मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वृक्षवल्ली आम्हा…! ☆ श्री पंकज कोटलवार

?इंद्रधनुष्य? 

☆ वृक्षवल्ली आम्हा…! ☆ श्री पंकज कोटलवार ☆

वृक्षवल्ली आम्हा ‘डॉक्टरे’!..

आशिया खंडातील सर्वात पहिले आणि सर्वात मोठे मानसोपचार रुग्णालय चेन्नईमध्ये आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ’ अशा नावाने भारतात सूप्रसिद्ध असलेल्या या संस्थेला आता सव्वादोनशे वर्ष पूर्ण होतील.

गेल्या दहा वर्षांपासून या इस्पितळात वेगवेगळ्या मानसिक विकारांमूळे त्रस्त असणाऱ्या रूग्णांवर एक अनोखा प्रयोग केला जात आहे, आणि ह्या उपचारप्रणालीला प्रचंड यश मिळल्याने ती झपाट्याने लोकप्रिय होत आहे. या उपचारांना ‘ग्रीन थेरपी’ म्हणजे ‘हरित उपचार’ असे म्हणतात.

यामध्ये मनोविकारांशी लढा देणाऱ्या व्यक्ती आपला संपूर्ण दिवस इस्पिळाच्या विस्तीर्ण आणि हिरव्यागार बागेमध्ये काम करण्यास सांगितले जाते.

असे मनोविकाररूग्ण जे वर्षानूवर्ष कधी कोणाशीही बोलले नाहीत, हसले नाहीत, ज्यांच्या सर्व भावना आटून गेल्या होत्या, ज्यांची जगण्याची इच्छाच मरून गेली होती, असे वेगवेगळ्या प्रकारचे रूग्ण जेव्हा हिरवीगार पाने, रंगबेरंगी फूले आणि कोमल हिरवळीच्या देखभालीमध्ये आपला दिवस घालवतात, त्यांच्यात आश्चर्यकारक बदल पहायला मिळतो.

निसर्गाची जादू अशी की उदासिनता, निराशा आणि गंभीर डिप्रेशन यासारख्या गंभीर आजारांनी त्रस्त असणाऱ्या व्यक्तीदेखील निसर्गाच्या सानिध्यात आपली दूःखे विसरू लागतात.

त्यांच्या चित्तवृत्ती प्रफूल्लित होतात. त्यांच्यात काम करण्याचा उत्साह आणि जोम येतो. भूतकाळात त्यांच्या मनावर झालेल्या खोल जखमा देखील हळूहळू वेगाने भरू लागतात, काही महिन्यांनी तर त्या जखमांचे व्रणही शिल्लक राहत नाहीत. जणू काही त्या व्यक्तीचा नवा जन्मच होतो.

ही निसर्गाची अद्भूत किमयाच म्हणावी लागेल की, केवळ काही महिने दररोज बागकाम केल्यामूळे माणसाच्या वाईट आठवणी पूसल्या जाऊन त्या रूग्णांमध्ये आनंदाचा झरा निर्माण होतो.

ज्यांनी वर्षानूवर्ष आपल्या मनोविकारांसाठी गोळ्या औषधे घेतली पण म्हणावा तसा फायदा झाला नाही, अशा रूग्णांचा देखील हरित उपचारांमूळे कायापालट झाल्याची अनेक उदाहरणे इथे पहायला मिळतात.

या संस्थेच्या संचालिका पूर्णा चंद्रिका सांगतात की मनोविकार रूग्णांनी ग्रीन थेरपीनूसार ठरवून दिल्याप्रमाणे नियमित बागकाम केल्यामूळे त्यांच्यातली एकाग्रता वाढल्याचे दिसून आले, फूप्फूसांना शूद्ध हवा मिळते, मेंदूला चांगल्या प्रमाणात ऑक्सीजन मिळतो. बागकामामूळे मनामध्ये आणि शरीरामध्ये उर्जेचा संचार झाल्याचा अनूभव येतो. त्यांचा मूड छान राहतो. चिडचिड, रागराग, कटू आठवणी, द्वेषभावना, संताप कूठल्याकूठे गडप होतात, न्युनगंड, भयगंड विरघळून जातात. निराशा, डिप्रेशन पळून जातात. रूग्णांनी सकारात्मक प्रतिसाद द्यायला सूरूवात केली की गोळ्याऔषधे देखील प्रभावीपणे आपले काम बजावतात आणि जलदगतीने रूग्ण बरा होण्यात यश मिळते.

बागकाम करून मनोविकारांना बरे करण्याची संकल्पना निजहल शोभा नावाच्या एका ट्रस्टमूळे इथे रुजली. २००७ मध्ये निजहल शोभा या संस्थेच्या प्रमूख शोभा मेनन सांगतात की हिरव्या हिरव्या वृक्षांमध्ये, त्यांच्या कोवळ्या पानांमध्ये, इथल्या रंगबेरंगी फूलांमध्ये आणि या चवदार फळांमध्ये निश्चितच मनाला प्रसन्न करण्याची जादू लपलेली आहे. फक्त मनोरूग्णांनीच नाही तर आनंदी जीवनाची आस असलेल्या प्रत्येक व्यक्तीने दररोज आपला काही वेळ अशा बागेमध्ये व्यतित केला पाहिजे. दिवसातून काही वेळ बागकाम करणे हे एक प्रकारे मनाच्या बॅटरीला रिचार्ज केल्यासारखे आहे. यातून मनाला सूखद गारवा मिळतो. आत्म्याला थंडावा मिळतो. निसर्ग आपल्याला एका अनामिक तृप्ततेची जाणीव करून देतो. एका आंतरिक शांततेची अनूभूती देतो. हा आनंद शब्दात वर्णन करण्यापलिकडचा आहे. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला या ग्रीन थेरपीची गरज आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून निजहल चेन्नईमधील सार्वजनिक हरितपट्ट्यांचे जतन आणि संवर्धन करत आहे. हरित उपचारांचे महत्व पटल्यामूळे निजहलसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांची वर्षागणिक वाढत गेली. आज मोठ्या संख्येने लोक वृक्षारोपणासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी एकत्र येतात. आधी त्यांना वाटायचे की आपण सामाजिक काम करत आहोत, पण आता ग्रीन थेरपी हा मनाला प्रसन्न करणारा उपचार असल्याचा अनूभव आला आहे.

आजकाल डॉक्टर आणि हॉस्पिटल म्हणलं की आपल्या पोटात गोळाच येतो, एखाद्या थ्री स्टार हॉटेलला लाजवतील, अशा अलिशान इमारती, तिथलं चकचकीत फर्निचर, लॉजसारख्या अलिशान खोल्या, तिथल्या सूखसूविधा, आवाक्याबाहेरचे उपचार, डोळे पांढरे होतील इतकी महाग औषधे, पांढरे कोट घालून सेवाभावाच्या गोंडस पांघरणाखाली पेशंटला मनसोक्त लूटणारी टोळी, एवढेच चित्र डोळ्यासमोर उभे राहते.

इंजेक्शन आणि सलाईनच्या सूया खूपसून हॉस्पीटलच्या पलंगावर लोळत पडणे, आणि भरमसाठ गोळ्या औषधांचा मारा सहन करणे हीच आज सर्वात मोठी मानसिक, शारिरीक आणि आर्थिक शिक्षा झाली आहे. जो स्वतःच्या शरीराची, प्रकृतीची हेळसांड करतो, त्या प्रत्येकाला भविष्यात त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागते.

त्यापेक्षा सजग राहून स्वतःच्या आरोग्याची आणि पर्यायाने स्वतःच्या मनाची निगा राखणे हाच पर्याय आपण निवडायला हवा.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, असे आपले साधूसंत सांगून गेले, पण हे वृक्षवल्ली नूसतेच सोयरे नाही तर किती चांगले डॉक्टर आहेत हे अनूभवण्यासाठी तरी आपण दिवसातून थोडा वेळ का होईना, बागकामामध्ये स्वतःला झोकून दिले पाहिजे.

 

©️ पंकज कोटलवार

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈