मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी-फारसी भाषेची गंमत… भाग -1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? ?

☆ मराठी-फारसी भाषेची गंमत… भाग -1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

खालील वाक्य वाचा :

“मी दरबारातून घरी येत असताना बाजारात गेलो. तिथं मला फौज दिसली. फौज अदालतखान्यासमोर उभी होती. तिथं सावकार सक्तीने गरिबांचा जमीन-जुमला जप्त करत होता. बाजारातील दिल्ली दरवाजातून मी घरी आलो. किल्ली लावून मी माझ्या घराच्या दरवाजाचे कुलूप उघडले. मुख्य दालनात कारंजाचा फवारा उडत होता.

बाजूच्या हौदातून पाणी काढून मी हातपाय धुतले. नंतर मी रंगमहालात आलो. तिथं नाच बघितला. नाच आवडला म्हणून संदूकखाना उघडून नर्तकीला बक्षीस दिले. नंतर भूक लागली म्हणून खाण्यासाठी मुदपाक खाण्यात गेलो. तिथून मी परत आरामखोलीत आलो. खिडकी उघडली आणि खुर्चीवर कट्यार ठेवुन बाहेरच्या बुरुजाकडे पहात पलंगावर झोपी गेलो.”

(वरील वाक्याचे मराठी भाषांतर लेखाच्या शेवटी दिले आहे.)

ह्या वरील वाक्यात जवळपास सगळेच फारसी शब्द आहेत.

नाही खरे वाटत?

बघा मग : दरबार, बाजार, घर, फौज, अदालतखाना, सावकार, सक्ती, गरीब, जमीन, जुमला,जप्त, दिल्ली दरवाजा, किल्ली, घर, दालन, कारंजे, फवारा, हौद, रंगमहाल, नाच, संदूकखाना, नर्तकी, बक्षीस, भूक, खाना, मुदपाक खाना, आराम, खिडकी, खुर्ची, बाहेर, बुरुज आणि पलंग.

इतके शब्द ह्या वरील वाक्यात फारसी आहेत.

आहे ना गंमत!!

पण मग हे सगळे झाले तरी कधी?

इसवी सन १२९६ म्हणजे बरोबर आजपासून ७२२ वर्षांपूर्वी फारसी भाषा महाराष्ट्रात आली.

फारसी हि आजच्या इराण आणि पूर्वीच्या पर्शियन साम्राज्याची भाषा.

हि भाषा इकडे येण्याचे एक कारण होते आणि ते म्हणजे इसवीसन १२९६ ला दिल्लीचा शासक अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर केलेला हल्ला.

इसवीसन १३१८ पासून १३४७ पर्यंतचा महाराष्ट्राचा कारभार खिलजी सल्तनत दिल्लीत बसून करत होती.

अलाउद्दीन खिलजीच्या मृत्यूनंतर पुढे १३४७ साली त्याचा सुभेदार हसन गंगू ह्याने दिल्लीशी संबंध तोडून दक्षिणेत बहमनी सल्तनतीची स्थापना केली.

इसवीसन १४९२ पर्यंत बिदर, १४८४ पर्यंत वऱ्हाड, १४८९ पर्यंत अहमदनगर, १४८९ पर्यंत विजापूर आणि १५१२ पर्यंत गोवळकोंडा भागात हि बहमनी सल्तनत अस्तित्वात होती.

ह्या वरील बहमनी सल्तनतीच्या वेळेसच मराठ्यांनी आपल्या कर्तृत्वाने सर्व महाराष्ट्र आक्रमिण्याचा उद्योग सुरु केला. इसवीसन १४५० च्या सुमारास खानदेशातील स्वाऱ्यांत निकम, ठाण्यास बिंबदेव राणे, कोळवनात कोळी, रामनगरास

राणे, सोनगड आणि रायरीच्या प्रांतात तेथील राजे, शिरकाणात शिरके, खेळण्यास शंकरदेव, वाडीस सावंत, बेळगावास कर्णराज, मोरगिरीस मोरे, असे अनेक मराठे आपले राज्य स्वतंत्रपणे करीत असत. ह्या वरील प्रांतांमध्ये १४५० पर्यंत अस्सल मराठीचाच प्रचार होत असे. मात्र हे प्रांत सोडून बाकीच्या प्रदेशांत फारसी शब्दांचा सुळसुळाट झाला होता. १४५० नंतर हि लहान लहान राज्ये नष्ट होऊन बहमनी

सल्तनतीच्या अंकित बनली.

ह्या बहमनी सल्तनतीचे पुढे जाऊन बरिदशाही, इमादशाही, निजामशाही, आदिलशाही, आणि कुतुबशाही असे पाच तुकडे पडले.

बरिदशाही-१६५६, इमादशाही-१५७२, निजामशाही-१६३७, आदिलशाही-१६८६, आणि कुतुबशाही-१६८७ पर्यंत अस्तित्वात होत्या.

म्हणजे ह्या राजसत्ता जिवंत असूपर्यंत फारसी भाषेने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला.

हे सगळे मुस्लिम शासक मूळचे पर्शियन असल्यामुळे त्यांची दरबारी भाषा हि फारसी होती.

त्यामुळे फारसी आणि मराठीची टक्कर होऊ लागली. सुलतानांनी राज्य चालविताना आपली भाषा वापरण्यावर भर दिला. त्यामुळे जमीन महसूल असो कि अजून काही. सगळीकडे फारसी शब्द वापरू जावु लागले.

जेथे जेथे म्हणून मुस्लिम शासकांचे राज्य कायम झाले तेथे तेथे दरबारातील सर्व मराठी लिहिण्यात फारसी संबंधांचा भरणा विशेष असे. दरबारापासून दूर अश्या गावी आणि सरकारी अधिकाऱ्यांचा जेथे संबंध नाही अश्या गावकीच्या किंवा धर्माच्या किंवा गोतकीच्या खटल्यात जे कागदपत्र बनत त्यात फारसी शब्दांची संख्या फारच कमी असे.

मात्र त्यात फारसी शब्द बिलकुल नसत असे नाही.

इसवीसन १२९६ ला अलाउद्दीन खिलजी महाराष्ट्रात आल्यापासून १६८७ च्या कुतुबशाहीच्या अस्तापर्यंत ३९१ वर्ष फारसी भाषेला महाराष्ट्रात झाली होती. ह्या ३९१ वर्षात ह्या फारसी भाषेच्या राक्षसाने रूप धारण केले होते.

देशात फारसी भाषेचा इतका प्रचंड संचार झाला होता कि दरबारापासून अलिप्त राहणाऱ्या व्यक्तीच्याही बोलण्यात किंवा लिहिण्यात फारसी शब्द नकळत येत असे.

फारसीतून मराठीत जी विशेषनामे रूढ झाली ती धक्कादायक अशी आहेत. उदाहरणार्थ:

बाबा, मामा, मामी, नाना, नानी, काका, काकी, अबू, अम्मा, अम्मी वगैरे मराठीतील टोपण नावे हि फारसी आहेत.

ह्याशिवाय सुल्तानराव, जानराव, बाजीराव, रुस्तुमराव, शहाजीराव, शाहू, फिरंगोजीराव, सर्जेराव, हैबतराव, सर्फरोजीराव, वगैरे नावेही फारशीच आहेत. ह्या शिवाय अजून सौदागर, मुश्रीफ, सराफ, चिटणीस, फडणीस, पोतनीस, हेजिबराव, दिवाण, पेशवे, वाकनीस, दफ्तरदार अशी आडनांवेही फारसी आहेत.

अश्या स्वरूपाच्या शेकडो फारसी शब्दांनी मराठीत कायमचे ठाण मांडले.

जसे जसे यावनी भाषेचे मराठीवर आक्रमण होऊ लागले तसे तसे संतांनी तातडीने समाजप्रबोधनातून मराठी भाषा वाचविण्याचे कसोशीने प्रयत्न सुरु केले.

संत ज्ञानेश्वर म्हणतात,

“माझा मराठाची बोलू कौतुके।

परी अमृतातेही पैजा जिंके।

ऐसी अक्षरे। रसिके मेळवीन”

संत तुकाराम तर अजुन ओजस्वी म्हणतात कि

“आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने।

शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं ।।

शब्द ची आमुच्या जीवाचे जीवन।

शब्दे वाटू धन जन लोका ।।

तुका म्हणे पहा शब्द चि हा देव।

शब्दे चि गौरव पूजा करू ।।

संत जनाबाई, संत बहिणाबाईं, संत एकनाथांनी जशी मराठी भाषा समृद्ध केली तशीच संत नामदेवांनीही मराठी भाषेचा वारू यथार्थ दौडवला.

संग्राहक – सुश्री सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈