इंद्रधनुष्य
☆ कृष्णवड…. श्री हर्षद तुळपुळे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
परवाच वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या झाडाबद्दल कुठेकुठे कायकाय वाचायला मिळत होतं. त्यात वडाचा हा एक अद्भुतरम्य प्रकार ज्ञात झाला – “ कृष्णवड “.
पहिल्यांदा वाचल्यावर असं वाटलं की, काळ्या तुळशीला ‘कृष्णतुळस’ म्हणतात, त्याचप्रमाणे या वडाची पानंबिनं काळीबिळी असावीत म्हणून याला ‘कृष्णवड’ म्हणत असतील; परंतु नंतर कळलं की या वडाची पानं देठाकडच्या बाजूने आत वळलेली, द्रोणासारखी असतात आणि त्यामागे एक कृष्णाची पौराणिक कथा आहे, म्हणून याला ‘कृष्णवड’ नाव पडलं.
भारतीय संस्कृतीकोशात ही कथा वाचनात आली. एकदा गोपाळकृष्ण गाईंना घेऊन रानात गेला असता, काही गोपी लोणी घेऊन तिथे गेल्या व त्यांनी ते लोणी कृष्णाला दिलं. कृष्णाने ते लोणी सर्व गोपगोपींना वाटलं. त्यासाठी त्याने जवळच असलेल्या एका वडाची पानं तोडून ती जराशी मुडपून घेतली. तेव्हापासून त्या वडाची पानं द्रोणासारखी बनली आणि त्याच्या बीजापासून उत्पन्न झालेल्या वडाला तशीच पानं येऊ लागली. म्हणून या वडाला ‘कृष्णवड’ म्हणतात.
कोकणात कुठे हा वृक्ष मी अद्याप बघितलेला नाही, पण याच्याबद्दल जाणून घ्यायची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. म्हणून काही वनस्पतीअभ्यासकांना याबद्दल विचारलं आणि थोडंसं ‘नेटलं’. तेव्हा अशी माहिती कळली की मुंबईच्या जिजामाता उद्यानात आणि पुण्यात एम्प्रेस गार्डनमध्ये हा वृक्ष आहे. बंगाल प्रांतात हा वृक्ष खास करून आढळतो. देवराई अभ्यासक डॉ. उमेश मुंडल्ये यांनी पानांचा सुंदर फोटो पाठवला. या वृक्षाचे शास्त्रीय नाव Ficus krishnae. पूर्वी ही साध्या वडाचीच (Ficus benghalensis) एक उपप्रजाती मानली जात होती. मात्र केवळ याची पानंच नव्हे, तर या वृक्षाची वाढ, त्याच्या मुळांची रचना, पारंब्या या सगळ्यांमध्ये कमीअधिक फरक असल्याने अलीकडे ही स्वतंत्र प्रजाती गणली जाऊ लागली आहे. याला “ माखनकटोरा “ असंही एक गोड नाव आहे.
२०१५ साली मनेका गांधी यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाची भेट म्हणून कृष्णवडाचं रोप दिलं होतं.
या वडाच्या उत्पत्तीमागे असलेली कृष्णाची कथा हा एक सांस्कृतिक भाग झाला . पण उत्क्रांतीमध्ये या वडाची पानं अशी का झाली असतील याचं उत्तर शोधणं मनोरंजक ठरेल ! पानांची अशी विशिष्ट रचना तयार होण्यामागे पाणी धरून ठेवणं, असा उद्देश असावा बहुधा.
या वृक्षाबद्दल आणखी कोणाला काही वेगळी माहिती असेल तर नक्की जाणून घ्यायला आवडेल.
छायाचित्र: डॉ. उमेश मुंडल्ये
— हर्षद तुळपुळे
संग्राहक : श्री सुनीत मुळे