?इंद्रधनुष्य?
☆ स्नेहवन – एका प्रेमाच्या भेटीची गोष्ट ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित ☆
(Please visit->> www.snehwan.in)
आळंदीपासून साधारण १० किलोमीटर वर कोयाळी फाटा इथे स्नेहवन नावाची एक संस्था… श्री. अशोक आणि सौ. अर्चना देशमाने यांचा २३० जणांचा संसार ….
२५ व्या वर्षी संगणक क्षेत्रातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून दुसऱ्यांच्या मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी अंगावर घेणे आणि ती व्यवस्थित पार पाडणे हे काही येरा गबाळ्याचे काम नाही. अशोकजींच्या समर्पणाला आणि त्यांना तन आणि मनाने साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी ला माझा सलाम !
२०२० मध्ये आलेली मरगळ झटकून देऊन २०२१ मध्ये काहीतरी खूप छान करायचे. मी, माझे कुटुंब आणि माझे घर यापलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करायचे असा संकल्प मनी धरूनच या वर्षीची सुरुवात केली होती. त्यामुळे जेव्हा या संस्थेविषयी कळले त्यावेळी इथे नक्की भेट द्यायची आणि आपल्याकडून जी होईल ती मदत करायची हे मनात पक्क केलं होतं. ती संधी चालून आली आमच्या ब्राह्मण संघामुळे. यावर्षीचा व्हॅलेंटाईन डे थोडा वेगळा साजरा करूयात ही कल्पना मंदारजी रेडे आणि केतकीताई कुलकर्णी यांनी मांडली आणि आम्ही सर्वानी ती उचलून धरली. याचा अर्थ असा नाही की या आधीचे सर्व व्हॅलेंटाईन डे आम्ही साजरे केलेच आहेत :). पण काहीतरी वेगळं , ज्या समाजात आपण राहतो , ज्यांच्यामुळे आपल्याला ४ सुखाचे घास मिळतायत अश्या शेतकऱ्यांना, त्यांच्या मुलांना जर स्नेहवनमार्फत आपणही छोटीशी मदत करू शकत असू तर करावी या हेतूने आम्ही २५ जणांनी स्नेहवनला भेट दिली.
तिथे गेल्या गेल्या अशोकजींनी हसतमुखाने आमचे स्वागत केले आणि एका क्षणात आम्हाला आपलेसे करून घेतले. थोडा औपचारिक गप्पा तोंडओळख झाली आणि मग अशोकजीनी सांगितलेला त्याचा इथपर्यंतचा प्रवास ऐकून आम्ही सर्वजण स्तिमित झालो.
अशोकजींचे बालपण परभणीजवळील एका छोट्याश्या खेड्यात अत्यंत हलाखीच्या परिस्थिती झाले. जिथे रोजच्या जेवणाची भ्रांत होती तिथे शिक्षणाची आस धरणे हे एक स्वप्नच होते. पण प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्दीने त्यांनी ते इंजिनिअर झाले आणि एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत नोकरीला लागले. नोकरी करत असताना ते विविध विषयांवरील पुस्तके, स्वामी विवेकानंद, बाबा आमटे यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास करत होते. स्वतः एका शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांचे प्रश्न खूप जवळून पाहिल्यामुळे त्यांना सतत यासाठी काहीतरी केले पाहिजे असे वाटत होते. नुसत्या गप्पा मारून अन चार कविता लिहून, पैसे देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत तर यासाठी वेळ दिला पाहिजे.
या विचारात असतानाच एका क्षणी त्यांनी ठरवले की आता मी यात उडी मारणार आणि स्वतःच्या आई वडिलांचा विरोध पत्करून त्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ या कार्याकरिता वाहून घेतले. सुरुवातीला विरोधात असलेले आई वडील नंतर मुलाचा निर्धार बघून गावाकडील शेतीवाडी विकून पुण्यात मुलाच्या संसाराचा गाडा ओढू लागले. सुरवातीला भोसरी येथे ४ खोल्यांमध्ये ते तिघे आणि १८ मुले असे २१ जण जवळ जवळ ३-४ वर्षे राहत होते. थोड्याच दिवसात अशोकजींचा लग्नाचा विषय त्यांच्या आई वडिलांच्या डोक्यात घोळायला लागला. पण लग्नाआधीच १८ ते २० मुलांचे पालकत्व स्वीकारलेल्या मुलाबरोबर लग्न करायला तयार होणारी मुलगी मिळणे म्हणजे कर्मकठीण काम. पण म्हणतात ना तुम्ही जर मनापासून समर्पित होऊन जर एखादे काम करत असेल तर देवसुद्धा तुम्हाला त्याच्या परीने सर्व मदत करतो. अनेक वधुपरीक्षा झाल्यांनतर अर्चनाताई अशोकजींच्या आयुष्यात आल्या आणि ते ही रीतसर पद्धतीने दाखविण्याचा कार्यक्रम करूनच. अर्चना ताई आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या धाडसाचे ही कौतुक करावे तितके थोडे आहे. कुठल्याही आई वडिलांचे आणि मुलीचे स्वतःच्या लग्नाचे संसाराचे एक सुरेख चित्र असते. पण त्या चौकटीच्या बाहेर येऊन चित्र पूर्ण काढणे आणि ते रंगवणे ह्यासाठी पण एक वेगळी दृष्टी लागते. ती दृष्टी अर्चनाताई आणि त्यांच्या पालकांकडे होती म्हणून एवढा मोठा निर्णय ते घेऊ शकले.
१८ मुलांपासून सुरु केलेला त्यांचा संसार आज २३० मुलांबरोबर गुण्या गोविंदाने सुरु आहे. स्नेहवनात असलेले अनोखे उपक्रमही जाणून घेण्यासारखे आहेत.
१. वन बुक वन मूवी : स्नेहवनात भारतातील पहिली कंटेनर लायब्ररी आहे ज्यात १०००० पुस्तके आहेत. इथल्या प्रत्येक मुलाने दर आठवड्याला एक पुस्तक वाचायचे आणि त्यावर विवेचन करायचे. जो पुस्तक वाचून पूर्ण करेल त्याला एक चित्रपट पाहायला मिळेल. जो पुस्तक वाचणार नाही त्याला त्या आठवड्यात चित्रपट पाहायला मिळणार नाही. मग त्याला स्वतः अशोकजी आणि अर्चनाताईही अपवाद नाहीत.
२. रिंगण: इथली मुळे TV अजिबात पाहत नाहीत तर रोज संध्याकाळी सगळे मुळे एकत्र रिंगणात बसतात आणि वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारतात, आपली मते मांडतात. कधी कधी एखादा विषय दिला जातो आणि त्यावर प्रत्येकानी आपले मत , विचार व्यक्त करायचे. मग तो विषय माझी आई, माझे गाव, आपले पंतप्रधान असा काहीही असू शकतो पण ह्यामुळे ह्या मुलांच्यात लहानपणासूनच वक्तृत्व कला जोपासली जाते आणि विचारांना दिशा देऊन ते व्यक्त करण्याचे धाडस येते. त्यामुळे ही मुळे ५०० लोकांसमोर सहज बोलू शकतात.
३. सोलर प्लांट : स्नेहवनचा संपूर्ण परिसर हा सोलर पॉवरवर चालतो. इथली मुलेच हा प्लांट पण सांभाळतात.
४. बायो गॅस : इथे प्रत्येक जण स्वतःला लागणार गॅस स्वतः तयार करतो. हा पूर्ण प्रकल्प पण मुलेच सांभाळतात.
५. कॉम्पुटर लॅब आणि अकाउंटिंग : लॅब चे व्यवस्थान आणि हिशोबाचे काम ही मुलेच पाहतात. कुणालाही काहीही लागले तरी तो तो विभाग पाहणाऱ्या मुलांना विचारूनच सगळे कामे केली जातात. अगदी अशोकजीसुद्धा या मुलांच्या सल्ल्यानेच काम करतात
६. संगीत, चित्रकला, योगाभ्यास : दर शनिवारी आणि रविवारी इथे बाहेरील शिक्षक येऊन मुलांना गाणे , चित्रकला आणि योगाचे धडे देतात आणि त्यांची चौफेर प्रगती होईल याकडे लक्ष देतात
७. गौ-शाळा : स्नेहवनची स्वतःची गौशाला आहे त्यात २ गीर गायी आहेत. त्यामुळे त्यांना लागणारे दूध दुभतेही त्यांना इथेच उपलब्ध होते.
८. जैविक शेती : स्नेहवनला लागणार रोजचा भाजीपाला ते त्यांच्याच आवारात पिकवतात ते ही जैविक पद्धतीने. कुठल्याही रासायनिक खताचा वापर न करता.
अश्या एक ना अनेक गोष्टी इथे पाहायला आणि अनुभवायला मिळाल्या. एक अतिशय स्तुत्य उपक्रम बघून , एकमेवाद्वितीय असा अनुभव घेऊन भारलेले आम्ही सर्वजण पुढील अनेक दिवसांसाठी अनोखी ऊर्जा घेऊन तिथून बाहेर पडलो.
प्रत्यकाने जाऊन जरूर पाहावे आणि अनुभवावे असे हे स्नेहवन , नक्की भेट द्या !!!
स्नेहवन संपर्क- 87964 00484
www.snehwan.in
सौ. शिल्पा महाजनी
संग्राहक – सौ. स्मिता पंडित
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈