सुश्री सुलू साबणे जोशी
इंद्रधनुष्य
☆ बहुता सुकृताची जोडी : वय केवळ ११७ वर्षे… श्री किशोर पौनीकर नर्मदापूरकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
केंद्रीय रस्ते विकास मंत्री श्री नितीनजी गडकरींनी नर्मदा परिक्रमा मार्गात रस्ते बांधतो म्हटल्यावर, परिक्रमा मार्ग हा पारंपरिक पद्धतीचाच असावा, असा आग्रह करणारा लेख मी लिहिला होता. तो अनेकांना आवडला व भरपूर शेअर, फाॅरवर्ड झाला. लगोलग तिसऱ्याच दिवशी नर्मदा परिक्रमा क्षेत्रातील काही परिक्रमींच्या गैरवर्तणुकीवरही लेख लिहावा लागला. हा लेख सपाटून शेअर व काॅपी पेस्ट झाला. ‘साम टीव्ही मराठी’ वर माझी मुलाखतही झाली. गेल्या चार दिवसांपासून सकाळी ८.०० ते रात्री ९.३० फोन सतत वाजतोय. व्हाॅटस् ॲपवरही कितीतरी मेसेजेस येत आहेत.
असाच एक मेसेज आला…
डाॅक्टर स्वामी केशवदास, करनाली तालुका, डभोई जिला, बड़ौदा, गुजरात
— इतक्या फोन व मेसेजमध्ये या मेसेजकडे विशेष लक्ष जाणे शक्यच नव्हते. त्यांना विचारले, “आपल्याला मराठी येते का?” – तर ते म्हणाले की, ” गुजराती/हिंदी/इंग्लिश/तमिल/तेलगु/कन्नड़ भाषा अच्छी तरह जानते है। मराठी समझता हूं, पर बोल नहीं सकता !”
मी त्यांना माझे नर्मदामैय्यावरील काही हिन्दी लेख पाठवले. त्यांनी माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली.
(सतत फोन व मेसेजमध्ये गुंतून दुर्देवाने मी कोणाशी चॅटिंग करत आहे, हे मला माहितच नव्हते.) मी त्यांना म्हणालो की, ‘ केव्हाही फोन करा.’
आज त्यांचा मेसेज आला की, ते रात्री ८.३० नंतर मला फोन करतील. फोन तेच करणार होते, त्यामुळे मला चिंता नव्हती. नर्मदाप्रेमी अलग अलग बंधुभगिनींचे फोन व मेसेज सुरूच होते.
रात्री ९.३० ला फोन वाजला. हा नंबर व्हाॅटसॲप चॅटिंगमुळे माझ्याजवळ सेव्ह होता. स्क्रीनवर नाव आले – #स्वामी_केशवदास, बडोदा, गुजरात.#- मी फोन सुरू केला. अंदाजे ६५ वर्षे वय असलेला तो आवाज वाटला. मी बोलणे सुरू केले. स्वामीजींचेही बोलणे सुरू झाले. त्यांना माझा ‘गडकरींवरील लेख’ व ‘परिक्रमाकी बेधुंद तमाशे’ हे दोन्हीही लेख फार आवडले होते. त्यांनी माझी ‘साम टीव्ही मराठी’ वरील लाईव्ह मुलाखतही बघितली होती. मुलाखत संपल्यावर लगोलगच त्यांनी मला फोन लावला होता. पण तेव्हा माझा फोन सतत बिझी असल्याने आमचे बोलणे झाले नव्हते. म्हणून त्यांनी मला मेसेज केला होता. स्वामीजींना बोलतं करावं म्हणून मी काही प्रश्न विचारले व त्या दरम्यान ते बोलत असतांना दर वाक्यागणिक थक्क होण्याची वेळ माझ्यावर आली होती.
म्हैसूरला जन्म झालेले स्वामीजी प्रख्यात डेहराडून स्कूलमध्ये शिकले व नंतर ब्रिटनमध्ये ते वयाच्या ६७ वर्षांपर्यंत प्रख्यात ‘हार्ट सर्जन’ म्हणून कार्यरत होते. अमाप पैसा कमावला. त्यांनी लाहिरी महाशयांकडून क्रियायोगाची दिक्षा घेतली आहे.
मी सहजच त्यांना विचारले, ” स्वामीजी, आपने नर्मदा परिक्रमा कब की?”
” १९५६ में ” ते म्हणाले व मी एकदम उडालोच….
” स्वामीजी आपकी उम्र कितनी है?” मी आतुरतेने नव्हे, अधिरतेने विचारले…
” ११७ वर्ष “
“क्ऽक्ऽक्ऽक्ऽक्या????” मी जवळपास किंचाळलोच. चौथ्या मजल्यावरच्या गॅलरीत उभा राहून बोलणारा मी, मला कोणीतरी १०० व्या मजल्यावर पॅरापेट वाॅल नसलेल्या गॅलरीत उभे केलेय, अशा चक्रावलेल्या अवस्थेत होतो.
मला, मी काहीतरी चुकीचेच ऐकत आलो, असे वाटत होते. मी पुन्हा त्यांना विचारले, “आपका जन्म वर्ष कौनसा है?”
“सन १९०५” ते उत्तरले.—- माझे वय वर्ष ५७ होत असल्याने, आता बरीच कामं कमी करावीत, अशा सर्वसामान्य मराठी विचारांचा मी, मनातल्या मनात तुटक गणित मांडू लागलो… १९०५ ते २००५ म्हणजे १०० वर्षे. २००५ ते २०२२ म्हणजे १७ वर्षे… म्हणजे ११७ वर्षे बरोब्बर होते.
गॅलरीत वाहत असलेल्या हिवाळी थंड हवेतही मला घाम आला…
तिथूनच मी नर्मदामैय्याला व मला घडवणाऱ्या वैनगंगेला नमस्कार केला…. एक साधी यःकश्चित व्यक्ती मी, ४५ वर्षे विदेशात विख्यात हार्ट सर्जन म्हणून काम केलेल्या, ११७ वर्षांच्या विभूतीने मला स्वतःहून फोन करून ‘ तुमचे व माझे विचार एकसारखे आहेत ‘, हे म्हणावे…. मी पुन्हा चक्रावलो होतो.
पण…
माझे हे चक्रावणे एवढेच असावे, असे जे वाटत होते, ते त्यांच्या दर वाक्यागणिक वाढतच होते.
मी त्यांना त्यांच्या आश्रमाबद्दल विचारू लागलो. मला वाटले की एक हाॅल व कुटी, असे काहीसे ते सांगतील…
ते म्हणाले, ” नर्मदाजीके दोनों तट मिलाकर हमारे सात आश्रम है, पर हर आश्रममें मंदिर बनानेकी जगह मैने २००, २५० काॅटके अस्पताल बनवाये है। पर इस कारण आप मुझे नास्तिक मत समझना।”
— त्यांच्या आश्रमाचे सेवाकार्य ते सांगू लागले, ” हमारे तीन आश्रममेंही नर्मदा परिक्रमावासी आते है, बाकीमें अस्पताल, क्रियायोग साधना व स्वावलंबनके कार्य चलते है। हमारे किसीभी आश्रममें दानपेटी नहीं है, न ही हमने कोई रसिदबुक छपवाये है। हमारे ट्रस्टमें जो पैसा है, उसके ब्याजपर हमारे सब कार्य चलते है।”
— मी जे ऐकत होतो, ते सर्व भव्य-दिव्य व व्यापक होते… स्वतःच्या आकलनशक्तीची संकुचितता मला कळली होती. मी हतबल होतो की दिङ्मूढ, हेच मला कळत नव्हते. काहीतरी बोलायचे म्हणून मी बोललो, “आपकी हिन्दी तो बहुत अच्छी है, आप दक्षिण भारतीय नहीं लगते।”
ते म्हणाले, ” हां, ठीक पहचाना, वैसे हम उत्तर भारतीय है। मेरे पिताजी मैसुरके महाराजाके कुलपुरोहित थे।”
अजून एक मोठा धक्का मला बसायचा बाकी आहे, हे मला माहीत नव्हते…
मी विचारले, “आपके दादाजी कौन थे?”
” पंडित मदन मोहन मालवीय ! “
“क्ऽक्ऽक्ऽक्ऽक्या?” आपण कितव्यांदा आश्चर्यचकित होत आहोत, हे मोजणे मी बंद केले होते.
“महामना पंडित मदन मोहन मालवीय?” न राहवून मी त्यांना पुन्हा विचारले.
” हां! मेरे दादाजी बॅरिस्टर थे….” – ते महामना पंडित मदन मोहन मालवीयांबद्दल सांगू लागले.
थोड्या वेळाने त्यांनी आपली गाडी पुन्हा नर्मदा परिक्रमेकडे वळवली. म्हणाले, “आप परिक्रमाके बारेमें जो आग्रह कर रहे है, वह बहुतही सटिक है। गुरूआज्ञाके बिना नर्मदा परिक्रमा करना मात्र चहलकदमी ही है! “
मग ते मराठी परिक्रमावासी व त्यांचे वागणे, परिक्रमेत शूलपाणी झाडीतून जाण्याचा अवास्तव आग्रह, शूलपाणीतील सेवाकेंद्रांची काही गडबड, असे बोलू लागले. पुढे ते म्हणाले, ” मैं अब तक खुद होकर केवल ” राहुल बजाज ” से फोनपर बात करता था। आपके परिक्रमापरके लेख व परिक्रमा फिरसे अध्यात्मिकही हो, यह आपका प्रयास मुझे बहुत भाया। इसलिये आज मै आपसे खुद होकर फोनसे बात कर रहा हूं।”
नर्मदामैय्या अनाकलनीय चमत्कार करत असते, हे मला माहीत होते. यातले काही माझ्या वाहन परिक्रमेत मी अनुभवले होते. पण ती सामाजिक जीवनातही चमत्कार करते, हे मला या वर्षीच्या ४ ते ८ फेब्रुवारी दरम्यान कळले होते. होशंगाबादचे नामांतरण ‘ नर्मदापुरम् ‘ होण्याचे पूर्ण श्रेय तिने मला त्या भव्य मंचावर मुख्यमंत्री, खासदार व आमदारांच्या सोबत बसवून दिले होते. आणि आता राहुल बजाज यांचेशिवाय स्वतःहून कोणालाच फोन न करणारे स्वामी केशवदास, माझ्याशी स्वतःहून फोनवर बोलत होते.
मी पण नर्मदेच्या या चमत्काराचा फायदा घेतला. त्यांना म्हणालो की, ” परिक्रमेतील वाढत्या गर्दीमुळे वमलेश्वरला (विमलेश्वर) परिक्रमावासींना तीन – चार दिवस अडकून पडावे लागते. त्यांच्यासाठी विमलेश्वर गावाअगोदर अंदाजे १५०० परिक्रमावासी राहू शकतील असा आश्रम बनवायला हवा, जेणेकरून नावाडी व ट्रॅव्हल कंपन्यांच्या साट्यालोट्यांचा त्रास – पायी व छोट्या वाहनाने परिक्रमा करणाऱ्यांना होऊ नये. तसेच आज केवळ १२ नावा चालतात, त्या वाढवून किमान २५ तरी व्हाव्यात.”
स्वामीजी म्हणाले, ” अभी गुजरातमे चुनावका मौसम चल रहा है। चुनाव होनेके पंद्रह बीस दिन बाद अपन उस समयके मुख्यमंत्रीसेही सीधी बात करेंगे। विमलेश्वरमें बडा आश्रम तो हम खुदही बना देंगे।”
गेल्या दोन दिवसांपासून वमलेश्वर / विमलेश्वरच्या गर्दीमुळे मी फारच चिंतित होतो. यावर काय तोडगा निघू शकतो? म्हणून मी भरपूर जणांना फोन केले होते. आपण यावर काय करू शकतो? हे चाचपडणे सुरू होते.
अशा वेळी नर्मदेने त्या क्षेत्रातला सुप्रीम बाॅसच माझ्याकडे पाठवून दिला. ११७ वर्षांचा हा तरुण आपल्या वयाच्या अर्ध्याहूनही लहान, नाव किशोर पण स्वतःला प्रौढ समजायला लागलेल्या मला, नर्मदाप्रेरित सामाजिक कार्यासाठी नवचैतन्य भरत होता. ……
… नर्मदामैय्याके मनमें क्या चल रहा है, यह तो बस वहीं जानती है!
नर्मदे हर! नर्मदे हर ! नर्मदे हर !
– श्री किशोर पौनीकर नर्मदापूरकर, नागपूर
संग्रहिका : सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
केवळ अविश्वसनीय! खरच वाचताना एकामागोमाग एक धक्के बसतात. या काळात अशी प्रसिद्धीपराङमुख माणसे अस्तित्वात आहेत व समाजकारणात कार्यरत आहेत हे आपले भाग्यच.