डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? इंद्रधनुष्य ?

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मध्यरात्रीचे सूर्य…” – भाग – १  ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी वाहिलेले पहिले “प्रशिक्षण व रोजगार केंद्र”)

ज्या स्वप्नाचा गेली दहा वर्षे जीव खाऊन पाठलाग केला, जे स्वप्न पाहताना कधी झोप आलीच नाही, ज्याने गेल्या दहा वर्षात खूप रडवले, थकवले, हरवले अशा नुकत्याच साकार होऊ पाहणाऱ्या त्या स्वप्नाची हि कथा… माऊली आपल्या सर्वांसमोर सादर… कारण हे स्वप्न पाहण्याची शक्ती तुमच्याच मुळे मिळाली आहे… फक्त तुमच्यामुळे!!!

तर, आयुष्याच्या सुरुवातीला भीक मागणाऱ्या आजोबांनी मदत केली होती; त्यांच्या मदतीमधून उतराई व्हायचे, त्यांच्या उपकाराचे कर्ज डोक्यावर होते त्यातून उतराई व्हायचे, या भावनेतून, भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेतील महाराष्ट्र प्रमुख म्हणून असलेली नोकरी 2015 साली सोडून काम सुरू केले.

आमच्या या भीक मागणाऱ्या समाजाला वैद्यकीय सेवा, स्वयंरोजगार आणि पुनर्वसन तसेच भिक मागणाऱ्या मुलांचे शिक्षण असे एका मागोमाग एक अनेक प्रकल्प सुरू झाले. हे सर्व काम भीक मागणारे लोक जिथे असतात, तिथेच म्हणजे रस्त्यावर, उकिरडा किंवा गटारा जवळ, भर गर्दीतल्या फुटपाथ वर चालते.

दीडशे किलोचे साहित्य मोटर सायकल गाडीवर आणि बॉडीवर वागवताना या दहा वर्षात अनेक छोटे-मोठे एक्सीडेंट झाले. वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळी हाडे मोडून घेतली. हरकत नाही, चूल पेटवायची म्हटल्यानंतर लाकडं जाळावीच लागतात…! भिक्षेकर्‍यांच्या घरात चूल पेटावी, म्हणून मी हाडं घातली..!

तर, याचना करणाऱ्या लोकांनी स्वयंरोजगार करावा, सन्मानाने नागरिक म्हणून जगावे यासाठी त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या मार्गांनी काम करण्यासाठी प्रवृत्त करायला सुरुवात केली. हळूहळू तुम्ही सर्वजण मला भेटत गेलात… माझा हूरूप वाढला… तुम्हीच माझे आई बाप झालात…!

माझ्या आई बापाने जन्म दिला, तुम्ही कर्म दिले!

तर, हे सर्व करत असताना लक्षात आले; की जन्मल्यापासून ते आतापर्यंत शिक्षण किंवा कोणत्याही स्किल्स भिक्षेकरी वर्गाकडे नाहीत. आणि म्हणून नोकरी, धंदा – व्यवसाय यांच्यापासून हे लोक खूप दूर आहेत. यांनी नोकरी धंदा व्यवसाय करावा म्हणून, यांना काहीतरी शिकवायचे म्हटले तर, कुठेतरी बसवून यांना काहीतरी प्रशिक्षण द्यावे लागेल याची जाणीव झाली.

यानंतर भीक मागणाऱ्या लोकांसाठी एखादे प्रशिक्षण आणि रोजगार केंद्र उभे करून तिथे व्यवसायाभिमुख स्किल्स देऊन यांना यांच्या पायावर उभे करावे हा विचार डोक्यात आला, परंतु त्यासाठी एखादी जागा ताब्यात असणं गरजेचं होतं मग सरकारी, निमसरकारी, बिगर सरकारी अशा सर्व यंत्रणांना “आम्हाला जागा देता का? जागा…?” म्हणत झोळी घेऊन फिरलो. “अनेक माणसं भिंती वाचून, छपरापासून, इतरांच्या माये वाचून, माणूस होण्याचा प्रयत्न करत, रस्त्या रस्त्यात भीक मागत आहेत… यांना माणूस बनवण्याचा प्रयत्न करत आहे… जिथून कोणी उठवणार नाही; अशी भाड्याने का होईना पण जागा देता का? जागा….?” गावकरी होण्यासाठी झटणाऱ्या, या “सम्राटांसाठी मी नट झालो… ” 

मी जिथे जायचो त्या सर्व ठिकाणी माझ्या कामाचे कौतुक व्हायचे…. परंतु जागा द्यायचा विषय आल्यानंतर, आमच्या जागेत हे गलिच्छ लोक येणार? किती घाण करतील हे लोक? असा विचार होऊन आम्हाला कायम नकार मिळत गेले. पुण्यातील अनेक बिल्डिंग मधल्या सोसायटी मधील चेअरमन साहेबांचे पाय धरून त्यांचा हॉल रीतसर भाड्याने मागितला, पण अत्यंत प्रेमाने, प्रत्येकाने ‘शेजारच्या बिल्डिंगमध्ये विचारा’, असा सल्ला दिला. शेजारच्या बिल्डिंग वाल्यांनी, त्यांच्या शेजारच्या बिल्डिंगचा रस्ता दाखवला…. आम्ही रस्त्यावरचे, शेवटी रस्त्यावरच राहीलो, यांच्यासाठी प्रशिक्षण आणि रोजगार केंद्र काढण्याचे स्वप्न दरवेळी भंगत गेले…!

ज्यांना भीक मागणे सोडायचं आहे, ज्यांना आमच्या केंद्रात काम करायचे आहे, असा वर्ग, दरवेळी मला भेटला; की विचारायचा, ‘सर मिळाली का जागा आपल्याला?’ अनेक हितचिंतक विचारायचे, ‘डॉक्टर तुम्हाला जागा मिळत नाही म्हणजे काय? समाजाचे काम करणाऱ्याला, दानशूर लोक दोन-चार एकर जागा सहज देतात… तुम्हाला चार-पाचशे स्क्वेअर फुटाची जागा मिळेना? अहो काय हे…??’ ”इतके पुरस्कार आणि सत्कार होतात, पण तुम्हाला कोणी जागा का देत नाही???’ या

सर्वांच्या प्रश्नामुळे माझ्या जखमेवर आपोआप मीठ पडायचे… डोकंच चालायचं नाही…!

खूप वेळा काम झाल्यानंतर, अंगावरचा apron काढून भिक्षेकऱ्यांमध्येच बसून मी काय करावं, कोणाशी बोलावं, कसा मार्ग काढावा? याचा डोक्याला हात लावून विचार करत असे… असा भिक्षेकऱ्यांमध्ये बसलेलो असताना, सहानुभूतीने, भिकारी समजून, माझ्या पुढ्यात भीक म्हणून खूप लोक पैसे टाकायचे… ‘धडधाकट आहे, अंगावर कपडे पण चांगले आहेत; तरी भीक मागतोय बघ कसा नालायक… ‘ अशी माझ्या माघारी, माझ्याच विषयी झालेली कुजबुज सुद्धा मी कितीतरी वेळा ऐकली. हे ऐकून, डोळ्याच्या वाटेने अश्रू ओघळायचे… प्रचंड राग यायचा… खूप वेळा वाटायचं, शासनाला किंवा इतर कोणालाच या कामाची गरज वाटत नाही… तर मला तरी ती गरज का वाटावी? मरू दे…. सोडून देतो उद्यापासून हे सर्व…! मी पूर्णतः हरून फ्रस्ट्रेट होऊन जायचो…

मी उठणार इतक्यात, मामा मामा, म्हणत चार-पाच वर्षाचं मूल मांडीवर येऊन बसतं… ‘तु का ललतो मामा, तुला भूक लागली?’ महिनाभर आंघोळ न केलेलं, काळकुट्ट एक बाळ माझ्या गालाचा मुका घेत विचारतं…. भीक मागण्यात व्यस्त असलेली त्याची आई मागून बोलते, ‘हा मामाला भूक लागली आसंल, म्हणून मामा रडतो…! ‘ 

भूक हेच आमच्या लोकांसाठी अंतिम सत्य…! भुकेच्या पलीकडे काही नाहीच…! भुकेसाठी लढायचं…. भुकेसाठी मरायचं…! जन्माला येऊन एवढं एकच करायचं…! ! ! या भुकेची शिसारी आली आहे आता मला…! “भूक”… मग ती कसलीही असो…. माणसाला वाकायलाच लावते…!

यानंतर ते बाळ त्याच्याकडे एकमेव शिल्लक असलेला वडापाव माझ्या तोंडापुढे धरतो आणि म्हणतो, ‘तू खा मामा, माजं पोट भरलंय… ‘ ज्याच्याकडे खूप काही आहे, त्याने देणं आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याने देणं… यात खूप फरक आहे. प्रश्न एकच, खरा श्रीमंत कोण??? 

आत्तापर्यंत सावकाशपणे वाहणारे अश्रू नकळतपणे मग महापूर होतात… भावनेच्या भरात, त्या नागड्या पोराला मी घट्ट मिठी मारतो… तेवढ्यातूनही तो ‘मामा मामा’ म्हणत मला घास भरवतो… माहित नाही कसा, पण तो बाळकृष्ण होतो आणि मी सुदामा होऊन जातो…!

यानंतर मला माझीच लाज वाटायला लागते… हि नागडी पोरं अशीच नागडी जगणार, मोठी होणार, भूक भूक करत नागडी आणि बेवारस म्हणूनच मरणार… स्वतःकडे काही नसताना ज्याने तुला वडापाव खाऊ घातला, त्याला तू आयुष्यभर उपाशी ठेवणार? ज्यांनी तुला मामा म्हटलं, काका म्हटलं, बाळा, सोन्या म्हणत नातू, मुलगा मानलं, ज्यांनी तुझ्याकडे आशेने डोळे लावले… त्यांना असंच रस्त्यावर बेवारस मरायला सोडून देणार? ‘सोडून देतो सर्व म्हणताना, लाज वाटत नाही का रे तुला?’ मीच हा माझा मलाच प्रश्न विचारायचो…

डोक्यात प्रचंड गदारोळ उठायचा… पण या आणि अशा प्रकारच्या अनेक प्रसंगांनी मला फ्रस्ट्रेशन मधून बाहेर काढलं, लढण्याचं सामर्थ्य दिलं. यानंतर हात वर करून शरणागती पत्करलेला मी, पुन्हा पुन्हा सज्ज व्हायचो…! हे असं…. एक नाही, दोन नाही, पाच नाही, तर तब्बल दहा वर्षे, म्हणजे आजपर्यंत सुरूच आहे. दहा वर्षे मी या गोष्टीची दाहकता भोगतो आहे…

मधल्या काळात तुम्हा सर्वांसारखाच… एक मोठ्या मनाचा… मनाची गडगंज श्रीमंती असणारा भला माणूस निसर्गाने माझ्या झोळीत टाकला. त्यांचे नाव दानिशभाई शहा! ! ‘हातात पुरस्कार आणि कपाळावर नकार’ अशा माझ्यासारख्याच्या पाठीवर त्यांनी हात ठेवला.

बिबवेवाडी परिसरात त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या सोयी करता त्यांची मालकी हक्काची बिल्डिंग आहे. त्यापुढील साधारण दोन हजार स्क्वेअर फुट जागा पार्किंग साठी त्यांनी शिल्लक ठेवली होती. ही मोकळी जागा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी त्यांनी मोफत वापरण्यास आपल्याला देऊ केली आहे. त्यांनी पाठीवर ठेवलेल्या हातामुळे माझी दहा वर्षाची घुसमट एका क्षणात थांबली.

काही माणसं असे दैवी हात घेऊन जन्माला येतात आणि एखाद्याच्या आयुष्याचं भलं करून जातात… वर ‘आपण काहीच केलं नाही’ या अविर्भावात नामा निराळे होतात…!

मला या माणसाचा हेवा वाटतो…! ! ! ते फक्त जागा देऊन थांबले नाहीत, स्वतःच्या घरचं कार्य आहे असं समजून चारही बाजूंनी पत्र्याचे शेड आणि डोक्यावर छप्पर करून दिले… दरवेळी मला ते या जागेवर बोलावून विचारायचे ‘डॉक्टरसाहेब आणखी काय करूया?’ दरवेळी मी घुम्यागत त्यांच्या पायांकडे पाहत राहायचो… काही मागायला माझी जीभ उचलायची नाही…

मी बोलत नाही असे पाहून… ते इकडे तिकडे, जागेकडे पाहत, मागे हात बांधून फिरत राहायचे… फिरता फिरता स्वतःशीच बोलत राहायचे, ‘ उन्हाळ्यात उकडणार… मोठे पंखे लागतील… थंडीच्या दिवसात लवकर रात्र होते, लवकर अंधार होईल…. चांगल्या लाईट इथे लागतील… ‘ प्रत्येक वाक्यानंतर लाईट आणि पंख्यांची ऑर्डर दिली जायची.

पुढच्या वेळी असंच हात मागे बांधून फिरता फिरता मला विचारायचे, ‘डॉक्टर साहेब, तुम्ही काहीतरी बोला ना, तुम्ही काहीच बोलत नाही… ‘ 

त्यांच्या इतक्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला मी…. भिजलेल्या मांजरागत भेदरून जायचो… मी काय बोलणार? 

पुन्हा स्वगत म्हणायचे, ‘आपल्या कडे आपल्या जागेत आता रोज पाहुणे येणार, त्यांचे सामान ते कुठे ठेवणार…?’ डाव्या तळहातावर उजव्या हाताच्या बोटांनी ताल धरत, गाणं म्हणाल्यागत ते बोलत राहायचे… ‘काय करूया…? अजुन काय करूया…? काय काय करूया….???’ म्हणत पुन्हा ते कोणालातरी फोन लावायचे, यापुढे लोखंडी कपाट आणि लॉकरची ऑर्डर, सीसीटीव्हीची ऑर्डर, रेडीमेड टॉयलेट ची ऑर्डर जायची… त्यांनी तळ हातावर धरलेला तो ताल होता; की माझ्या हृदयाची धडधड… हे मात्र मला कधी समजलं नाही…!

माझ्या या लोकांना, इतर लोक भिकारी म्हणतात, मी त्यापुढे जाऊन त्यांना भिक्षेकरी किंवा याचक म्हणतो… हा देव माणूस याही पुढे जाऊन माझ्या लोकांना “पाहुणे” म्हणतो…!

भीक मागणाऱ्या समाजात मी उठतो बसतो, त्यांच्याबरोबर माझं नातं तयार झालंय, म्हणून मला त्यांच्याविषयी जिव्हाळा आणि प्रेम वाटणे स्वाभाविक आहे, पण दानिश भाईंचं काय? त्यांना या लोकांबद्दल का जिव्हाळा वाटत असावा? मी यावर खूप विचार करत असे.

पाऊस पडून गेल्यानंतर मागे एक आल्हाददायक वातावरण तयार होते… मातीतून एक सुगंध यायला लागतो… पाऊस पडून गेला तरी मागे त्या पावसाच्या पाऊलखुणा उरतात…!

दया, क्षमा, शांती, सहानुभूती, करुणा, माया, प्रेम या सर्वांचं मिश्रण असणारे अनेक महापुरुष आपल्याकडे होऊन गेले… या महापुरुषांनी आपले अवतार संपवताना आपल्या पाऊलखुणा मागे ठेवल्या…. यातलीच एक पाऊलखुण म्हणजे दानिश भाई शहा असावेत!

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments