डॉ. ज्योती गोडबोले
इंद्रधनुष्य
☆ ‘महाकुंभ धार्मिक ते इव्हेंटचा ताळमेळ…‘ – लेखिका : सुश्री स्वाती महाजन जोशी ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆
☆
महाकुंभची चर्चा गेली तीन चार महिने सुरू होती. मुळात जास्त गर्दीत जाण्याची अजिबात आवड नसलेली मी प्रयागराजला जाण्याचा विचारही केला नव्हता. लांबून बघू. वेगवेगळ्या वाहिन्यावरून आनंद लुटण्याचे ठरविले होते. फार धार्मिक नसल्याने तेही पुरेसे होते. पण पण पण खर सांगायचे तर माझ्यातला पूर्वीचा पत्रकार जागा झाला. एवढे लोक का जातात, आणि नक्की काय वातावरण असते हे बघण्याची उत्सुकता निर्माण झाली. आणि एका ग्रुपवर कल्पनाने विचारले महाकुंभला जायला कोणी तयार आहे का? लगेच होकार कळवला. बघता बघता दहाजणी तयार झाल्या. पण काही कारणाने फक्त चारजणी निघालो. आम्ही जात असलेल्या तारखा या आमच्या पथ्यावर होत्या.
आम्ही ज्या दिवशी पोहोचणार होतो, त्याच दिवशी महाकुंभत पंतप्रधान मोदी येणार होते. काय परिस्थिती असेल याची काहीच कल्पना नव्हती. आम्ही सेक्टर १० मध्ये संस्कार भारतीच्या तंबूत होतो. तिथे अजिबात गर्दी नव्हती. त्या भागातील गंगा मैय्याचा किनारा मोकळा होता. आम्ही मनसोक्त गंगामैय्येत डुंबलो. अरे काहीच गर्दी नाही, उगाचच लोक घाबरवत होते, असे वाटून गेले. दुपारी बाहेर पडलो. नदीच्या दोन किनाऱ्यावर महाकुंभचे शहर पसरलेले आहे.
आमच्या भागात विविध संस्थांचे मंडप होते. नेत्र कुंभ, अमृतानंदमयी, रावेतसरकार असे विविध प्रवचनकार, सेवाभावी संस्था तसेच विविध राज्यांचे मंडप होते. मुख्यतः सांस्कृतिक आणि इव्हेंट असे या भागात होते. तर सर्व आखाडे दुसऱ्या किनाऱ्यावर होते. हे सर्व बघत प्रयाग शहरात आलो, तेव्हा गर्दीचा अंदाज आला. तरीही वाहनांना प्रवेश देण्याइतके रस्ते रिकामे होते. आम्ही चौघीही खूष होतो. आपले त्रिवेणी संगमावरचे स्नान सहज होईल. पण गंगा मैय्याच्या मनात जे असते तेच होते, अशी श्रद्धा प्रयागच्या नागरिकांमध्ये असते. त्याचे प्रत्यंतर आम्हाला आले. ६ फेब्रुवारीला प्रयागमध्ये लोकांचा समुद्र बघायला मिळाला. पण स्नान करायचेच या जिद्दीने आम्ही चालत राहिलो. किती चाललो माहित नाही. असेल १२-१४ किलोमीटर. मग खूप प्रतीक्षेनंतर स्नान झाले. संगमात उतरल्यावर मन शांतावले. सर्व क्षीण नाहीसा झाला. मन काही क्षणापुरते निर्विकार झाले. मग परतीचा प्रवास तेवढ्याच चालण्याने झाला. महाकुंभात सर्वजण समतल पातळीवर आल्याची जाणीव सुखावून जात होती. गाडीघोडा, पैसा काही उपयोगाचा नाही हे येथील गर्दी सांगून जात होती.
सुव्यवस्थेचा -स्वच्छतेचा कुंभ
या सर्व प्रवासात आम्हाला जाणवले ते खरंच शब्दांत मांडणे अवघड आहे. दिड महिन्याच्या काळात ४५ कोटी लोक येणार त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्याइतके अवघड होते. पण प्रयागराजला गेल्यावर तिथल्या यंत्रणेने हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे हे लक्षात आले. गंगा मैय्याच्या पूरक्षेत्रात पूर्ण शहर सर्व सुविधांसह उभारण्यात आले आहे. गंगा मैय्या सप्टेंबर पर्यंत तिथे मुक्काम ठोकून होती. ती आपल्या जागेवर परतल्यावर कामे सुरू झाली, असे स्थानिक सांगत होते. म्हणजे फक्त साडेतीन महिन्यांत अगदी वीजपुरवठ्यासाठीची यंत्रणा, मलनिःसारणाची सोय, पाणीपुरवठ्याच्या वाहिन्या सर्व उभारण्यात आल्या. प्रत्येक संस्थेला जागा ठरवून देण्यात आल्या. त्यावर मंडप, तंबू टाकण्याची आणि शौचालये उभारण्याची जबाबदारी संस्थांवर होती. पूरक्षेत्र असल्यामुळे सगळीकडे वाळूच वाळू. त्यावर सर्व रचना उभारली आहे. शौचालयाची प्लास्टिकची भांडी त्यात रोवण्यात आली आहेत. सर्व मैला एकत्र करण्यासाठी मोठ्या टाक्या जमिनीच्या खाली बसवल्या आहेत. दर दोन दिवसांनी त्या साफ करायला राज्य सरकारची मलनिःसारणाची गाडी येते. रस्त्यावर जागोजाग तात्पुरती शौचालये आहेत. पण ना त्यातून घाण बाहेर येते ना पाणी ना दुर्गंधी. साफ करणाऱ्यासाठी नेमलेले सेवक तत्परतेने काम करत होते. रस्त्यावर अगदी क्वचित कचरा दिसत होता.
श्रद्धेचा-मानवतेचा कुंभ
महाकुंभात येणाऱ्या भाविकांना खूप संस्था सेवा देत आहेत. प्रसाद म्हणून चहा, पाण्याच्या बाटल्या, नाश्ता वाटप सुरू आहे. इस्कॅानने तर लाखो लोकांना जेवण देण्याची सोय केली होती. महाप्रसादाच्या लाईनीमध्ये खूप तरूण मुलं-मुली उभी दिसली. ही मुले कोण हा प्रश्न मनात येतच होता तेवढ्यात रिक्षाचालकाने सांगितले की हे सर्व प्रयागमध्ये बाहेरून शिकायला आलेले विद्यार्थी आहेत. बहुतेकांचे पालक शेतकरी किंवा शेतमजूर आहेत. गेल्या महिन्यापासून त्यांचा दोन वेळच्या जेवणाचे पैसे वाचले आहेत. अगदी सहजतेने मिळालेल्या माहितीने मनात येऊन गेले अरे हा श्रद्धेबरोबरच मानवतेचा कुंभ आहे. सर्वांच्या हातात स्टीलच्या एकसारख्या थाळ्या होत्या. जेवण झाले की प्रत्येक जण त्या धुवून पुढच्या भाविकाच्या हातात देतात, हेही रिक्षाचालकाने सांगितले.
गंगा मैय्याचे प्रेम
महाकुंभ नसताना किती श्रद्धाळू येतात, असे रिक्षाचालकाला विचारले. गंगा मैय्येच्या कृपेने पोटापुरता धंदा होतो. पावसाळ्यात मात्र गंगा मैय्या उग्र रूप धारण करते. ती माझ्या घराच्या पायरीपर्यत येते. कधी तीन कधी चार-पाच दिवस राहते आणि मग निघून जाते, हे रिक्षाचालक सांगत असतानाच मला कुसुमाग्रजांच्या मोडला नाही कणा या कवितेची आठवण झाली. गंगा मैय्येवर येथील लोकांच्या अपार श्रद्धा आहे.
.. तशीच भक्ती लड्डू गोपालवर आहे. आपण रोज जे जे करतो तसाच दिनक्रम ते लड्डू गोपालचा पाळतात. कुठेही जाताना गोपाल बरोबर असतोच. त्याला एकट्या घरी कसे ठेवायचे ही त्यामागची भावना. कुंभातही अनेकांच्या लड्डू गोपालची बास्केट होती. माझ्या परीघातील कोणीच एवढे श्रद्धावान नाही, त्यामुळे मी हे पाहून अचंबित झाले.
एकदंर हा महाकुंभ जितका साधू-संतांचा-भाविकांचा आहे. तितकाच तो स्वच्छता कर्मचारी आणि पोलिस यंत्रणेचाही आहे. माणसाच्या समुद्राला नम्रतेने शिस्तीत बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या या यंत्रणेला खरंच सलाम करावासा वाटला. माताजी- बहेनजी- भैय्याजी- स्वामीजी म्हणत वर्दळ सुरळीत ठेवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न खरंच सुखावून जात होता.
आम्ही चारचौघीच होतो. फक्त महिला म्हणून कुठेच कसलाच त्रास झाला नाही. अगदी लखनौवरून रात्री २ वा. प्रवास सुरू करायलाही आम्हाला भीती वाटली नाही. हा महाकुंभचा परिणाम की तेथील राज्य सरकारबाबत असलेला विश्वास सांगता येत नाही पण चार दिवसात कधीच कसलीच भीती वाटली नाही हे मात्र खरं.
– – – अतिगर्दीचे, वाहतूक कोंडींचे व्हिडिओ येत आहेत, ते खोटे आहेत असे म्हणणे चुकीचे ठरेल. पण यंत्रणेच्या मर्यादा लक्षात घेतल्या तर परिस्थिती पुढे तेही शरणागत आहे. महाकुंभाचा धडा म्हणजे गंगा मैय्येच्या मनात असेल तर स्नान घडले. तिला शरण जा ती तुम्हाला आशिर्वाद देईलच.
☆
लेखिका : सुश्री स्वाती महाजन जोशी
प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈