मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कीर्तनाचा महिमा….अज्ञात ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ कीर्तनाचा महिमा…. अज्ञात ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

साधारणपणे   ८२- ८३ च्या सुमारास, भिंद्रानवाले पंजाबात आक्रमक होत असताना देशभरात खळबळ माजली होती. त्यावेळी पुण्यात  श्रीमती मंजुश्री खाडिलकर या कीर्तनकार म्हणून सुप्रसिद्ध होत्या. सुप्रसिद्ध गायक श्री त्यागराज यांच्या त्या मातोश्री. पंजाबात जाऊन भिंद्रानवालेला भेटून कीर्तनाच्या माध्यमातून त्याला देशद्रोहापासून परावृत्त करायचे असा एक कार्यक्रम पुण्यातील ज्ञान प्रबोधिनीने करायचा ठरवला. त्याकरता मंजुश्रीताईंना विचारण्यात आले. साथीला ज्ञान प्रबोधिनीतीलच काही मुलींना तयार केले होते. मुळात असा विचार करणे, ह्या सर्व स्त्रियांनी तिथे जाणे, हे त्यावेळी अत्यंत धाडसाचे होते, म्हणूनच इतकी चर्चा. 

आता पंजाबमध्ये जायचे म्हणजे किमान हिंदीतून कीर्तन करावे लागणार होते, त्यामुळे त्याची आधी तयारी करावी लागली. श्री गुरूवाणीमध्ये संत श्री नामदेव महाराज यांची अनेक भजने समाविष्ट आहेत त्यातील निवडक शब्द प्रॅक्टिससाठी घेऊन कीर्तने पुण्यात बसविली व तयार केली.

सगळ्या जणी पंजाबात गेल्या. भिंद्रानवालेला शोधण्यात व भेटण्यात खूप दिवस लागले.कारण सरकार त्याच्या मागावर असल्याने तो सतत मुक्काम बदलायचा. तरी नेटाने प्रयत्न करून त्याला गाठून निरोप दिला की आम्ही पुण्याहून आलोय. श्री नामदेवांचे शब्दकीर्तन तुमच्या समोर करायचे आहे.

तो पर्यंत पंजाबात जिथे शक्य होते तिथे त्यांनी आपले कीर्तन सादर केले. 

अखेर भिंद्रनवालेने कीर्तन सादर करायची परवानगी दिली. कडेकोट बंदोबस्तात हत्यारधाऱ्यांच्या समक्ष हा कार्यक्रम सुरु झाला. आईच्याच शब्दात सांगायचे तर हाडे थिजवणारे वातावरण होते.  

श्रीमती मंजुश्री खाडिलकर ह्यांनी कीर्तन सुरु केले व ज्या क्षणी नामदेवांचा अभंग म्हटला, त्याक्षणी त्याने त्याचे उच्चासन सोडले व श्रीमती खाडिलकरांच्या चरणी नतमस्तक झाला. अक्षरशः त्यांचे चरण पकडले त्याने ! 

त्या याच क्षणाची वाट पहात होत्या. त्यांनी भारतात शांती, एकत्व व सार्वभौमत्व राखण्याचे आणि  सलोखा राखण्याचे आवाहन त्याला केले. त्याच्या डोळ्यात पश्चात्ताप स्पष्ट दिसून येत होता. मान खाली घालून गुडघे टेकून जमिनीवर बसलेल्या त्याने परतीचे सर्व मार्ग बंद झालेले असल्याचे हतबलतेने सांगितले.

पण काम फत्ते झाले ! कारण त्याचे देशद्रोहाचे अवसान त्याच्या अंतर्मनातून गळून पडले ते कायमचेच. नंतर चकमकी झाल्या पण त्याचे अंतर्मन साथ देत नसल्याने त्याचा शेवटी पराजयच झाला. 

गायन कीर्तन कलेवर असामान्य प्रभुत्व असलेल्या, परप्रांतात जाऊन कलेचा प्रभाव पाडून भिंद्रानवालेचे  अवसान घालवणाऱ्या , शूर, धडाडीच्या व देशाबद्दल जाज्वल्य अभिमान असणाऱ्या  कीर्तनकार आदरणीय श्रीमती मंजुश्री खाडिलकर व हा कार्यक्रम आखणारा ज्ञानप्रबोधिनीचा स्टाफ व विद्यार्थिनी व इतर  सर्व  यांना शतश: प्रणाम…

(ज्या कोणी अज्ञात व्यक्तीने मुळात हा लेख लिहिला त्यांचेही आभार. )

(नटराज खाडीलकर यांच्या फेसबुक वॉलवरून साभार.)  

 – अज्ञात 

संग्राहक :– सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈