श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ इंद्रधनुष्य  ☆ स्थलांतरभाग १ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

जेव्हा मोठ्या प्रमाणात प्राणी एका ठिकाणाहून दुसर्‍या  ठिकाणी जातात, तेव्हा आपण म्हणतो, ते स्थलांतर करतात आणि त्या प्रवासाला स्थलांतर असे म्हणतात. आपली मूळची जागा सोडून ते काही काळापुरते दुसर्‍या या ठिकाणी जातात. काहींच्या बाबतीत स्थलांतर हा खूप लांबचा प्रवास असतो, तर काहींच्या बाबतीत तो जवळचा असतो.

स्थलांतर कशा प्रकारचं?

काही प्राणी एकाच मार्गाने, एक रेशीय स्थलांतर करतात. इतर काही वर्तुळाकार प्रवास करतात. म्हणजे ते स्थलांतर करतात आणि काही काळानंतर पुन्हा आपल्या पहिल्या घरी परत येतात. काही प्राणी स्थलांतर करतात. तिथे आपल्या छोट्या बाळांना जन्म देतात आणि मरतात. नंतर त्यांची आपत्यं, त्यांच्या मूळ जागी एकटीच परततात.

कोणत्या प्रकारचे प्राणी कुठे कुठे स्थलांतर करतात

प्राणी विविध प्रकारांनी स्थलांतर करतात. बेडूक अंडी घालायच्या वेळी नद्या, तळी वगैरे पाण्याचे स्त्रोत असलेल्या जागी स्थलांतर करतात. रॉबीन उत्तरेकडून दक्षिणेकडे येतात. सालमन समुद्राच्या पाण्यातून पोहत पोहत नदीच्या गोड्या पाण्यात येतात. विशिष्ट प्रकारच्या फुलपाखरांचा थवा वर्षातील विशिष्ट काळात ठरावीक ठिकाणी जातो.

प्राणी स्थलांतर का करतात?

एकाच ठिकाणी न राहता प्राणी स्थलांतर का करतात?  प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांनी त्याची अनेक कारणे शोधून काढली आहेत.

१. थंड हवेपासून दूर जाण्यासाठी

२. काही प्राणी दुसर्‍या जोडीदाराबरोबर एकत्र येऊन नवीन आपत्यांना जन्म देण्यासाठी

३ .काही जण आपल्या अन्नाच्या शोधात

४. काही जण आपल्या घरात गर्दी होऊ नये म्हणून.

स्थलांतर कसं, केव्हा करायचं हे प्राण्यांना कसं कळतं?

आपण काळ आणि वेळ बघण्यासाठी कॅलेंडर आणि घड्याळाचा उपयोग करतो. पण प्राण्यांना कसं कळतं, की आता स्थलांतराची वेळ झाली आहे? शास्त्रज्ञांना असं वाटतं, की दिवसाचा काळ,  हे प्राण्यांचे कॅलेंडर असावे. दिवसाचा प्रकाश कमी जास्त होणं,  ही त्यांच्यासाठी खूण असावी. काहींसाठी तापमानातला फरक ही खूण असावी.

स्थलांतर कुठे, कसं करायचं, हे प्राण्यांना कसं माहीत होतं?

स्थलांतर करताना पक्षी आपल्या प्रवासात काही परिचित खुणांकडे लक्ष ठेवतात. उदा. नद्या किंवा समुद्र किनारे. सूर्य, तारे यांचाही मार्गदर्शक म्हणून ते उपयोग करतात पण इतर प्राण्यांचं काय?  ती कशाचा उपयोग करतात? आपल्याला माहीत नाही, पण स्थलांतर ही त्यांच्या आयुष्यातली आश्चर्यकारक आणि अद्भुत अशी गोष्ट आहे.

मोनार्क जातीच्या फुलपाखरांचं स्थलांतर

काही प्रकारची स्थलांतरे सहजपणे लक्षात येतात. पानगळीच्या सुरुवातीच्या काळात आपल्याला मोनार्क  जातीच्या फुलपाखरांच्या लांबच लांब ओळी दिसतात. दक्षिणेकडे ती उडत जातात. त्यांच्यापैकी काही तर ३२०० कि. मीचा प्रवास करतात. ते त्यांचा हिवाळा कॅलिफोर्निया किंवा मेक्सिकोच्या गल्फच्या भागात व्यतीत करतात. ते विशिष्ट झाडांच्या फांद्यांवर गोळा होतात. फूटभरच्या अंतरात शंभर शंभर फुलपाखरे बसलेली शास्त्रज्ञांना आढळली आहेत. इतक्या मोठ्या संख्येने एकत्र गोळा झालेली फुलपाखरे बघितल्यावर त्या झाडाला जसा फुलपाखरांचाच बहर आल्यासारखे दिसते.

वसंत ऋतू आला, की मोनार्क फुलपाखरे आपला उत्तरेकडचा परतीचा प्रवास चालू करतात. वाटेत फुलपाखरांच्या माद्या अंडी घालतात आणि मरून जातात. जेव्हा अंडी फुटतात, तेव्हा नवजात फुलपाखरे आपला उत्तरेकडचा प्रवास चालू करतात. पुढच्या पानगळीच्या काळात आपल्या आई -वडलांप्रमाणे ती पुन्हा दक्षिणेकडे येतात. आई-वडील ज्या झाडावर बसले होते, त्याच झाडावर तीही बसतात.

क्रमश:…

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments