सुश्री मंजुषा सुनीत मुळे
इंद्रधनुष्य
☆ ‘वारली’चा वाली’… सुरेश नावडकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
८० च्या दशकातील ही गोष्ट आहे. एका मध्यमवयीन दाढीवाल्याने, आदिवासी वस्तीमध्ये टाकून दिलेल्या धातूंच्या मूर्तींमधून, एक मूर्ती उचलून आपल्या पिशवीत टाकली. तो मूर्ती पिशवीत टाकत असताना एका आदिवासी स्त्रीने त्याला पाहिले व ती गोष्ट तिने आपल्या म्होरक्याला सांगितली. सर्व आदिवासींनी, चोरीची शिक्षा म्हणून त्या माणसाला पकडून बांधून ठेवले. त्यांच्या रिवाजानुसार त्याला रात्री बळी देण्याचे ठरले. रात्री आदिवासींचा नाच व पूजा सुरु झाली. सुदैवाने त्या दिवशी त्यांचा मुखिया हजर नसल्यामुळे बळी देण्याचे, दुसऱ्या दिवसावर ढकलले गेले. दुसरे दिवशी मुखिया आला. त्याला त्या माणसाची भाषा कळत होती. त्या माणसाने मुखियाला, आपण सरकारी माणूस असून आदिवासींमध्ये राहून, काम करतो हे पटवून दिले, तेव्हा कुठे त्याची त्या चोरीच्या शिक्षेतून सुटका झाली.. हा माणूस म्हणजेच, आदिवासींच्या ‘वारली कले’ची संपूर्ण जगाला ओळख करुन देणारा.. चित्रकार, भास्कर कुलकर्णी!!
कलेसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे अनेक कलाकार होऊन गेले. मात्र भास्कर कुलकर्णी या चित्रकाराने आपले आयुष्य आदिवासींच्या सहवासात काढून, त्यांच्या पारंपरिक ‘वारली कले’ला जगमान्यता मिळवून दिली. आजच्या पिढीला त्यांनी या कलेसाठी केलेले योगदान माहीत नाही… ही खरंच, या कलाकाराची शोकांतिका आहे..
भास्कर कुलकर्णी यांचा जन्म मुंबईत, मालाड येथे १४ सप्टेंबर १९३० साली झाला. शालेय शिक्षणानंतर त्यांनी जे जे स्कूल आॅफ आर्ट मध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांचे सोबत चित्रकार बाबुराव सडवेलकर, तय्यब मेहता असे नामवंत कलाकार होते. जे जे नंतर त्यांनी, जे वाॅल्टर थाॅम्सन या जाहिरात संस्थेत, बोधचित्रकार म्हणून नोकरी केली. त्यानंतर काही काळ, ‘ओ अॅण्ड एम’ या जाहिरात संस्थेत काम केले. भास्कर कुलकर्णी यांची संशोधनात्मक वृत्ती, ग्रामीण कलेचा अभ्यास हे गुण हेरुन श्रीमती पुप्पुल जयकर यांनी, त्यांना ‘विव्हर सर्व्हिस सेंटर’ मध्ये कामाला घेतले. श्रीमती जयकर, ह्या लोककलेच्या गाढ्या अभ्यासक तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्नेही होत्या. आदिवासी कलेचा शोध घेऊन त्या कलेला वृद्धिंगत करण्याचे काम त्यांनी भास्कर कुलकर्णी यांचेवर सोपविले..
सहाजिकच ही नोकरी करताना भास्कर यांचा आदिवासींशी जवळून संपर्क आला. त्या भटक्या जमातीमध्ये मुक्तपणे वावरण्याचा योग आला. वारली कलेबरोबरच आदिवासींची रहाणी, जीवनमान यांचा त्यांनी अभ्यास केला. इथेच त्यांच्या जीवनात मोठं परिवर्तन झाले..
आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत इंदिरा गांधी सरकारचा पराभव झाला. पुप्पुल जयकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. परिणामी कुलकर्णी यांनाही त्रास होऊ लागला. त्यांनी आपला जमलेला भविष्य निर्वाह निधी घेऊन, संस्था सोडली. नोकरी सोडल्यानंतर ते डहाणू जवळील, गंजाड या वारली लोकांच्या पाड्यावर येऊन राहिले. तेथे एक लहानसे घर बांधले. गावात पाण्याची टंचाई होती. कुलकर्णी यांनी पाण्यासाठी विहीर खोदण्यास सुरुवात केली.. विहीर जसजशी खोल जाऊ लागली, तसे त्यांच्या फंडाचे पैसे संपू लागले. शेवटी विहीरीला पाणी काही लागलेच नाही. कुलकर्णी आता कफल्लक झाले. ते पूर्णपणे आदिवासी झाले. अविवाहित व फकिरी जीवन असल्याने त्यांच्या गरजाही फारशा नव्हत्या.. वारली लोकांकडून बांबू-कामठ्यांच्या आकर्षक वस्तू, चित्रे काढून घेणे व त्यांची मुंबईला विक्री करुन त्यांना पैसे मिळवून देणे, यातच त्यांचे दिवस जाऊ लागले. त्यांपैकी जिव्या सोम्या मशे याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. मात्र त्या कार्यक्रमाचे, सरकारने साधे निमंत्रणही कुलकर्णींना दिले नाही..
हळूहळू या कलेचे व्यापारीकरण होऊ लागले. गावातील पुढाऱ्यांकडून कुलकर्णींना त्रास होऊ लागला. ज्याच्या जागेवर कुलकर्णी यांनी घर बांधले होते त्याला फितवून, त्यांना ते घर सोडायला लावले. ज्या लोकांसाठी कुलकर्णींनी आपले सर्वस्व पणाला लावले होते त्यांनीच, त्यांना निराधार व पोरके केले. शेवटी कुलकर्णी यांनी ते गांव सोडले.. तरीदेखील त्यांच्या मनात वारली कलेविषयीचा आदर, हा तिळमात्रही कमी झालेला नव्हता..
मग कुलकर्णी सावंतवाडीला गेले. तिथे लाकडी खेळण्यांना वेगळे स्वरुप देण्याचे त्यांनी काम केले. नंतर ते गोव्याला गेले. एकटेपणा व वैफल्यग्रस्त जीवनामुळे त्यांना, दारुचे व्यसन लागले. काही काळानंतर ते तामीळनाडूमध्ये गेले. तेथील कुंभार वस्तीच्या खेड्यात राहून, ‘इंडिया फेस्टिव्हल’ या लंडनमध्ये होणाऱ्या प्रदर्शनासाठी कारागीरांना प्रशिक्षण दिले.
त्यांची नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा होती. मात्र जीवनाच्या उत्तरार्धात समाजाकडून मिळणाऱ्या उपेक्षेमुळे ते खचले होते. मद्यपान वाढत होते, प्रकृती ढासळत होती.. आपला मृत्यू बिहारमधील दरभंगा, येथेच व्हावा अशी त्यांची इच्छा होती. २४ एप्रिल १९८३ रोजी, वयाच्या अवघ्या त्रेपन्नाव्या वर्षी, दरभंगा येथील एका रुग्णालयात या भास्कराचा ‘अस्त’ झाला…
भास्कर कुलकर्णी यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या दिडशेहून अधिक रोजनिशी लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये सर्व विषयांवर सविस्तर लिहिलेले आहे. ते असामान्य व्यक्तिमत्त्वाचे चित्रकार व संवेदनशील लेखक होते. त्यांच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी दरभंग्यात त्यांचे मंदिर उभारले.. आणि एका कलासक्त जीवनाची, आख्यायिका होऊन राहिली…
हा लेख वाचल्यानंतर जेव्हा कधी आपणास एखादं वारली चित्र दिसेल, त्याक्षणी चित्रकार भास्कर कुलकर्णी यांची नक्कीच आठवण होईल…
(श्री. नावडकर यांच्या पूर्व-परवानगीने प्रस्तुत)
© सुरेश नावडकर
१३-५-२२
मोबाईल ९७३००३४२८४
संग्रहिका – मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२