मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका मोटरमनचं आयुष्य ☆ संग्राहक – सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ एका मोटरमनचं आयुष्य ☆ संग्राहक – सुश्री मीनल केळकर☆

एक मोटरमन ( लोकल ट्रेनचा ड्रायव्हर) याने हे लिहिले आहे

शेवटची लोकल निघते सीएसटीवरून 12. 37 ला. आणि शेवटची पोहोचणारी लोकल असते 1. 38 ची. 12 वाजून 37 मिनीटांनी निघालेली लोकल तीन च्या दरम्यान पोहोचते कर्जत ला. तिथून ती रिटर्न निघते साधारण साडे चारला. मधल्या काळात मोटरमन आणि गार्ड आराम करतात ते त्यांच्यासाठी खास बनवलेल्या रेस्ट रुम मध्ये. तसं प्रत्येक मोटरमन आणि लोकल गार्ड यांच्यासाठी ड्युटी अवर्स असतात अधिक तम 6ते8तास. हे तास ट्रेनच्या रनिंग टाईमनुसार मोजले जातात. त्यात ट्रेन कुठे किती वेळ थांबली वगैरे ग्राह्य धरलं जात नाही. पण त्या  तासात पूर्ण वेळ डोळ्यात तेल घालून एकटक एका नजरेनं एका दिशेत पाहत राहणं, योग्य अंतरावर प्रॉपर नोटिफिकेशन देणं, दर चारशे मीटरवर येणाऱ्या सिग्नलला तपासणं शिवाय प्रत्येक स्पीड इंडिकेटरवर लक्ष ठेऊन स्पीड मेंटेन करणं अतिशय महत्त्वाचं असतं. रात्रीच्या वेळेस हे काम फार जिकीरीचं असतं. जर स्पीड 40 ऐवजी 42 वर जरी गेला तरी मोटरमन आणि गार्ड यांना कंट्रोल रुमकडून ताकीद जाते. ड्युटी संपल्यावर त्याचं लेखी कारण द्यावं लागतं. एखाद्या वेळेस मोटरमन कडून सिग्नल असताना जरी ट्रेन क्रॉस केली गेली तर अवघ्या पाचशे मीटर अंतर पुढे गेल्यावर ट्रेन आपोआप बंद होते. नवीन मोटरमन बोलावला जातो. चूक झालेल्या मोटरमनला आणि गार्डला आधी सस्पेंड केलं जातं मग चौकशी आयोगाला सामोरं जावं लागतं. चौकशी आयोगाच्या फेऱ्यात रेल्वे कर्मचारी अडकला की त्याचं त्यातून सुटणं मुश्किल असतं. तर ह्या अशा वाहनचालकांच्या बाबतीतलं थोडंसं.

मी अनेकदा यांच्या रेस्ट रुम मध्ये शिरून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. स्वभावाने बरे असतात. पण अबोल असतात. रोज रोज एकच रस्ता. तेच रुटीन, तेच सिग्नल, तेच काम त्यांच्या स्वभावाच्या एकसुरीपणाला कारणीभूत असेल असं वाटलं होतं. पण खरं कारण वेगळंच होतं. त्यातील काहींनी सांगितलेलं कारण फार भयानक होतं. प्रवाशी फुटओव्हर ब्रीजचा वापर करत नाहीत. अपघात होतात. वारंवार हाय डेसीबलचा हॉर्न वाजवून आमच्या कानांचे पडदे फाटतात पण बेजबाबदार प्रवाशांना स्वतःची काळजी करावीशी वाटत नाही. काही लोक आत्महत्या करण्यासाठी लोकलसमोर निर्धास्त होऊन उभे राहतात. काही मान रुळावर ठेऊन झोपून जातात. काही संडास करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर बसतात ते ही कानाला हेडफोन लावून. रेल्वे क्रॉसींग करताना कानात हेडफोन लावतात. त्यांचं चिरडलं जाणं, कापलं जाणं, तुकडे तुकडे पडलेले शरिर आम्हाला दर दोन तीन दिवसाआड एकदा तरी पहावंच लागतं. जेव्हा जेव्हा कुणी आत्महत्या करतं, ट्रेनमधून पडून मरतं, क्रॉसिंगच्या वेळेस मृत्यूमुखी पडतं तेव्हा आमचं हृदय काही काळासाठी स्टॉप झालेलं असतं. पण ट्रेन चालू असते. लगेच भानावर यावं लागतं. डोळे सुद्धा मिटता येत नाहीत. सिग्नल चुकवायचा नसतो. नाहीतर मोठ्या अनर्थाला सामोरं जावं लागू शकतं. पाहीलेला आघात कडु घोटासारखा गिळून घ्यावा लागतो. थोडा वेळ ही मिळत नाही सावरायला.

एकदा मोटरमनच्या कोचमधून प्रवास करत असताना एका मुलाने अगदी ऐन वेळेला ट्रॅक क्रॉस केला. थोडक्यात बचावला. ट्रेन साधारण ऐंशीच्या स्पीडला होती. मोटरमन भलताच वैतागला. खिडकीच्या बाहेर डोकं काढून त्या पोराला मजबूत शिव्या हासडल्या. म्हणाला, मादरचोद मेरी ही ट्रेन मिली थी क्या तुझे मरने के लिए? त्याचं हे बोलून होईपर्यंत गाडी बरीच पुढे निघून गेली होती. त्याचं बोलणं काय त्या मुलाला ऐकू जाणार नव्हतं. पण तरी मनातला राग व्यक्त करण्याचा त्याचा हा प्रकार होता. (शुभ अप झालेला BP नाॅमल करण्याचा प्रकार समजा हव तर)असो..

लास्ट लोकल च्या प्रवासात रुटीन अपघात होत असतात. कुणी दारातून पडतं तर कुणी ट्रेन पकडण्याच्या नादात तरी पडतं. तर कुणी लोकल सायडींगला लावल्यावर झोपायला मिळावं म्हणून अपोझिट साईडनं चालती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात तरी चाकांमध्ये अडकतं. काही पोलिसांचा अटकाव नको म्हणून टपावर लपून बसतात. काही कपलिंगच्या स्पेस मध्ये लपतात. लपणारे, चढणारे तीनेक तासांसाठी आसरा शोधत असतात. काहींना गर्द घ्यायची असते,…

संग्राहक – सुश्री मीनल केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈