? इंद्रधनुष्य ?

ज्ञानोबा तुकाराम  – भाग – 1 – लेखक – श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  ☆

( आणि ती व्यक्ती घराकडं गेली. गाडीवान गाडी घेऊन जागेला गेला.) इथून पुढे —-

देवळात अंधारच होता. कुठेतरी बारीक ठाणवई, एखादी पणती मिणमिणत होती. सारं काही सुमसाम झालं होतं . मंडपात माणसं घोरत पडली होती. त्या कोणत्याही गोष्टीकडे न पाहता मंडप पार करत अंधारातून ठेचकाळत एक एक अडथळे पार करून ती व्यक्ती देवाच्या गाभाऱ्यापर्यंत गेली. दाराशी आली. पळत आली. तर दाराला भलं मोठं कुलूप घातलं होतं.

आता हुरहूर जीव घेणारी ठरली. हुरहूर होती आज देवदर्शन मुकले याची. तसंच तगमगत दारासमोर साष्टांग दंडवत घातला. तिथेच नामस्मरण करत मांडी ठोकली. 

सगळीकडे शांतता होती. तेवढ्यात काही अस्पष्ट अस्पष्ट आवाज ऐकू यायला लागला. त्या व्यक्तीने इकडे तिकडे पाहिलं तर कुणीच नाही. मग आवाज कसला येतोय. बारीक बारीक किण किण करणारा पैंजणांचा आवाज. त्याचबरोबर चिपळ्यांचा स्वर. काही पुटपुटल्याचा आवाज. पैंजण वाजताहेत म्हणून बाई म्हणावं तर सोबत चिपळ्या वाजताहेत? स्वर ही पुरूषी येतोय?

कुठून स्वर येतोय? 

पैंजण कसले वाजताहेत? 

चिपळ्या कोठून वाजताहेत? 

आवाज कसला येतोय? 

याचा शोध सुरू झाला तर आवाजाची दिशा गाभाऱ्याकडे चालली. 

त्या व्यक्तीला वाटलं गाभाऱ्यात कोणी भक्त, भाविक, वारकरी अडकला असावा. चुकून कोंडला गेला असावा. रात्रीच्या गडबडीत राहिला असेल. आता रात्रभर बिचारा अडकेल. आणखी जरा पहावं म्हणून गाभाऱ्याचे दाराला असलेल्या छिद्रातून त्या व्यक्तीने आत दृष्टी टाकली, इकडे तिकडे शोधक नजरेने ठाव घेतला. कोणी दिसेना. येणारा आवाज मात्र गडद झाला. तेवढ्यात लक्ष सिंहासनाकडे गेलं तर आसनावर देव नाहीत. केवळ सिंहासन होते. समोर मात्र सर्वत्र प्रभा फाकणारा हिरेजडित सोन्याचा देवकिरिट सिंहासनावर ठेवलेला होता. मगाचची भक्त अडकल्याची चिंता कुठल्या कुठे पळाली. आता देव कुठे आहे? याची चिंता सुरू झाली. कोणते विघ्न तर आले नाही ना?  कोणीही मोगली यवन सरदार अवचित आला नाही, तरीही देव कसे जागा सोडून गेले? आतून आवाज येतोय? काय करावे? कसे शोधावे? कोणाला चौकशी करावी? रात्र पडली,  काहीच कळेना. 

तेवढ्यात एका खांबाआडून एक दिव्य देहधारी मानवाकृती बाहेर पडल्यासारखी दिसली. निरखून पाहतो तो खांद्यावर जरतारी रेशमी शेला, गळ्यात वैजयंती माळा, नर्तनाच्या पदलालित्यावर डोलत होत्या, डोईचे कुळकुळीत केस खांद्यावर रूळत आहेत. कमरेचा पितांबर हालतोय. दोन्ही हाती वाजत चिपळ्या होत्या. पायातले रत्नजडित तोडर बारिक बारिक वाजत होते. नेत्रकमल मिटलेले होते. नर्तन करीत करीत तोंडातून स्वर बाहेर येत होते —-

” ज्ञानोबा – तुकाराम “. 

” ज्ञानोबा – तुकाराम ” 

ती कोणी वारकरी व्यक्ती नव्हती.  ती व्यक्ती कोणी सामान्य दिसत नव्हती. तर प्रत्यक्ष परमात्मा पांडुरंग बेभान होऊन गाभाऱ्यात नाचत होता आणि तोंडाने म्हणत होता ” ज्ञानोबा – तुकाराम ”  ” ज्ञानोबा – तुकाराम “.

 मघापर्यंत चिंतातूर असणाऱ्या त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचे भाव बदलले. चिंता बदलली. क्षणात आश्चर्य, क्षणात आनंद , क्षणात गंमत आलटून पालटून बदलत होती. आश्चर्य होते आपण काही अद्भूत पाहत आहोत याचे. दिसतेय ते काही विलक्षण आहे याचे. आनंद होता तो परमात्म्याचे आगळ्यावेगळ्या दर्शनाचा. दिव्य दर्शनाचा. आतापर्यंत परमात्मा असा भक्त-नाम गात नाचल्याचे वाचले वा ऐकले नव्हते. जो यति, योगी, तपी, ताडसी, यांना जपतपादी साधने वापरूनही सहज साध्य होत नाही, तो आपल्या दिठीसमोर नाचत असल्याचे पाहून गंमत वाटत होती. आनंद होत होता. तो परमात्मा केवळ दिव्यदृष्टी धारण करूनच दिसू शकतो असे ज्ञात होते. कारण महाभारतात त्याचं तेज दृष्टीला सहन न झाल्याने तो प्रत्यक्ष समोर असून अनेकांनी डोळे मिटले होते. तेज सहन न झाल्याने ते मिटावे लागले होते. डोळे मिटून घेवूनही त्याचे तेज डोळ्यांना सोसत नव्हते. तो दिव्य प्रकाशधारी, नव्हे शतसूर्य– नव्हे नव्हे कोटी भास्कराचे तेज ज्याचेपासून उगम पावते असा परमात्मा आपल्यासमोर नर्तन करतोय याची गंमत वाटत होती. आनंद वाटत होता. आश्चर्य वाटत होते. अनेकांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा हा परमात्मा, हे परब्रह्म, त्या व्यक्तीच्या दृष्टीसमोर स्वतः एका वेगळ्या तालावर नाचत होते. अगदी देहभान हरपून. अन् तोंडाने बोलत होते–”ज्ञानोबा-तुकाराम”

आजपर्यंत पुराणात वाचलं होतं, ऐकलं होतं की, एकदा भगवंताचे गृही नारद आले. सेवक बोलले देव देवपूजा करत आहेत. देवर्षी नारद आश्चर्यचकित झाले.. ते म्हणाले देव कोणाची पूजा करतात पाहू या. म्हणून ते देवघरात हलकेच प्रवेशले. तो देवपाटावर एक एक देव मांडले होते. आणि देव पूजनात दंग होते. ते देव म्हणजे आपल्यासारख्या  देवप्रतिमा नव्हत्या. होत्या भक्त प्रतिमा. भक्त उद्धव, भक्त अक्रूर, भक्त नारद, भक्त हनुमान. आश्चर्यमुग्ध महर्षी नारदाचा भाव त्या महान व्यक्तीच्या मुखावर आता प्रगटला होता. 

क्रमशः …

लेखक : श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील. 

पंढरपूर ( फेसबुक वरून साभार ) 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments