श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“मृत्यूमुखातील ते पंधरा दिवस ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्यांना त्याच्यावर संशय होताच… पण त्यांच्या संशयाबाबतच ते काहीसे साशंक होते! कारण तो तर त्यांच्यासारखाच.. नखशिखांत अतिरेकी. भारतीय सैनिकांच्या रक्ताची तहान असलेला नवतरुण. त्याच्या भावाचा इंडियन आर्मीच्या गोळ्यांनी खात्मा झाला होता म्हणून त्याचा त्याला सूड उगवायचा होता. त्याच्याकडे हल्ल्याची संपूर्ण योजना कागदावर आणि डोक्यात अगदी तयार होती. कुणाचाही या योजनेवर विश्वास बसावा अशी ती योजना होती. भारतीय सैनिकांचा तळ नेमका कुठे आहे, तिथे एकावेळी किती सैनिक असतात, शस्त्रास्त्रे कोणती वापरली जातात… त्यांच्या गस्तीचे मार्ग कोणते इ. इ. सारी माहिती नकाशांसह अगदी अद्ययावत होती. फक्त योग्य वेळ साधून हल्ला चढवायचा अवकाश…. निदान त्यावेळे पुरती का होईना… भारतीय सेना हादरून जावी! पण या कामासाठी त्याला आणखी मदत हवी होती. म्हणून त्याने या दोघांना भेटण्याचा गेली दोन वर्षे प्रयत्न चालवला होता. शेकडो खब-यांच्या माध्यमातून या दोघांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला होता… आणि आता कुठे त्यात त्याला यश आले होते! हे दोघे होते पाकिस्तानी हिज्बुल मुजाहिदीन नावाच्या कुप्रसिद्ध अतिरेकी संघटनेचे कमांडर… अबू तोरारा आणि अबू सब्झार. या दोघांनी अनेक अतिरेकी कारवाया करून अनेकांचे बळी घेतले होते आणि शेकडो काश्मिरी तरुणांना अतिरेकाच्या मार्गावर ओढले होते. त्याची आणि या दोघांची भेट झाली आणि त्याच्या चेह-यावर एक निराळाच आनंद पसरला… मक्सद सामने था! त्यांना वाटले आणखी एक बळीचा बकरा गवसला.. याला तर भडकावण्याची गरज नाही… याच्या डोक्यात तर भारताविषयी पुरेपूर द्वेष भरलेला आहे आधीच. त्यांनी त्याचे स्वागत केले. तो त्यांच्यासमवेत डोंगरात, जंगलात लपून राहिला. भारतीय सैनिक आपला नेमका कुठे शोध घेत आहेत, हे त्याला पक्के ठाऊक होते. त्यांच्या हाती लागू नये, म्हणून त्याने या आपल्या नव्या दोस्तांना उत्तम मार्गदर्शनही केले. त्यामुळे तो त्यांच्या आणखी मर्जीत बसला.

इफ्तेखार… त्याच्या या नव्या नावाचा अर्थच मुळी होता महिमा! अर्थात कर्तृत्वातून प्राप्त होणारे महात्म्य.. मोठेपणा! हे नाव स्वीकारून त्याला फार तर आठ पंधरा दिवस झाले असतील नसतील… पण या अल्पावधीत त्याने त्याचे कुल, त्याचा देश आणि त्याच्या गणवेशात असणाऱ्या आणि येऊ पाहणाऱ्या लाखो लोकांच्या मनात कायम आदराचे स्थान मिळेल अशी कामगिरी केली. त्याचे पाळण्यातलं नाव मोहित… म्हणजे मन मोजणारा श्रीकृष्ण. तो होताच तसा राजस.. खेळकर आणि खोडकर.

खेळात प्रवीण आणि अभ्यासात हुशार. घराण्यात सैनिकी सेवेची तशी कोणतीही ठळक परंपरा नसताना या पोराने घरी सुतराम कल्पना न देता सैन्याधिकारी सेवेत प्रवेश करण्यासाठीचा अर्ज भरला.. परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाला. तोपर्यंत घरच्यांनी त्याला दिल्लीतून थेट महाराष्ट्रात श्री गजानन महाराजांच्या शेगाव नगरीत असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात धाडून दिले होते. वर्ष होते १९९५. सैन्याधिकारी पदासाठी होणार असलेल्या मुलाखतीचे पत्र त्याच्या घरच्यांच्या हाती पडले.. पण त्यांनी त्याला काहीही कळवलं नाही! पोराने सरळ आपलं इंजिनिअर व्हावं आणि आपली म्हातारपणाची काठी व्हावं असा त्यांचा उद्देश असावा. पण आपण परीक्षा तर दिली आहे.. उत्तीर्ण तर होणारच असा त्याला इतका विश्वास होता की त्याने थेट संबंधित कार्यालयात दूरध्वनी करून निकालाची माहिती मिळवली… भोपाळ येथे होणार असलेल्या मुलाखतीसाठी त्याला बोलावणं आलं होतं. श्री संत गजानन महाराज इंजीनियरिंग कॉलेजातून बेडविस्तर गुंडाळून साहेब थेट घरी आले. आणि तेथून भोपाळची रेल्वे पकडली. आपल्या आत्मविश्वासपूर्ण वागण्या बोलण्याने त्याने मुलाखतीत बाजी मारली. त्याला पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश मिळाला होता… एक उमदा प्रशिक्षणार्थी सज्ज होता. एन. डी. ए. मधली कारकिर्द तर एकदम उत्तम झाली. घरी चिंटू असलेला मोहित इथे ‘माईक’ बनला! मोहित यांनी बॉक्सिंग, स्विमिंग, हॉर्स रायडिंग मध्ये सर्वोत्कृष्ट पातळी गाठली. नर्मविनोदी स्वभाव आणि दिलदार असल्याने मोहित एन. डी. ए. मध्ये मित्रांचे लाडके बनले होते.

एन. डी. ए. दीक्षान्त समारंभात देशसेवेतील प्रथम पग पार करून मोहित शर्मा आपल्या अंतिम ध्येयाकडे निघाले. इंडियन मिलिटरी अकादमी मध्ये दाखल होताच मोहित यांनी आपले नेतृत्वगुण विकसित करायला आरंभ केला. त्यांना Battalion Cadet Adjutant हा सन्मान प्राप्त झाला. तत्कालीन राष्ट्रपती महामहीम श्री. के. आर. नारायनन साहेबांना भेटण्याची संधीही त्यांना प्राप्त झाली होती. इथले प्रशिक्षण पूर्ण करून साहेब सेनेत दाखल झाले.

मोहित हे १९९९ मध्ये लेफ्टनंट मोहित शर्मा म्हणून हैदराबाद येथील ५, मद्रास मध्ये दाखल झाले. येथील कार्यकाळ यशस्वी झाल्यानंतर मोहित साहेब पुढे ३३, राष्ट्रीय रायफल्स मध्ये कर्तव्यावर गेले. तेथेही त्यांनी चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडशन अर्थात सेनाप्रमुखांचे प्रशस्तीपत्र पटकावले… एक उत्तम अधिकारी आकार घेत होता!

अतिरेकी विरोधी मोहिमेत त्यांना स्पेशल फोर्सेस सोबत काम करायची संधी मिळाली आणि ते त्या कामावर मोहित झाले… तिथे प्रत्यक्ष कारवाई करण्याची जास्त संधी होती… त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी स्पेशल फोर्सेस मध्ये प्रवेश मिळवून अतिशय आव्हानात्मक Para Commando पात्रता प्राप्त केली. वर्ष २००४ उजाडले. काश्मीर खो-यात पाकिस्तानी अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी आता समोरासमोरची लढाई उपयोगाची नव्हती… गनिमी कावा करावा लागणार होता. यासाठी सेनेने मोहित यांना पसंती दिली. मोहित साहेबांनी दाढी, केस वाढवले. काश्मिरी, हिंदी भाषा तर त्यांना अवगत होत्याच. अतिरेक्यांची बोलीभाषा त्यांनी आत्मसात केली. खब-यांचे जाळे विणले गेले. अतिशय संयमाने परिस्थिती हाताळत यांनी त्या दोघांचा अर्थात तोरारा आणि सब्झारचा माग काढलाच… आणि मेजर मोहित शर्मा भूमिगत होऊन इफ्तेखार भट बनून अतिरेक्यांच्या गोटात सामील झाले… कुणाला संशय येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होतीच… पण जीव मात्र धोक्यात होता…. किंचित जरी संशय आला असता तर गाठ मृत्यूशी होती. अबू तोरारा आणि अबू सब्झार यांनी या त्यांच्या नव्या शिष्याची इफ्तेखार बट ची योजना समजावून घेतली आणि तयारीसाठी ते तिघे भारत-पाक ताबा रेषेच्या पार, पाकिस्तानात गेले. तिथून सारी सूत्र हलवायची होती. त्यादिवशीची सायंकाळ झाली आणि काहवा (काश्मिरी चहा) पिण्याची वेळसुद्धा. इफ्तेखार त्यांच्यात ज्युनिअर. त्यानेच चहा बनवणे अपेक्षित असल्याने त्याने तीन कप कहावा बनवला आणि ते तीन कप घेऊन तो या दोघांच्या समोर गेला. थंडी मरणाची असल्याने इफ्तेखारने अंगभर शाल लपेटली होती. अबू तोरारा याने इफ्तेखारकडे रोखून पाहिले… भारतीय सेनेची इतकी सविस्तर माहिती याला आहे यात त्याला काहीतरी काळेबेरे वाटत होते… त्याने थेट विचारले… तुम कौन हो असल में? हा एकच प्रश्न जीवन आणि मरणाची सीमारेषा ओलांडणार होता.. इफ्तेखारणे तोराराच्या डोळ्याला थेट नजर भिडवली… कितनी बार बताना पडेगा? अगर यकीन न होता हो तो उठा लो अपनी रायफल और मुझे खतम कर दो! असं म्हणत त्याने त्याच्या खांद्यावर लटकवलेली एके ४७ खाली आपटली. या त्याच्या बेबाक उत्तरावर ते दोघेही सटपटले! आपला संशय खोटा निघाला आणि या गड्याला राग आला तर एवढी मोठी मोहीम रद्द करावी लागेल.. पाकिस्तानी मालक नाराज होतील, अशी भीती त्यांना वाटणे साहजिकच होते! त्या दोघांनी कहावा चे कप उचलले आणि ते मागे वळण्याच्या बेतात असताना काहीसे बेसावध होते.. त्यांच्या खांद्यांवर एके ४७ होत्याच…. त्या खाली घेऊन झाडायला त्यांना काही सेकंद लागले असतेच… ही संधी गमवाली तर पुन्हा कधी मिळेल ते सांगता येणार नाही… इफ्तेखार याने विचार केला…. क्षणार्धात आपल्या शालीखाली कमरेला लावलेले पिस्टल बाहेर काढले… ते आधीच लोड होते… आणि para commando चे प्रशिक्षण प्रत्यक्ष व्यवहारात वापरून दाखवले… दोन गोळ्या छाताडात आणि एक डोक्यात.. अचूक. काही सेकंदात दोन अतिशय खतरनाक अतिरेकी त्यांच्या शेवटच्या प्रवासाला निघून गेले! इफ्तेखार निवांतपणे तिथल्या बाजेवर बसले… कहावा संपवला. आणि रात्र होण्याची वाट पाहू लागले… त्यांनी भारतीय सेनेच्या इतिहासातील एक आगळेवेगळे अभियान यशस्वी पार पाडले होते! रात्रीच्या अंधारात हे इफ्तेकार भारतीय सीमेमध्ये सुखरूप परतले. या त्यांच्या अजोड कामगिरीबद्दल सेनेने त्यांचा विशेष सन्मान केला. दोन मोठे अतिरेकी गमावल्यावर आणि ते अशा रीतीने गमावल्यावर पाकिस्तानी हिजबुल मुजाहिदीन पुरते हादरून गेले होते… यह इंडियन आर्मी है! ही घोषणा त्यांच्या कानांमध्ये खूप दिवस घुमत राहिली. आणि इकडे अवघ्या भारतीय सेनेते आनंदाची एक लाट पसरली होती. मेजर मोहित शर्मा यांची ही कामगिरी न भूतो अशीच होती. मोहित साहेबांना यासाठी सेना मेडल देण्यात आले.

ते जेंव्हा सुट्टीवर घरी पोहोचले तेंव्हा रेल्वे स्टेशनवर त्यांना उतरून घ्यायला आलेले त्यांचे बंधू आणि आई-वडील त्यांना ओळखू शकले नव्हते… एवढा एखाद्या अतिरेक्यासारखा त्यांचा शारीरिक अवतार झाला होता!

पुढे त्यांची बदली बेळगावच्या आर्मी कमांडो ट्रेनिंग सेंटर मध्ये कमांडो इंन्स्ट्रक्टर म्हणून झाली… एवढ्या कमी सेवाकाळात या पदावर पोहोचणे एक मोठी बाब होती. दरम्यानच्या काळात रीशिमा यांचेशी मोहित विवाहबद्ध झाले. रीशिमा त्या वेळी आर्मी सप्लाय कोअर मध्ये कार्यरत होत्या. त्यांचे वडील, भाऊ हे सैन्यात आहेत.

२००८ मध्ये अतिरेक्यांनी पुन्हा डोके वर काढले. एकावेळी सुमारे दहा अतिरेकी भारतात घुसल्याची खबर आपल्या सुरक्षा दलांना मिळाली. त्यांच्याविरोधात तातडीने ऑपरेशन हाती घेणे गरजेचे होते. अशावेळी अनुभवी अधिका-याची आवश्यकता ओळखून सैन्याने मेजर मोहित साहेबांना काश्मिरात बोलावणे धाडले. प्रत्यक्ष रणभूमीवर मोहित साहेब जास्त रमत असत. त्यांच्यासाठी ही तर एक चांगली बातमी होती. सेनेची योजना आकार घेत होती. मोहित साहेबांच्या पुतणीचा वाढदिवस आणि अशाच काही कारणासाठी साहेबांना घरी जाण्यासाठी रजा मंजुर झाली होती. पण त्याच वेळी त्यांच्या एका कनिष्ठ अधिका-याच्या भावाचा अपघाती मृत्यू ओढवला. पण मोहीम अगदी तातडीने हाती घेण्याची वेळ असल्याने त्या कनिष्ठ अधिका-याची रजा मंजूर होण्यात समस्या आली. ही बाबत मेजर मोहित यांना समजताच त्यांनी स्वत:ची रजा रद्द करून त्या कनिष्ठ अधिका-यास रजा मिळेल अशी तजवीज केली आणि स्वत: मोहिमेवर निघाले.

उत्तर काश्मीर खो-यातील कुपवारा सेक्टरमधील हापरुडा जंगलात दहा अतिरेकी टिपायचे आहेत… कामगिरी ठरली… मेजर साहेबांनी आपली सैन्य तुकडी सज्ज केली. योजना आखून त्या सैनिकांची वेगवेगळ्या तुकड्यांत विभागणी केली आणि स्वत: नेतृत्व करीत रात्रीच्या अंधारात ते त्या जंगलात शिरले. अतिरेकी मोक्याच्या जागा धरून लपून बसले होते. तरीही मेजर साहेब पुढे घुसले… रात्रीचे बारा वाजले असावेत. त्यांच्यावर अचानक अंदाधुंद गोळीबार सुरु झाला. अतिरेकी शस्त्रसज्ज होते. साहेबांसोबतचे चार कमांडो गंभीर जखमी झाले. साहेबांनी गोळीबार अंगावर झेलत दोन जखमी सैनिकांना तेथून सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यांनी हातगोळे फेकत आणि अचूक गोळीबार करीत दोन अतिरेक्यांना यमसदनी धाडले. परंतू अतिरेक्यांच्या गोळ्यांनी त्यांच्या शरीराचा वेध घेतला होता. पण मेजर साहेबांनी जखमांकडे साफ दुर्लक्ष केले आणि ते अतिरेक्यांच्यावर चालून गेले. उरलेले आठ अतिरेकी गोळीबार करीत होतेच… साहेबांनी त्यांना सामोरे जात त्यांच्यावर हल्ला चढवला… साहेबांच्या शरीरावर बुलेट प्रुफ jacket होते, परंतू हे jacket फक्त पुढून आणि मागून सुरक्षितता देते… त्याच्या बाजूच्या भागांतून गोळ्या आत शिरल्याने ते जबर जखमी झाले होते. पण त्यांनी गोळीबार सुरूच ठेवला… आपल्या इतर साथीदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी आपली जागा सोडली नाही. एक जवान rocket डागण्याच्या तयारीत असताना त्याच्या हाताला गोळी लागल्याने त्याचा हात निकामी झाला. मोहित साहेबांनी कवर फायर घेत तिथपर्यंत पोहोचून ते rocket फायर केले. त्यामुळे अतिरेकी पुढे येऊ शकले नाहीत. यात खूप वेळ गेला… छातीत गोळ्या घुसलेल्या असतानाही साहेबांनी आणखी अतिरेक्यांचा खात्मा केला… आणि मगच देह ठेवला. त्यांच्यासोबत हवालदार संजय भाकरे (1 PARA SF, SM), हवालदार संजय सिंग (1 PARA SF, SM),

हवालदार अनिल कुमार (1 PARA SF, SM), पॅराट्रूपर शबीर अहमद मलिक (1 PARA SF, KC) आणि पॅराट्रूपर नटेर सिंग (1 PARA SF, SM) हे देशाच्या कामी आले. या मोहिमेत अतिरेक्यांकडून 17 असॉल्ट रायफल, 4 अंडर-बॅरल ग्रेनेड लाँचर, 13 एके मॅगझिन, 207 AK ammunition, 19 UBGL ग्रेनेड, 2 ग्रेनेड, 2 ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, 1 थुराया रेडिओ सेट आणि भारतीय चलनी नोटा हस्तगत करण्यात आल्या… यावरून अतिरेकी किती तयारीने आले होते, हे समजू शकते! 

मेजर मोहित शर्मा यांच्या असीम पराक्रमासाठी देशाने त्यांना शांतता काळातील सर्वोच्च सैन्य पुरस्कार, अशोक चक्र (मरणोत्तर) प्रदान केले. त्यांच्या पत्नी, ज्या आता मेजर पदी आहेत, त्यांनी २६ जानेवारी, २०१० रोजी तत्कालीन राष्ट्रपती महोदया श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अशोक पुरस्कार स्वीकारला. मेजर मोहित यांच्या भावाची मुलगी, अनन्या मधुर शर्मा त्यांचे बलिदान झाले तेंव्हा एक दोन वर्षांची होती. तिने त्यांच्यापासून पुढे प्रेरणा घेत एन. डी. ए. मध्ये प्रवेश मिळवण्यात यश मिळवले. मेजर साहेबांचे वडील राजेंद्रप्रसाद आणि मातोश्री सुशीला शर्मा यांना त्यांच्या लेकाचा खूप अभिमान वाटतो. दिल्लीतील राजेन्द्रनगर मेट्रो स्टेशनला मेजर मोहित शर्मा यांचे नाव देऊन त्यांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केला गेला आहे. २१ मार्च हा त्यांचा बलिदान दिवस. त्यानिमित्त ह्या आठवणी जागवण्याचा प्रयत्न.

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments