श्री सुरेश नावडकर
? इंद्रधनुष्य ?

☆ इथे ओशाळला शेक्सपिअर…☆ श्री सुरेश नावडकर ☆

शेक्सपिअर म्हणतो, ‘ नावात काय आहे? ‘– तर नावातच खूप काही आहे.. कसं? ते बघाच… जगातील कोणत्याही देशांपेक्षा, आडनावांची विविधता फक्त भारतातच आहे.. त्यातूनही महाराष्ट्रात तर, या बाबतीत आडनावांनी कहरच केलेला आहे…

आडनावांची विविधता ही अनेक प्रकारांमध्ये विभागलेली आहे.

रंगावरुन प्रचलित असलेली आडनावं.. काळे, गोरे, पांढरे, सावळे, भुरे, हिरवे, तांबडे, पिवळे, करडे, जांभळे, तपकीरे, इत्यादी. यामध्ये अनेकदा आडनावाच्या विरुद्ध ती व्यक्ती असते.. उदा. काळे आडनावाच्या बाई, गोऱ्यापान असतात.. तर गोरे आडनावाचे सद्गृहस्थ, कोळशाशीही स्पर्धा करणारे दिसतात..

धातूंची आडनावंही, बरीच आहेत.. जसे तांबे, पितळे, लोखंडे, कासे, चांदेकर, पुणतांबेकर, इत्यादी. काही खनिजांवर आधारित असतात..  रत्नपारखी, हिरे, पोवळे, लसुणे, गारगोटे, इ.

काही आडनावे, चेहऱ्यावरील अवयवांशी जोडलेली असतात.. जसे डोळे, काने, दुतोंडे, केसकर, टकले, माने, दाते, बोबडे, तिरळे, डोळस, अंधे, डोईफोडे, इ. 

आडनावं, व्यवसायावरुनही चालत आलेली आहेत.. जसे सोनार, सराफ, चांदिवले, वकील, सुतार, पारधी, वैद्य, चिटणीस, दिवाण, भगत, गुरव, लोहार, इ. काही पिढ्यांसाठी त्यांचा तो व्यवसाय असेलही, नंतर मात्र सोनाराचं, कापडाचं दुकान असतं किंवा लोहाराचा टेलरींगचा व्यवसाय असतो..

भाजीपाल्यांवरुनची आडनावं फारच गंमतीशीर असतात.. जसे भोपळे, दुधे, कारले, पडवळ, भेंडे, गवारे, रताळे, मुळे, तोंडले, केळकर, आंबेकर, फणसे, गाजरे, ढोबळे, राजगिरे, अंबाडे, नारळे, काकडे, इ. यातील भोपळे हे सडपातळ असू शकतात.. व कार्लेकर, मिठ्ठास बोलणारे असतात..

प्राणीमात्रांवरुन पडलेली आडनावं मजेशीर असतात.. उदा. मांजरेकर, उंदरे, वाघ, चितळे, सांबारे, मोरे, बिबटे, कोल्हे, कावळे, घारे, वाघमारे, मुंगसे, लांडगे, गरुड, ससे, बकरे, म्हशीलकर, पोळ, इ. जशी आडनावं, तशी ही माणसं असतीलच याची खात्री नसते.. म्हणजे ससे हे धीट असू शकतात, तर वाघ, डरकाळी फोडणे विसरुन मितभाषी झालेले असतात..

काही गंमतीशीर, प्रकृती बिघडल्याची आडनावं पहायला मिळतात.. जसे पादरे, हगवणे, पोटफोडे, पोटे, उचके, लिडबिडे, काणे, शेंबडे, लाळे, खोकले, उकिडवे, हगे, चिपडे, ढोमे, फेंदरे, इ. यांना आपलं आडनाव सांगतानाही, संकोच वाटतो…

काही आडनावं ही, गावातील कार्यपद्धतीवर असतात.. जसे पाटील, नगरकर, कुलकर्णी, मास्तर, सरपंच, सरंजामे, इनामदार, सुभेदार, हवालदार, भालकर, मोहिते, पवार, ठाकूर, ठाकरे, देशपांडे, मेश्राम, इ.  अशा नावांना, मान असतो..

चलनावर देखील आडनावं असतात, जसे पगारे, रोकडे, सहस्त्रभोजने, लाखे, कोटस्थाने, तिजोरे, हजारे, फुकटे, पावले, सोळशे, तनखीवाले, इ. यांच्या नावातच ‘नगद नारायण’ असल्यामुळे, यांची ‘चलती’ असते..

आवाज दर्शवणारीही आडनावं असतात.. जसे बोंबले, कोकले, घुमे, बडबडे, बोबडे, मुके, हर्षे, खिंकाळे, गोंधळे, तावडे, आकांत, घोगरे, इ. 

गाव व शहरावरुन पडलेली आडनावं.. शेगांवकर, किर्लोस्कर, चिपळूणकर, कराडे, गोवेकर, सासवडकर, जिंतीकर, उसगांवकर, धारवाडकर, सोलापूरकर, मुरुडकर, पावसकर, नाशिककर, नागपुरे, मालवणकर, पुणेकर, दादरकर, वसईकर, इ. यांनी आपलं गाव सोडून पन्नास वर्षे झाली तरी आडनावाची नाळ तुटलेली नसते..

काही आडनावं चवदार, टेस्टी असतात.. जसं गोडे, आंबट, कडू, दहिवळे, ताकवले, श्रीखंडे, चक्के, कडबोळे, करंजे, पुरी, हलवाई, झणकर, हिंगमिरे, आवळे, बोरे, चिंचोरे, डाळिंबे, इ. ही नावं घेतली तरी त्यांच्या अनुभवाची चव आठवते..

आडनावांचा हा धांडोळा, थोडक्यात आटोपता घेतो.. कारण याला अंत नाही.. एवढी विविधता असूनही, काही आडनावे ही अविस्मरणीय अशीच आहेत.. कारण त्या व्यक्तींचं योगदान मोलाचे आहे…

उदा. अत्रे, म्हटलं की प्रल्हाद केशव अत्रे, देशपांडे म्हटलं की, पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे, सावरकर म्हटलं की, विनायक दामोदर सावरकर, शेळके म्हटलं की, शांताबाई शेळके, घाणेकर म्हटलं की, काशिनाथ घाणेकर, दलाल म्हटलं की, दीनानाथ दलाल, पंडित म्हटलं की, एस. एम. पंडितच आठवतात… ही आडनावांतली जादू आहे.. त्या माणसांचं मोठेपण, त्या नावाला चिकटलेलं असतं… ते नाव तसंच तेजोमय राखण्यासाठी, त्याला जपावं लागतं.. नाहीतर ‘ नाव मोठं, लक्षण खोटं ‘ व्हायला वेळ लागत नाही…

हा लेख जर शेक्सपिअरने वाचला असता, तर नक्कीच तो ‘ ओशाळला ‘ असता… हे नक्की!!

© सुरेश नावडकर

११-६-२२

मोबाईल ९७३००३४२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments