☆ इंद्रधनुष्य ☆ लस कशी तयार झाली ☆ संग्राहक – विमल माळी ☆
१७८८ सालची एका तरुणाची ही गोष्ट. इंग्लंडमधल्या ग्लुस्टरशायरला एका साथीनं घेरलं. ती साथ आली की माणसं त्यावेळी मृत्युपत्राची वगैरे भाषा सुरू करायची. सगळे दु:खात, फक्त एक जमात गवळी. त्या तरुणाच्या घरी जो गवळी यायचा, त्याला या आजाराची कसलीही चिंता वाटत नव्हती. त्या तरुणाला आश्चर्य वाटलं. तो त्या गवळ्याकडे गेला. त्याचं घर आणि गोठा बघायला. यांना ही बाधा का होत नसावी. तिथं त्याला थेट उत्तर काही मिळालं नाही. पण शक्यता दिसली. त्या गवळ्याच्या गाईंना तोच आजार झाला होता. अंगावर फोड. ते पिकणं. पू वगैरे सगळं माणसांसारखंच.
त्या तरुणाला लक्षात आलं. या गाईंना झालेल्या रोगाच्या संपर्कात आल्यामुळे गवळ्यांच्या शरीरांत या रोगाबाबत प्रतिकारशक्ती तयार होत असावी. पण हे सिद्ध करायचं म्हणजे गाईंच्या अंगावरच्या फोडांचे जंतु माणसांच्या अंगात सोडायचे. त्यासाठी तयार कोण होणार?अखेर बऱ्याच परिश्रमांनंतर १४ मे १७९६ या दिवशी अशी एक संधी त्याच्यापुढे चालून आली. त्याच्या गावचा एक शेतकरी तयार झाला. सारा या त्याच्या गवळ्याच्या तरुण मुलीच्या अंगावर त्याच्या गाईप्रमाणे फोड आलेले होते. आणि त्यातले काही पिकलेही होते. तो तरुण तिच्याकडे गेला. लाकडाची एक छोटी ढलपी घेतली. तिच्या अंगावरचे पिकलेले फोड उकरून त्यातला पू त्यानं त्यावर गोळा केला. तिचा भाऊ जेम्स याच्या पायावर धारदार चाकूनं छोटीशी जखम त्यानं केली. रक्त आल्यावर साराच्या जखमेतला पू त्याच्या जखमेत भरला आणि वरनं मलमपट्टी केली. शेतकऱ्याला बजावलं. याच्यावर लक्ष ठेव. काही झालं तर मला सांगायला ये.
दोनच दिवसांनी शेतकरी त्याच्याकडे आला. मुलाच्या अंगात ताप होता. तो तरुण खुश झाला. सुरुवात तरी त्याच्या मनासारखी झाली. आणखी दोन दिवसांनी जेम्सच्या तोंडाची चव गेली. खूप अशक्तपणा जाणवायला लागला. पण पुढच्या दोन दिवसांत ही सर्व लक्षणं दूर झाली आणि जेम्स बरा झाला.
त्या तरुणाच्या प्रयोगाचा महत्त्वाचा टप्पा आता सुरू झाला. आता त्याला जेम्सच्या शरीरात खरेखुरे आजार जंतू सोडायचे होते. हा प्रयोग यशस्वी झाला तर तुझा मुलगाच काय सारी मानवजातच या साथीच्या विळख्यातून सुटेल. शेतकऱ्यानं विचारलं, ‘आणि अपयश आलं तर?’ तो तरुण शांतपणे म्हणाला, ‘खुनाच्या आरोपाखाली मला शिक्षा होईल.’
त्या तरुणानं मरणासन्न रुग्णाच्या फोडांमधला पू तशाच पद्धतीनं जेम्सच्या शरीरात घुसवला. पुढचे आठवडाभर तो आणि शेतकरी त्या पोरावर डोळ्यात लक्ष ठेवून होते. दोन दिवसांनी त्याला परत ताप आला. अंगावर पुरळ आलं. काळजी वाढली. पण दोन दिवसांनी तापात उतार पडला. त्या तरुणाच्या लक्षात आलं की अशा पद्धतीनं या आजाराबाबत लोकांच्या शरीरात प्रतिकारशक्ती तयार करता येते.
आपल्या या प्रयोगाचे निष्कर्ष त्यानं रॉयल सोसायटीला कळवले. त्यांनी लक्षच दिलं नाही सुरुवातीला. पण तो तरुण प्रयोग करत राहीला. आणखी २३ जणांवर त्यानं याच पद्धतीनं प्रयोग केले. सगळ्यांचे निष्कर्ष असेच होते. एका बाजूला तो हे सगळं रॉयल सोसायटीला कळवत गेला. पण दुसरीकडे त्यानं स्वत: हे सगळं छापायचं ठरवलं. लॅटिन भाषेत गाईच्या त्या आजाराचं नाव वॅक्सिनिया. त्यानं नवा शब्द तयार केला “वॅक्सिन” म्हणजे लस.
नंतर तो तरुण आयुष्यभर लसींसाठीच जगला. पैसे नाही फार कमावले त्यानं. पण नाव मात्र मिळवलं. घर बांधलं. अंगणात स्वतसाठी एक झोपडं उभारलं. नाव दिलं लसगृह. तिथं गरीबांना तो मोफत लस टोचायचा. पुढे त्याच्या या तंत्राचा लौकिक लवकरच सर्वदूर पसरला. अनेक ठिकाणी युरोपात लोकं स्वत:मधे जिवंत विषाणू टोचून घ्यायला लागले. १८०० साली त्यानं ही सगळी माहिती आणि सोबत एक लशीचा नमुना आपले मित्र प्रा. बेंजामीन वॉटरहाउस यांना पाठवला. प्रा. बेंजामीन अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठात भौतिकशास्त्र शिकवायचे. त्यांनी हे तंत्र आपल्या न्यू इंग्लंड परगण्यात वापरून बघितलं. न्यूयॉर्कच्या जवळ असलेल्या या परगण्यात ती साथ होती. हे तंत्र तिथं कामी आलं. प्रा. बेंजामीन यांनी आख्ख्या कुटुंबाला या तंत्रानं वाचवलं.
हे जमतंय असं लक्षात आल्यावर त्यांनी याची माहिती दिली थेट थॉमस जेफर्सन यांना. हे जेफर्सन म्हणजे अमेरिकेचे नंतर अध्यक्ष झाले ते. त्यांनी कसलाही विचार न करता आपल्या मुलाबाळांसकट सगळ्यांवर हा प्रयोग करून पाहिला. तो अर्थातच यशस्वी झाला. तेव्हा त्याचं महत्त्व जाणणाऱ्या या द्रष्टय़ा नेत्यानं त्या तरुणाला अत्यंत उत्कट पत्र लिहिलं. इथे या भूतलावर हा असाध्य रोग होता, तो तुझ्या प्रयत्नामुळे हद्दपार झाला. पुढच्या पिढय़ा तुझ्या ऋणी राहतील. जेफर्सन यांचे शब्द खरे झाले. त्यांच्या पत्रानंतर साधारण दोन शतकांनी, १९८० साली पृथ्वीवरनं या आजाराचं पूर्ण उच्चाटन झालं.
हा आजार म्हणजे देवी. आणि त्या तरुणाचं नाव एडवर्ड जेन्नर.
आत्ता त्याची ही गोष्ट आठवायचं काही एक कारण आहे. ते म्हणजे ऑक्सफर्ड इथल्या एडवर्ड जेन्नर संशोधन केंद्रात सध्या जगाला ग्रासून राहिलेल्या करोना आजारावरच्या संभाव्य लशीच्या मानवी चाचण्या सुरू होतायत. आजच तिथे पहिल्यांदा कोणी तरी आपल्या शरीरात कोविड-१९ चा विषाणू टोचून घेईल. त्यातून लस तयार होईलही.
हे श्रेय त्या एडवर्ड जेन्नर याच असेल.
संग्राहक – विमल माळी
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈