श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “‘दैवतीकरण’ साहजिकच!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
११ मार्च २०२५… ३३६ वर्षे उलटून गेली छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानाला. ११ मार्च १६८९ ते ११ मार्च २०२५ … या काळात स्वधर्मासाठी एवढा प्रचंड त्याग आणि वेदनांशी लढा इतर कोणाच्याही इतिहासात आढळून येत नाही!
शारीरिक छळाची वर्णने शब्दांत वाचून सहृदय माणसाच्या मनावर जेवढा परिणाम होतो, त्यापेक्षा ती अभिनित दृश्ये पाहताना होतो तो परिणाम अपरिमेय असतो. छावा चित्रपटातील शेवटची दृश्ये पडद्यावर पाहून जवळपास सर्वच प्रेक्षक नि:शब्द होतात, हे त्याचेच द्योतक म्हणावे लागेल.
क्रूरकर्मा औरंगजेब खरे तर छत्रपती संभाजी महाराजांचे प्राण एका वारामध्ये घेऊ शकला असता. पण त्याने त्यांच्या मृत्यूचा उपयोग उभ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर त्याच्या वाटेत येऊ पाहणा-या प्रत्येकाच्या मनात कायमची धडकी भरवण्यासाठी केला… हे सर्वश्रुत आहे! पण त्याचे हे मनसुबे पूर्ण झाले नाहीत… हा इतिहास आहे! अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जीभा… हा या मराठी मातीचा बाणा आहे!
आपल्यापेक्षा सामर्थ्यवान असलेल्या व्यक्तींना सन्मान देण्याची मानवी सहजवृत्ती आहे. किंबहुना अवघ्या प्राणिसृष्टीमध्ये ही वृत्ती आढळून येते. मानवाने त्याच्यापेक्षा सामर्थ्यवानांस देव ही पदवी देण्याची रीत दिसून येते. राजाला भूदेव अर्थात पृथ्वीवरचा देवाचा अवतार किंवा देवच मानले जाते, हे आपण पाहू शकतो.
अखंड स्मरणीय थोरले छत्रपती श्री शिवाजी महाराज साहेब आणि धाकलं धनी अखंड स्मरणीय श्री संभाजी महाराज साहेब यांना रयतेने आपल्या मनातल्या गाभा-यात देवाचे स्थान दिले आहे, हे कोण नाकारू शकतो?
महापुरुषांना देवत्व देऊन त्यांना गाभा-यात बसवणे, त्यांची पूजा करणे, आरती करणे याला विचारवंत माणसांचा आक्षेप आहे. या महापुरुषांच्या विचारांचा, मार्गदर्शनाचा विसर पाडून घेऊन त्याच्या विरुद्ध कृती करणे इथपर्यंत हा आक्षेप योग्यच आहे. पण, या ‘देवांच्या’ विचारांवर चालणारी माणसं जर यांना देवत्व बहाल करत असतील, तर त्यांच्या भावना दुखावण्याचा अधिकार कुणाला कसा प्राप्त होतो, हा प्रश्न आहे.
प्रभू श्रीराम, प्रभू श्रीकृष्ण यांचे देवत्व मान्य करून त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन जीवन व्यतीत करणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे समाजाचे कल्याणच झाले आहे. अर्थात, देवत्वाचे स्तोम माजवून त्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक प्राप्ती करून घेऊन आपले ऐहिक जीवन सुखमय करणारे लोकसुद्धा आहेत, हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल… पण त्याला काही इलाज नाही. आपण केवळ आक्षेप नोंदवू शकतो… तोही तशी सोय असेल तर!
आधी सामान्य माणसे म्हणून दृष्टीस पडलेले महात्मे पुढे मठात, मंदिरांतल्या गाभा-यांत विराजमान झालेच की. त्यांच्या आरत्या, स्तोत्रे, ग्रंथ निर्माण झालेच की. त्यांच्यामागे खूप मोठा समुदाय असून ते अनेक लोकोपयोगी कामे सिद्ध करतात, हे ही खरेच आहे. आणि याला आक्षेप असण्याचे कारण नाही.
गेली कित्येक वर्षे श्री संभाजी महाराज बलिदान मास पाळणारी, उपवास करणारी, विशिष्ट अन्न त्यागणारी, पादत्राणे न घालणारी हजारो माणसे आहेत. काही ठिकाणी मंदिरे सुद्धा निर्माण झाली आहेत. ‘जय देव जय देव जय श्री शिवराया’ ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेली आरती आहेच. यातून सामान्य लोकांच्या मनात धर्मप्रेम, राष्ट्रप्रेम जागृत होत असेल तर याचे स्वागतच करायला पाहिजे. मराठी सैनिक जेंव्हा युद्धात ‘ बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय…’ अशी गर्जना करत देशाच्या रक्षणासाठी प्राणार्पण करतात त्यामागे ही देवत्वाचीच भूमिका असते.
केवळ देव मानून थांबू नका…. त्यांच्या देवत्वाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा… हे सांगणे वेगळे आणि देवत्व देऊ नका! हे सांगणे वेगळे.
शेवटी, समाजात सामान्य लोक बहुसंख्येने आहेत हे मान्य करून त्यांच्या भावनांना यथायोग्य मान देत देत काही सुधारणा सुचवता आल्या तर जरूर तसे करावे.. पण सरसकट ‘नको’ हा विचार टिकणारा नसल्याने त्याज्य आहे!
मी चार वर्षांपूर्वी छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत एक आरती लिहिण्याचा असफल प्रयत्न केला होता. जमेल तसा युट्यूब विडीओ तयार करून प्रसिद्ध केला होता. यात श्री आशुतोष मुंगळे या गायकाने आवाज दिला आहे. ते शब्द संदर्भासाठी इथे देत आहे. यातूनही कुणी योग्य ती प्रेरणा घेऊ शकते!
☆ श्री छत्रपती संभाजी महाराज यांना शब्दवंदना ….आरती! ☆
काव्य लेखन :- श्री संभाजी बबन गायके.
गायन:-आशुतोष मुंगळे
☆
आरती ओवाळू शिवसूत श्री शंभू राया
मुजरा स्वीकारावा तुमच्या वंदितो पाया…
शालिवाहन शक पंधराशे एकोणऐंशी वर्ष
मराठी मातीला बहु जाहला हर्ष…
द्वादशी शुद्ध मास शोभला ज्येष्ठ
देहासी आले श्री शंभू नरश्रेष्ठ …
पुरंदराच्या हृदयी मावेना माया…
*
शिवरायांच्या सईबाईंची उजवली कूस
घडवण्या समशेर सज्ज सह्याद्री मूस…
युवराजांच्या कंठी शोभे कवड्यांची माळ
शिवगंधाने सजले भव्य रुंद ते भाळ…
जिजाऊ आतुरल्या शंभू बाळा पहावया…
*
उधळला चौखूर शंभू रायांचा अश्व
रोमांचित झाले अवघे मराठी विश्व…
लढता शंभू भासे जैसा कोपला रुद्र
भेदी चक्रव्युहा अभिमन्यू सौभद्र…
भगवा विजयी गगनी पहा लागे फडकाया…
*
आत्मसात करुनी शास्त्र भाषांचे ज्ञान
सभेत पंडितांच्या शंभू शोभे विद्वान…
रयतेचा राजा घेई न्यायाचा पक्ष
शिवरायांचा छावा शंभू प्रजाहित दक्ष…
सिंहाची गर्जना शत्रू लागे कांपाया…
*
अवचित काळोखाने सूर्य झाकोनिया गेला…
उजेड अंधाराने खोल पाताळी नेला…
झुकली ना दृष्टी विझल्या नयनांच्या ज्योती
हर हर महादेव थेंब रक्ताचे गाती…
मृत्यू गहिवरला येता शंभुशी न्याया…
*
आरती ओवाळू शिवसूत श्री शंभू राया…
मुजरा स्वीकारावा तुमच्या वंदितो पाया!…
☆
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈