? इंद्रधनुष्य ?

☆ बारीपाडा…भाग -1  ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

वाचाच अन् लाजाही थोडं …

श्रीमंत लोक गरीब लोकांकडून काय शिकू शकतात?

जे लोक दिवस भरात २००रु ची दारु ३००रु ची कोंबडी फस्त करतात त्यांनी ?

बारीपाडा हे महाराष्ट्रातले एक छोटेसे गाव (ता. साक्री, जि. धुळे). पलीकडे गुजरातचा डोंगराळ डांग जिल्हा पसरलेला.

मागील महिन्यात शासन जेव्हा अन्नसुरक्षेच्या ‘भिकमाग्या’ विधेयकाची तयारी करत होतं तेव्हा हे गाव एका वेगळ्याच गडबडीत होतं. गेली दहा वर्षे वनभाज्यांची पाककला स्पर्धा या गावात आयोजित केली जाते. यावर्षी १८० स्त्रियांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. गावाची लोकसंख्या जेमतेम ७००. गावात १०० च्या जवळपास घरे. जवळपासच्या वाडी वस्त्यांमधील स्त्रियांनीही या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला. शहरी लोकांना माहित नसलेल्या जवळपास २७ भाज्या या बायकांनी शोधून काढल्या व त्या शिजवून स्पर्धेत मांडल्या.

एका म्हातार्‍या बाईला मी अन्नसुरक्षा विधेयकाबाबत विचारले. ती माझ्याकडे बघतच राहिली….

मी परत विचारल्यावर तिने साधा प्रश्न केला…. ‘ काय देवून राहिले भाऊ त्यात? ’

मी आपलं पोपटपंची केल्याप्रमाणे, ‘ १ रूपयाला ज्वारी/बाजरी, २ रूपयाला गहू, ३ रूपयाला तांदूळ ’ असं सांगितलं.

ती म्हातारी हसून म्हणाली, ‘ ज्वारी आमी खाईना, गहू बी जमत नाई.’ मला वाटले आता हिला तांदूळ तरी उपयोगी पडत असतील.

मी म्हणालो, ‘तांदूळ खाता ना तुम्ही?’

तिने मान डोलावली….. ‘ मग हा तांदूळ तूम्हाला मिळंल की खायला ’….मी.

म्हातारी परत माझ्याच तोंडाकडे टकामका बघत राहिली. ‘ त्यो तसला तांदूळ आमी खाईना.’

मला कळेना शासनाच्या या भिकमाग्या धोरणातील तांदूळात नाही म्हणण्यासारखं काय आहे?

मग मला बाजूला उभ्या असलेल्या एका तरूण पोरानं समजावून सांगितलं… ‘ साहेब, यांच्याकडं जो तांदूळ होतो त्याला आंबेमोहोरासारखा घमघम वास येतो. त्याचं नाव इंद्रायणी. हा तांदूळ हे लोक शेतात स्वत:पुरता घेतात. बाहेर फारसा विकतही नाहीत.’

मला वाटलं ही बाई शेतकरी असेल म्हणून हिला शासनाचा तांदूळ नको.

मग मी त्या तरूणाला विचारले… ‘ गावात इतर गोर गरीब असतील ना. त्यांना तर हे अन्न फायद्याचे ठरेल.’

त्या तरूणाने मला हाताला धरून जवळच असलेल्या ग्रामपंचायतीच्या एका सभागृहात नेले. अतिशय चांगले बांधलेले सभागृह. तिथे विविध माहितीचे फ्लेक्स लावून ठेवलेले होते. त्यात गावची लोकसंख्या, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या, असली बरीच माहिती होती. एका मोलाच्या माहितीकडे त्याने माझे लक्ष वेधले. त्याने काहीही न बोलताही माझे डोळे खाडकन उघडले.

तिथे लिहीलं होतं…. ” दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या शून्य “.

या छोट्या गावात जिथे एकही दोन मजली इमारत नाही, ग्रामपंचायतीचे सभागृह, शाळेच्या खोल्या सोडल्या तर एकही सिमेंटची इमारत नाही, तिथे हे गाव अभिमानाने सांगत आहे की आमच्याकडे कोणीही दरिद्री नाही.

— म्हणजे तिकडे दिल्लीला ‘ सगळा भारत कसा दरिद्री आहे आणि कसा भुकेने मरत आहे. त्याला कसे जगवले पाहिजे, ’ असं सर्व नेते सांगत आहेत. आणि इकडे महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरचे एक छोटेसे गाव अभिमानाने सांगत आहे की आमच्या गावात दारिद्य्ररेषेखाली कुणीच नाही.

गावात ४ थी पर्यंत शाळा. शाळेत जाणं प्रत्येक घरातील लहान मुलाला अनिवार्य केलेलं. शाळेत रजा न देता गैरहजर राहणार्‍या शिक्षकाला गावानं ५००० रूपयाचा दंड ठरवून दिला आहे. परिणामी इथे नौकरी करायला दांडीबहाद्दर मास्तर घाबरतात. गावात सर्वत्र सिमेंटचे रस्ते. व्यवस्थित नाल्या काढलेल्या. कुठेही घाण कचरा साठलेला नाही.

अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवक यांचे मोबाईल नंबर पंचायतीच्या भिंतीवर ठळकपणे लिहून ठेवलेले. सर्व योजनांची निधीची माहिती लिहून ठेवलेली.

मी विचारले, ‘ याची काय गरज? ’

माझ्या सोबतचा तरुण पोरगा म्हणाला… ‘ कुनीबी फोन लावून इचारू शकते ना भाऊ.’

म्हणजे इकडे दिल्लीला संसदेत विरोधी पक्षांनी गोंधळ घालावा म्हणून सत्ताधारीच प्रयत्न करतात. कारण काय तर गोंधळात महत्त्वाची विधेयके पटापट मंजूर करून घेता येतात. चर्चा होऊ देण्यापेक्षा गुपचूप वाच्यता न होऊ देता काम करण्यावर दिल्लीच्या राजकारणाचा भर. तर इथे एक छोटं गाव आपला कारभार स्वच्छपणे गावकर्‍यांसमोर मांडून पारदर्शी पद्धतीनं काम करत आहे.

क्रमशः… 

संग्राहिका : हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments