे. तिच्या भावभावना, बुद्धी आणि विचारांचा सदोदित सन्मान झाला पाहिजे. खरे पाहिलॆ तर हे साध्य करण्यासाठी ८ मार्चचाच नवसाचा दिवस नसावा तर ‘प्रत्येक दिवस माझा’ असे समस्त महिलावर्गाने समजावे. त्यासाठी पुरुषमंडळींकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घ्यायची गरज असू नये. असा निकोप अन निरोगी सुदिन केव्हां येणार?
“Human rights are women’s rights, and women’s rights are human rights.” – Hillary Clinton.
(“मानवी हक्क हे स्त्रियांचे हक्क आहेत आणि स्त्रियांचे हक्क हे मानवी हक्क आहेत. “- हिलरी क्लिंटन)
(या निमित्ताने तुराज लिखित शंकरमहादेवन यांनी गायलेले Womens Anthem हे स्फूर्तिदायक गाणे आपल्याला नक्कीच आवडेल.
© डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा