डाॅ.भारती माटे
इंद्रधनुष्य
☆ लामणदिवे: श्रीमती सुमती बाबुराव फडकेबाई – भाग – 1 – लेखक – श्री सदानंद कदम ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆
सांगलीत अखिल भारतीय साहित्य संमेलन भरणार होतं. संमेलनाची स्मरणिका आणि त्या अनुषंगानं प्रकाशित करावयाच्या काही पुस्तिका यांचं संपादन करण्याच्या कामात मी सहभागी होतो. त्या पूर्वीची संमेलनं आणि त्यावेळच्या अध्यक्षांनी केलेल्या भाषणांमधील उताऱ्यांची एक पुस्तिका काढायची होती. त्यासाठी जुन्या कागदपत्रांचा पसारा मांडला होता. माध्यमांमधूनही तसं आवाहन करण्यात आलं होतं. ते वाचून एक आजी भेटायला आल्या होत्या.
श्रीमती सुमती बाबुराव फडकेबाई
ऐंशी ओलांडून गेलेल्या त्या आजी. किरकोळ देहयष्टीच्या. गोऱ्यापान. सुती पातळातल्या. हातात एक कापडी पिशवी. त्यात कोंबून भरलेली वृत्तपत्रांची कात्रणं. या आजींनी पिशवीतून काय आणलं असावं या विचारात पडलेला मी.
आजींनी बैठक मारली आणि पोतडीतली कात्रणं बाहेर काढून माझ्यासमोर ठेवत त्या म्हणाल्या, “ही गेल्या पन्नास वर्षांतली कात्रणं. त्या त्या वेळच्या साहित्य संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचे वृत्तांत यात छापून आलेत. ही कात्रणं ताब्यात घ्या आणि मुख्य म्हणजे तुमचं काम झालं की मलाच परत द्या.”
मी ते घबाड लगेच ताब्यात घेतलं. आजींचा पत्ता लिहून घेतला आणि त्यांना निरोप दिला. ज्या वयात हरिकीर्तन करत किंवा दूरदर्शनवरच्या धार्मिक मालिका पाहत घरी बसायचं, त्या वयात आजी कात्रणांचं हे बाड घेऊन दोन किलोमीटर चालत आल्या होत्या आणि त्या चालत गेल्याही. तेव्हाच ठरवलं आजींच्या घरी जायचंच.
दोन दिवसांनी मी आजींच्या घरी. आजी बाहेरच्या खोलीत कातरी, पुठ्ठे घेऊन बसलेल्या. भोवती मराठी-इंग्रजीमधली अनेक दैनिकं. माझं कुतूहल वाढलेलं.
“काय करताय?”
माझं स्वागत करून मला बसायला खुर्ची देत त्या म्हणाल्या, “अहो, वेगवेगळ्या विषयांवरची कात्रणं काढून ती पुठ्ठ्यावर डकवतेय. विषयवार गठ्ठे तयार करत बसलेय. गेल्या पन्नास वर्षांचा हा रोजचा उद्योग.”
“आणि अशा पुठ्ठ्यांचं काय करता? काय उपयोग?”
“मी शिक्षक होते. आता निवृत्त. सेवेत असताना या संग्रहाचा खूप उपयोग व्हायचा वर्गात शिकवताना. आता असे विषयवार गठ्ठे बांधून ठेवलेत. ज्यांना हवेत त्यांनी न्यावेत. काम झालं की परत आणून द्यावेत.”
मी गठ्ठे पाहूनच हबकलो. जवळपास वीस-पंचवीस विषयांवरची ती कात्रणं. हजारावर पुठ्ठे. त्यावर ती कात्रणं चिकटवलेली. लहान मुलांच्या चित्रांपासून, मोठमोठ्या इमारतींच्या चित्रांपर्यंत आणि भाषा-कला-साहित्य पर्यावरणापासून सर्व विषयांवरचे लेख. पुठ्ठेही एकाच प्रकारचे, नीट कापलेले. कपाटांतही असेच पुठ्ठे ठेवलेले. प्रत्येक कप्प्यावर आत कुठला विषय आहे त्याच्या नावाच्या चिठ्ठ्या लावलेल्या. स्टीलची सहा फूट उंचीची तीन कपाटं भरलेली. एरवी साड्यानं कपाटं भरतात बायकांची हे बघण्याची सवय. मला एखाद्या संदर्भ ग्रंथालयात गेल्यासारखंच वाटत होतं.
“पुठ्ठे एकसारखे कसे? कुठून आणता?”
“प्रेसमधून विकत आणते.”
“हा खर्च कशासाठी?”
“अहो, मुलींच्या हातात हे पुठ्ठे पडले की त्यांच्या डोळ्यांतल्या बाहुल्या नाचू लागतात. त्यांचा अवघा देह शिकण्यातला आनंद घेताना दिसतो. जाणवतं आपल्याला ते. माझ्यादृष्टीनं तो आनंद महत्त्वाचा. माझी ऊर्जा वाढविणारा. मुली अशा बहरताना पाहणं यासारखं सुख नाही.”
कधीकाळी प्रबोधनाचं काम करणारी वृत्तपत्रं हल्ली ‘कूपन संकलन स्पर्धा’ घेतात. पोळपाट-लाटण्यापासून कुकर पर्यंतची बक्षीस जाहीर करतात. ती मिळवण्यासाठी अनेकांची धडपड. घरी वृत्तपत्र न घेता शाळेतल्या दैनिकांतली कूपनं कापून नेणाऱ्या माझ्या शिक्षक भगिनी माझ्या डोळ्यांसमोर नाचू लागल्या. घरी एकही दैनिक न घेणारे शिक्षक बांधव माझ्याभोवती फेर धरून उभे राहिले. अशांना या बाई समजतील? त्यांच्या दृष्टीनं या वेड्याच की. पण या बाईंनी हा वेडेपणा सेवेत असतानाच केला नव्हता, तर निवृत्तीनंतर पंचवीस वर्षं होत आली तरी सुरू ठेवला होता. इतर शिक्षकांना मदत व्हावी म्हणून. पदरचा पैसा खर्च करत. घरी दैनिकांचा रतीब लावत. आजही त्यांचा हा वेडेपणा तसूभरही कमी झालेला नाही. बाई दिवसभर हेच करत असतात. केवळ स्वानंदासाठी. हे कामच आज त्यांना जगवतं.
बाई एकट्या. वडिलांची नोकरी फिरतीची असल्यानं विजापूरपासून पुण्यापर्यंत शिक्षण घेतलेल्या. सर परशुरामभाऊ महाविद्यालयामधून सत्तेचाळीसला गणित विषय घेऊन बी. ए. झालेल्या. पण त्यांना शिकवावं लागलं ते इंग्रजी. ज्याला ज्या विषयाची आवड तो विषय त्याला न देण्याची शाळांची अशी परंपरा आजही अबाधित. पण बाईंनी न डगमगता ती परकी भाषा आत्मसात केली. तिच्यावर मातृभाषेइतकंच प्रभुत्व मिळवलं आणि आपल्या विद्यार्थिनींनाही ती भाषा त्यांच्या मातृभाषेइतकीच सोपी वाटावी असं अध्यापन केलं. त्यासाठी अपार मेहनत घेतली.
“इंग्रजीवर इतकं कसं तुमचं प्रभुत्व?” असं विचारताच त्या म्हणाल्या, “अहो, प्रयत्न केला तर कुठलीच भाषा अवघड नाही. हाताशी उत्तम शब्दकोश आणि इनसायक्लोपिडिया ब्रिटानिकाचे दहा खंड एवढ्या शिदोरीवर मला सगळं जमून गेलं.”
“शब्दकोशांचं मी समजू शकतो, पण ब्रिटानिकाचे खंड?”
हातात ‘मार्गदर्शक’ घेतल्याशिवाय इंग्रजीच्या तासाला वर्गात पाऊलही न टाकणारे माझे बांधव मला दिसू लागले. इंग्रजी शिकवणारे. ज्यांना मराठीही ‘नीट’ लिहिता येत नाही असे. बहुतेकांचे पदवीचे विषय इंग्रजी सोडून बाकीचे. यातले फार म्हणजे फारच थोडे इंग्रजी नीट बोलणारे.
“पाठ नीट समजावून देण्यासाठी हे खंड खूप उपयुक्त. पाठात आलेल्या शब्द, कल्पना समजावून देताना यातली माहिती उपयोगाला येते. ती शोधून, त्या त्या पाठाच्या अनुषंगानं सांगितली तर मुलांना जादा माहितीही मिळते आणि त्यांची भाषाही सुधारते. विषयाची गोडी लागते त्यांना. त्यासाठी सोप्या इंग्रजी बोलीतून त्यांच्याशी संवाद साधावा लागतो इतकंच. तेवढं तर शिक्षकानं करायलाच हवं ना?”
– क्रमशः भाग पहिला.
लेखक : श्री सदानंद कदम
मो. ९४२०७९१६८०
संग्रहिका : डॉ. भारती माटे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈