मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वक्रतुंड महाकाय – श्री हेमंत कुलकर्णी ☆ संग्राहक – सुश्री भावना दांडेकर

?इंद्रधनुष्य?

☆ वक्रतुंड महाकाय – श्री हेमंत कुलकर्णी ☆ संग्राहक – सुश्री भावना दांडेकर ☆

वैशाली प्रसाद पराड़कर जोग यांनी त्यांच्या एका टिपणीमध्ये या सुप्रसिद्ध श्लोकाचा अर्थ दिला होता. श्रीनिवास चितळे यांनी नेमका वक्रतुंड या शब्दाचाअर्थ विचारला. वैशाली प्रसाद पराड़कर जोग  यांनी आपल्या मूळ टिपणीप्रमाणेच “वाकड्या तोंडाचा” असा अर्थ सांगून वर “सोपा आहे” अशी पुष्टी जोडली. यावर श्रीनिवास चितळे यांनी या शब्दाचा खरा अर्थ “वक्रान् तुण्डयति”(वाकड्या माणसांना शासन करणारा)असा आहे असे स्पष्ट केले.यावर वैशाली प्रसाद पराड़कर जोग यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

यावरून माझ्या आयुष्यात घडलेला एक किस्सा आठवला.

जन्मापासून सत्तावीस वर्षं मी बेळगावातच होतो.त्यावेळी केवळ आमच्या घरातच नव्हे तर आजूबाजूलाही धार्मिकच वातावरण होतं.भजन-कीर्तन-प्रवचन-पूजा यात दिवस कसा गेला हे कळतही नसे.पण सर्वत्र वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा असंच सांगितलं जायचं.संस्कृतचं थोडंफार ज्ञान असूनही हा अर्थ कधीही चुकीचा वाटला नाही. किंबहुना त्यामुळेच या शब्दाचा हा अर्थ योग्य आहे हे समजलं होतं.

देवाला त्याचा भक्त असं कसं म्हणेल हा प्रश्नच मला कधी पडला नाही.कारण संत तुकाराम महाराजांची बायको आवली हि विठ्ठलाला काळतोंड्या म्हणत असे हे सर्वश्रुत होतं. तसेच विठ्ठलाच्या भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ गणले गेलेले संत नामदेव महाराज यांचा पुढील अभंग प्रसिद्धच आहे.

“पतितपावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा

पतितपावन न होसि म्हणुनी जातो माघारा

घेसी तेंव्हा देसी ऐसा अससी उदार

काय देवा रोधू तुमचे कृपणाचे द्वार

सोडि ब्रीद देवा आता न होसी अभिमानी

पतितपावन नाम तुजला ठेवियले कोणी ”

याशिवाय नवविधा भक्तीमध्ये विरोधी भक्ती हीसुद्धा समाविष्ट आहे हेही मला माहीत होतंच.त्यामुळे या अर्थाचा मी पूर्णपणे स्वीकार केला होता.

१९७२ साली मला पोटासाठी बेळगाव सोडून मुंबईत स्थायिक होणं भाग पडलं.

त्याच वर्षी दादरच्या शिवाजी उद्यानात दिलेल्या प्रवचनात पं.सातवळेकर यांनी वक्रतुंड या शब्दाचा खरा अर्थ “वक्रान् तुण्डयति”(वाकड्या माणसांना शासन करणारा)असा आहे असे सांगितले.यामुळे माझ्या मनात (भावनिक नव्हे पण बौद्धिक) हलकल्लोळ माजला.जोपर्यंत एकच अर्थ माहित होता तोपर्यंत तोच स्वीकारार्ह वाटत होता.पण दुसरा अर्थ समजल्यावर कोणता अर्थ बरोबर आहे हे निश्चित केल्याशिवाय माझ्या जन्मजात कन्याराशीजन्य चिकित्सकपणाला चैन पडणे शक्य नव्हते.एका बाजूला आयुष्यभर ऐकलेले अनेक प्रवचन-कीर्तनकार व दुसऱ्या बाजूला एकटेच पं.सातवळेकर असले तरी कॊणाच्याही प्रभावाखाली निर्णय घेणे हे माझ्या स्वभावाविरुद्ध होते.तसेच या बाबतीत पुरेसे पुरावे गोळा करणे हे माझ्या जन्मजात आळशीपणाला परवडणारे नव्हते.त्यामुळे हा प्रश्न तर्काने सोडवणे याला पर्याय नव्हता.त्यामुळे मी पुढीलप्रमाणे तर्क केला.

गणपतीचे शीर हत्तीचे आहे हे सर्वज्ञातच आहे.यामुळेच त्याची गजानन,गजवदन,गजमुख,गजवक्त्र,गजास्य,गजतुंड अशी अनेक नावे प्रचलित आहेत.जर वक्रतुंड या शब्दातील तुंड या पदाचा अर्थ तोंड असा असेल तर वरीलप्रमाणे गणपतीचीवक्रानन,वक्रवदन,वक्रमुख,वक्रवक्त्र,वक्रास्य ही नावेदेखील प्रचलित झाली असती.पण ही नावे प्रचलित तर सोडाच,पण निदान माझ्यातरी ऐकिवातही नाहीत.शब्दांचे खेळ मांडण्यात धन्यता मानणाऱ्या संस्कृतभाषेत हे स्वाभाविकही नाही.त्यामुळे तुंड हे पद तोंड या अर्थी नाही हा एकच निष्कर्ष निघू शकतो.म्हणजेच वक्रतुंड या शब्दाचा खरा अर्थ “वक्रान् तुण्डयति”(वाकड्या माणसांना शासन करणारा)असा आहे हे निस्संशय.

वाईट इतकंच वाटतं कीं,इतका काळ लोटल्यावरही लोकांच्या मनात चुकीचाच अर्थ रुजलेला आहे.आशा आहे कीं,लवकरच सर्वांना खरा अर्थ समजेल.

– श्री हेमंत कुलकर्णी

संग्राहक:  सुश्री भावना कांडेकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / सौ. मंजुषा मुळे ≈