इंद्रधनुष्य
☆ करवा चौथ – लेखक – सुश्री सुजीत भोगले ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
ही परंपरा उत्तरेतील आहे. पावसाळा संपला की आपल्याकडे सैन्य मोहिमा सुरु होत असत. मग आपला सैनिक नवरा लढायला जातो आहे. तो जिवंत परत येईल का नाही याची त्या स्त्रीला हुरहूर राहणे स्वाभाविक आहे.
म्हणून या प्रथेचा जन्म झाला असावा की पतीने युद्धभूमीवर जाण्याच्यापूर्वी त्याच्या दीर्घायुष्यासाठी एक दिवस व्रतस्थ रहाणे. त्याच्या हातून व्रताची सांगता करून घेणे. चंद्र त्यात साक्षीला का घ्यायचा ? तर आपल्या संस्कृतीत चंद्र हा स्त्रीचा भाऊ मानला जातो. मनाचा कारक ग्रह चंद्र आहे. तो आपल्याला मानसिक दृष्ट्या कणखर करू शकतो. आपल्या पतीचे तो असेल तिथे रक्षण करेल. या भावनेतून चंद्राला साक्षी ठेवून नवऱ्याच्या हातून अन्नाचा घास खाऊन व्रताची सांगता करणे. नंतर नवरा युद्ध भूमीवर जाईल. या प्रथेचा खरा अर्थ त्याच लोकांना समजेल ज्यांच्या घरातील कोणीतरी सैन्यात आपल्या देशाची सेवा करत असेल.
एक अत्यंत हृद्य प्रथा आहे ही. आणि हिचा संबंध पुरुष प्रधान संस्कृतीशी लावणारे लोक मनोविकृत आहेत.
या कथेत पुरुषप्रधान संस्कृतीचे अवशेष शोधणाऱ्या लोकांना माझा प्रश्न :
१) ज्या प्रमाणे सावित्री स्वतःला हवा तो वर निवडते आणि त्या पुढील घडणाऱ्या घटनाक्रमाची जबाबदारी घेते, इतके स्वतंत्र आणि परिपक्व तुम्ही तुमच्या मुलीला वाढवले आहे का ? तिने तसे वागले तर तुम्हाला चालेल, पटेल का ? तुम्ही तुमच्या मुलीला तितके स्वातंत्र्य दिले आहे का ?
२) तुम्ही युद्ध भूमीवर लढायला जाणार असाल आणि परत येण्याची शाश्वती नसेल तर तुमच्या पत्नीने तुमच्या दीर्घायुष्याच्या कामनेने एक दिवस व्रत केले आणि तुम्ही तुमच्या हाताने तिला घास भरवला, तर त्यात तुमचे पतीपत्नी म्हणून नाते अधिक घट्ट होईल, का तुमच्या पत्नीचे हे कृत्य म्हणजे ती गौण व्यक्ती आहे ही भावना तुमच्या मनात निर्माण होईल ?
लेखक – सुश्री सुजीत भोगले
संग्राहिका – सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈