मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ☆ इतिहास बदलणारा उंदीर  — श्री सौरभ वैशंपायन ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ इतिहास बदलणारा उंदीर  — श्री सौरभ वैशंपायन ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे

सर्वसाधारणपणे उंदीर हा पराकोटीची नासाडी करणारा अत्यंत उपद्रवी जीव समजला जातो. शास्त्रीय प्रयोगासाठी ते पांढरे उंदीर वापरताना आपण बघतो, ते वगळता उंदीर हा पाळीव प्राणी म्हणून कोणी वापरताना दिसत नाही. पण काही प्रशिक्षित उंदीर जीवितहानी टाळत आहेत आणि त्याबद्दल त्यांच्यातील एकाला सुवर्ण पदक दिलं गेलं होतं याबद्दल वाचलं आहे का?

आपल्या बोलण्यात सिंहाचा वाटा किंवा खारीचा वाटा हे शब्दप्रयोग येत असतात, पण भविष्यात त्यात उंदराचा वाटा अशी भर पडली तर आश्चर्य वाटायला नको. मात्र हे काय आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात एक चक्कर मारावी लागेल व त्याचा आज होणारा भीषण परिणाम जाणून घ्यावा लागेल.

व्हिएतनाम युद्धाच्या काळात अमेरिकेच्या विरोधात लढणारे शेकडो व्हिएतकाँगी म्हणजे व्हिएतनामचे स्वातंत्र्यसैनिक सीमा ओलांडून कंबोडियातील जंगलात लपून बसायचे. त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी किंवा त्यांना रोखण्यासाठी विमानातून हजारो टन बॉम्ब तर टाकले गेलेच पण सोबत लाखो भू-सुरुंग पेरले गेले. वरून टाकलेल्या बॉम्बपैकी अनेक बॉम्ब चिखलात, शेतात रुतून बसल्याने फुटलेच नाहीत.  ते आजही तसेच जिवंत आहेत. तेच भू-सुरुंगांच्या बाबतीत. अमेरिकेने पेरलेल्या भू-सुरुंगातून आजही मृत्यूचे किंवा अपंगत्वाचे पीक निघते आहे. दरवर्षी शेकडो नागरिक शेतात, जंगलात काम करताना, लहान मुले खेळताना अजाणतेपणी अश्या बॉम्ब/भू-सुरुंगावर वजन पडल्याने प्राणास मुकतात किंवा अपंग होतात. अशाप्रकारे अपंग झालेल्यांचा अधिकृत आकडा तब्बल ६४ हजारांचा आहे. लाखो चौरस किमी.मध्ये लपलेले हे पन्नास लाखांहून अधिक बॉम्ब/भू-सुरुंग शोधून काढणे म्हणजे गवताच्या गंजीत टाचणी शोधण्यागत आहे. शिवाय शोधताना अपघात होतात ते वेगळे. अपघात होऊ न देता काम करणे अत्यंत वेळखाऊ, किचकट आणि खर्चिक काम. कंबोडिया हा देखील शेतीप्रधान देश. एखाद्या शेतात हे भू-सुरुंग न शोधता काम करायला जावं तर जिवाची जोखीम. म्हणजे गेली दशकानुदशके दररोज लाखो कंबोडियन नागरिक जीव मुठीत धरून कामावर जात आहेत. सगळ्याच बाजूने बिचाऱ्यांची कुचंबणा.

अशावेळी मदतीला आला एक उंदीर. तोच उंदीर जो एरवी शेतकऱ्यांचा मोठा शत्रू समजला जातो. त्याचं नाव – “मगावा”. हे त्याला लाडाने दिलेलं नाव. मगावाचा अर्थ “ध्यान केंद्रित असलेला”. तर हा मगावा मूळचा टांझानियातील “आफ्रिकन जायंट पोच्ड रॅट” प्रजातीचा उंदीर. हे उंदीर आकाराने सश्याइतपत मोठे असतात. अत्यंत तीव्र घाणेंद्रिय आणि मातीत कित्येक फूट खोल असलेल्या गोष्टीचा वास घेण्याची आश्चर्यकारक क्षमता असलेला हा मगावा कंबोडियन नागरिकांसाठी जणू देवदूत ठरला. जन्मानंतर पहिले दहा आठवडे त्याची व्यवस्थित वाढ झाल्यावर त्याला भू-सुरुंग बनवायला जी स्फोटकं किंवा मिश्रण वापरले जाते त्याचा गंध ओळखण्यासाठी प्रशिक्षित केलं. मोठमोठ्या लाकडी खोक्यात माती भरून त्यात ती मिश्रणे ठेवून त्याला तितका भाग ओळखण्याचे प्रशिक्षण दिले. बरोबर शोध घेण्याच्या बदल्यात त्याला अत्यंत चविष्ट फळे मिळत.

यासाठी मगावा आणि त्याच्यासारखे अजून काही उंदीर “ऑन फिल्ड” काम करत आहेत. वजनाने हलका असल्याने भू-सुरुंगावर त्याच्या वजनाचा काहीच परिणाम होत नाही. या उंदरांना एक छोटा बॉडी हार्नेस घालून त्यातून एक दोरी पास केली जाते व त्यांना एका सरळ रेषेत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालवलं जातं. मगावा २०० चौरस मीटरचा परिसर अर्ध्यातासात बिनचूक पिंजून काढू शकत असे. हेच काम करायला माणसाला अत्यंत प्रगत माईन-डिटेक्टर्स घेऊनदेखील चार दिवस लागतात. जून २०२१ मध्ये वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या आयुर्मानानुसार मगावा “म्हातारा” झाल्याने या कामातून त्याला निवृत्ती दिली। मात्र तोवर मगावाने १,७७,००० चौरस मीटरहून अधिक परिसर निर्धोक केला. त्याने ७१ भू-सुरुंग आणि डझनावारी इतर प्रकारची जिवंत स्फोटके शोधली होती. इतक्याश्या जीवासाठी हे काम खरोखर प्रचंड आहे. मगावाने एकही चूक न करता जो परिसर निर्धोक केला त्याची खात्री लोकांना पटविण्यासाठी मगावा ज्या भु-सुरुंग शोधणाऱ्या पथकासोबत काम करतो त्यांनी त्या जागी फुटबॉल मॅचेस खेळून दाखवल्या. ते बघून त्या परिसरातील नागरिक निश्चिंत झाले. मगावा हा कंबोडियन लोकांचा लाडका हिरो झाला.

त्याच्या याच कामाचे कौतुक म्हणून लंडनस्थित PDSA या संस्थेने सप्टेंबर २०२० मध्ये सुवर्णपदक देऊन त्याचा सन्मान केलेला आहे. PDSA ही संस्था १९१७ पासून माणसाला आपत्तीतून वाचविणाऱ्या प्राणी-पक्ष्यांचा ३ प्रकारची पदके देऊन सन्मान करते आहे. पैकी युद्धकाळात विशेष कामगिरी करणाऱ्या पशु-पक्ष्यांना डिकीन मेडल दिले जाते. हा पुरस्कार म्हणजे प्राण्यांचा “व्हिक्टोरिया क्रॉस” समजला जातो. याशिवाय शांतताकाळात विशेष काम करणाऱ्या प्राणी-पक्ष्यांना सुवर्ण किंवा रौप्य पदक दिले जाते. आजवर PDSA ने कुत्रे, मांजरी, घोडे आणि कबुतरांचा सन्मान केला होता (यावर मी माझ्या “परिंदे” या ब्लॉग मध्ये मागेच लिहिलं होतं – http://sahajsuchalamhanun.blogspot.com/2015/01/blog-post_21.html ). मगावा  हा असे पदक/पुरस्कार प्राप्त करणारा पहिला उंदीर. PDSA ने प्राण्यांसाठी ब्रिटनमध्ये ४२ दवाखाने उघडले असून तिथे प्राण्यांवर मोफत उपचार होतात.ज्यांना सन्मान प्राप्त झाला आहे त्या प्राण्यांची कृतज्ञता म्हणून खरोखर ते मरेपर्यंत बडदास्त ठेवली जाते. जानेवारी २०२२ मध्ये मगावाने अखेरचा श्वास घेतला तोवर त्याचीही अशीच काळजी घेतली गेली.

तर अशी आहे ही सामान्य लोकांच्या जीवनासोबत एका अर्थी इतिहासही बदलणाऱ्या एका छोट्याश्या “हिरोरॅट” मगावाची छोटीशी तरीही खूप मोठी गोष्ट. 

— श्री सौरभ वैशंपायन

संग्राहिका :- सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈