श्री राजीव गजानन पुजारी
इंद्रधनुष्य
☆ SSLV-D2 प्रक्षेपणाचा आँखो देखा हाल – भाग-3 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆
(मी रांगेत जाऊन मसाला डोसा घेतला व एका टेबलावर येऊन खायला सुरुवात केली.) इथून पुढे —-
माझ्या शेजारीच शार मध्ये काम करणारे एक गृहस्थ, त्यांची पत्नी व त्यांची छोटी मुलगी येऊन बसले. आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली. त्यांचे नाव संग्राम असून ते मूळ ओरिसाचे आहेत. त्यांना उत्तम हिंदी येते. ते SHAR मध्ये VAB(vehicle assembly building) मध्ये कामाला आहे व इस्त्रो क्वार्टर्स मध्ये राहतात. मी महाराष्ट्रातील सांगलीहून निव्वळ लाँच बघायला आलोय याचे त्यांना फार कौतुक वाटले. मी एकटाच आलोय म्हटल्यावर त्यांच्या पत्नीने ‘परत आला तर पत्नीला घेऊन या व आमच्याच घरी उतरा’ असे सांगितले. ओळख पाळख नसतांना एवढे अगत्यपूर्ण आमंत्रण ओरिसातील माणसेच करू जाणोत. ओरिसाच्या आदरतिथ्याचा अनुभव मी कासबहाल येथे ट्रेनिंगला गेलो असताना अनुभवला होता. त्यावेळी ट्रेनिंग दरम्यान दिवाळी आली होती व आमच्या एका प्रोफेसरनी आम्हा सर्वांना त्यांच्या घरी अगत्याने फराळाला बोलावले होते. असो. मसाला डोसा खात असताना स्वयंपाक घरातील एक डिलिव्हरी देणारा माणूस मला हुडकत आला व माझ्यासमोर आणखीन एक मसाला डोसा ठेवून गेला. तो काय बोलला ते मला कळलं नाही. पण संग्राम म्हणाले, ” तुम्ही दोन रोटींची ऑर्डर दिली होती. ती कॅन्सल केल्यावर आणखी दहा रुपयांचे कुपन तुम्हाला दिले. एक मसाला डोसा पन्नास रुपयांना मिळतो. तुम्ही एकच डोसा घेऊन आलात म्हणून हा माणूस दुसरा डोसा घेऊन आला आहे. मला हसावे कि रडावे ते कळेना. नाईलाजास्तव दुसरा डोसा पण खावा लागला. मसाला डोशाची भाजी आपल्याकडे असते तशी सुक्की नसते तर आपण कांदा बटाटा रस्सा करतो तशी पण जरा घट्ट अशी असते. संग्राम यांच्याशी बोलल्यावर कळलं की तुम्हाला फक्त रोटी किंवा चपातीचे कुपन मिळते, त्याचे बरोबर भाजी व आमटी मिळतेच. कुपनावर त्याचा उल्लेख नसतो. शेजारच्या टेबलावर एक मुलगा भाजीबरोबर चपाती खात होता. बघतो तर आपण घरी करतो तशीच चपाती होती. असो. त्या दिवशी दोन मसाला डोसा खाण्याचा योग होता हेच खरे. जेवून उठताना श्री संग्राम यांनी आवर्जून माझा फोन नंबर घेतला व त्यांचा मला दिला. ती छोकरी पण ‘बाय अंकल’ म्हणाली. जेवण करून रूमवर आलो थोडा वेळ टी.व्ही. बघून झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी माझी ट्रेन होती (पिनाकिनी एक्स्प्रेस) मी साडेनऊ वाजता लॉज सोडले व रिक्षाने स्टेशनला आलो. वेळ होता म्हणून फिरत फिरत तेथून जवळच असलेल्या एस्. टी. स्टॅन्डला गेलो व शारला जायला इथून एस्. टी. ची सोय असते का याची चौकशी केली; तर तशी कांही सोय नसते व आपणास रिक्षाने जावे लागते असे कळले. परत स्टेशनवर आलो. गाडी पाऊणतास लेट होती. ती बाराला आली. गाडीत एक आय.टी. इंजिनियर व त्यांचा आठ वर्षाचा मुलगा असे माझ्यासमोरील सीटवर बसले होते. माणूस आय.टी. इंजिनियर असूनही विजयवाडा येथे कॉलेजमध्ये शिकविण्याचे काम करत होता. ती त्यांची आवड होती. ते दोघे शेगांव येथे एका लग्नासाठी चालले होते. घरी लहान बाळ असल्याने पत्नी घरीच थांबली होती. मी त्यांना गजानन महाराजांच्या समाधी विषयी माहित आहे का असे विचारले. त्यांना त्या भागाची काहीच माहिती नव्हती. मग मी त्यांना गजानन महाराजांविषयी माहिती सांगितली व समाधी मंदिराचे नक्की दर्शन घ्या असे सांगितले. शेगांव कचोरी पण आवर्जून टेस्ट करा असेही सांगितले. झालेला बराचसा उशीर गाडीने भरून काढला व एकच्या ऐवजी सव्वाला गाडी चेन्नई सेंट्रलला पोहोचली. माझे पुढची ट्रेन शताब्दी एक्सप्रेस संध्याकाळी साडेपाचला होती चेन्नई सेंट्रलला एक सोय चांगली आहे ती म्हणजे सर्व प्लॅटफॉर्म्स समपातळीत आहेत, त्यामुळे जिने चढउतार करावे लागत नाहीत. मी वेटिंग हॉलमध्ये ‘इंडिया टुडे’ चाळत असतांना एक युवक माझ्या शेजारी येऊन बसला व मला विचारले ‘तुम्ही केरळचे का?’ मी म्हटलं, ‘नाही, पण आपण असे का विचारत आहात?’ तो म्हणाला, ‘तुम्ही केरळी दिसता म्हणून विचारलं.’ चला, मला माझ्याविषयी एक नवीनच माहिती मिळाली. नंतर मी त्याला त्याची माहिती विचारली. तो केरळचा असून त्याने गेल्याच वर्षी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते व तो नोकरीच्या शोधात होता. अनेक ठिकाणी प्रयत्न करून सुद्धा त्याला नोकरी मिळत नव्हती. मी त्याला त्याची आवड विचारली. तो म्हणाला, ‘ मला फॅब्रिकेशन विषयी आवड आहे.’ मी त्याला सुचवलं, ‘मग तू एखादे फॅब्रिकेशन शॉप का सुरू करत नाहीस? तसंही कोरोनानंतर बांधकाम व्यवसायात तेजी आली आहे, आणि बांधकाम म्हटलं कि, ग्रील, खिडक्या वगैरे आलंच.’ तो म्हणाला,’भांडवलाचं काय?’ मी म्हटलं, ‘हल्ली बँकांच्या कर्जपुरवठ्याच्या चांगल्या योजना आल्या आहेत. तू पण चौकशी कर.’ त्याचा चेहरा उजळलेला दिसला. मला पण बरं वाटलं. नंतर मी लंचसाठी प्लॅटफॉर्मच्या बाजूला
‘ए टू बी म्हणून लंच हाउस होते तेथे गेलो. तेथे रांग होती. रांगेत उभेराहून चपाती,भाजी व शिरा यांचे कुपन घेतले. ऑर्डर सर्व्ह करणाऱ्याने एका डिस्पोजिबल प्लेटमध्ये सर्व वाढून दिले. बाजूला कट्ट्यावर ताट ठेवून उभेराहून खायचं. खरंतर मला हे असे उभेराहून वचा वचा खाणे आवडत नाही. खाणे कसे व्यवस्थित बसून असावे. पण साउथ मध्ये जास्त करून अशा पद्धतीने खायची पद्धत आहे. ‘व्हेन इन रोम वन मस्ट डू ॲज द रोमन्स डू’ असे म्हणून मी समाधान मानले व सव्वा पाचला ट्रेनमध्ये जाऊन बसलो. ट्रेनमध्ये बरेच विद्यार्थी व विद्यार्थिनी होत्या. ते सर्व बेंगलोरला उतरून पुढे पुण्याला जाणार होते. ती सर्व मुले VIT कॉलेज वेल्लूरची होती. त्यांच्या टीवल्या बावल्या चालल्या होत्या, ते अनुभवण्यात वेळ छान गेला. साडेदहाला बेंगलोर आले. ईशा व योगेश स्टेशनवर आले होते. गाडीत भरपेट नाश्ता झाल्याने दूध पिऊन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला ईशाने उप्पीट केले होते. जेवायला पोळी भाजी व जिरा राईस होते. बऱ्याच दिवसांनी पोळी भाजी खाल्ल्याने बरे वाटले. रात्री आठच्या कोंडुस्कर स्लीपरचे रिझर्वेशन होते. ईशा व योगेश सोडायला आले होते. सकाळी साडेआठला सांगलीला पोहोचलो. एका स्वप्नाची इथे कर्तव्यता झाली.
नोंद :-
१)श्रीहरीकोट्याला जाण्यासाठी मी मला सोयीचे म्हणून बेंगलोरला जाऊन चेन्नईला गेलो होतो. काहीजणांना थेट चेन्नईला जाणे सोयीचे असेल तर तसं करायला हरकत नाही.
२) सुलुरूपेटा लॉजचा पत्ता – श्री लक्ष्मी पॅलेस, c/o लक्ष्मी थिएटर, शार रोड, सुलुरूपेटा -५२४१२१। जिल्हा -तिरुपती (आंध्र प्रदेश) प्रोप्रायटर – श्री दोराबाबू , फोन – 9985038339.
— समाप्त —
© श्री राजीव गजानन पुजारी
विश्रामबाग, सांगली
ईमेल – [email protected] मो. 9527547629
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈