सौ अंजली दिलीप गोखले
इंद्रधनुष्य
☆ कर्नाटकी कशिदा… डाॅ.निधी पटवर्धन ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
पुण्याहून आलेल्या माझ्या एका मैत्रिणीला मुद्दामून कारवारी जेवण खाऊ घालावे म्हणून कानडी मैत्रिणीकडे गेले. चित्रान्न (विशिष्ट प्रकारचा कानडी तिखट भात), केळय़ाच्या गोड पोळय़ा, तमळी (बेलाची कढी), कच्च्या पपईची मूगडाळ घातलेली कोशिंबीर, एकही थेंब तेल नसलेलं लोणचं असं बरंच काही तिने खाऊ घातलं आणि आपली व्यथा व्यक्त केली, ‘‘ मला स्वच्छ मराठी बोलता येत नाही याचं वाईट वाटतं ! मला लोक अजूनही मी ‘कानडी’ आहे म्हणून पाहतात. माझे मराठी हेल कानडी येतात. त्यांनी मला ओळखता कामा नये, मी मराठीच वाटले पाहिजे ’’.
आश्चर्याने केळय़ाच्या पोळीचा घास माझ्या हातातच राहिला. तुम्ही जन्माने कानडी आहात तर तसंच ओळखलं गेलात तर वैषम्य कसलं? तुमचे कानडी हेल ही तर श्रीमंती आहे. तसं तर संवादाच्या गरजेतून अनेकदा इतर भाषकांनी केलेले मराठी बोलण्याचे प्रयत्न हा मराठी भाषेचा एक आगळावेगळा साज आहे. त्या त्या भाषिकांच्या मातृभाषांचा गंध त्या त्या प्रदेशाचे हेल आणि उच्चार घेऊन आलेली मराठीची ही रूपं मला तरी श्रीमंत वाटतात!
कानडी घरात लग्न होऊन गेल्यावर मराठी स्त्रिया किती काळात कानडी शिकतील याचा अंदाज घेतला तर दोन-चार वर्षांत माझी बहीण, मैत्रीण शिकलेय असं पाच-सहा जणांनी सांगितले. महाराष्ट्रात लग्न होऊन आलेल्या, खेडय़ापाडय़ातल्या कानडी स्त्रिया मराठी हळूहळू शिकतात आणि सहज बोलू लागतात हा मात्र सर्वाचा अनुभव आहे. भाषेचा जन्म संवादाच्या गरजेतून झाला आहे. अशा इथं आलेल्या, या मातीशी एकरूप झालेल्या स्त्रिया हळूहळू का होईना मराठी शिकतात, हे किती अनमोल आहे. त्यांची मुलं दोन भाषा शिकतात, ही आणखी जमेची बाजू !
भले तुकाराम महाराजांनी ‘कानडीने केला मराठी भ्रतार एकाचे उत्तर एका न ये’ असा अभंग रचला असला तरी सुरुवातीचा हा काळ सरल्यावर ही कानडी स्त्री कर्माने मराठी होतेच की! गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमांचा सहवास मराठी भाषेला आहे. स्वाभाविकपणे त्या त्या सीमावर्ती महाराष्ट्रात जी मराठी बोलली जाते त्यात या भाषाभगिनींचा प्रभाव जाणवणारच.
जी. ए. कुलकर्णीच्या साहित्यातून कानडी शेजार डोकावतो. तसेच प्रकाश नारायण संत यांचा लंपन या भाषेतील अनेक शब्दांची ओळख आपल्याला करून देतो. ‘तो मी नव्हेच’मधील निपाणीचा व्यापारी लखोबा लोखंडे त्याच्या कानडी-मराठीने आपल्या लक्षात राहिलेला आहे. कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळ येथील शिलालेखात ‘श्री चावुण्डराये करवियलें..’ हे वाक्य आढळलेले आहे.
मराठी भाषेला किमान सात-आठ शतकं झपाटून टाकणारी व्यक्तिरेखा कानडी आहे असं सांगितलं तर काय वाटेल? पण तसं खरंच आहे. मराठी संतकाव्याची सत्त्वधारा ज्या भक्तीपात्रातून वाहते तिच्या उगमस्थानी तर एक थेट ‘कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु’ असा कानडी माणूस निघाला ! नुसता माणूस नव्हे तर थेट राजाच ! तोही पंढरीचा ! ‘भाषा ही माणसाचं जीवन सहज, सुलभ आणि सजग करण्याचे साधन आहे. जीवन असह्य करून मिळवणारे साध्य नाही. तुमच्या कानडी जेवणाइतकीच मधुरता तुमच्या बोलण्यात आहे.’ असे त्या कारवारी मैत्रिणीला सांगितल्यावर ‘मुद्दुली चिन्ना’ म्हणून तिने माझ्यावर जे प्रेम केले ते मला मराठीइतकेच गोड भासले.
लेखिका : डॉ. निधी पटवर्धन
संकलक : नितीन खंडाळे, चाळीसगाव
संग्रहिका : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈