सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘झपताल…’ – कविवर्य – विंदा करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी  ☆

ज्या काळी, म्हणजे साठ सत्तर वर्षापूर्वी, ” महिला दिन ” साजरा करून त्या दिवशी खोटी … औपचारिक कणव दाखवून महिला वर्गाला शुभेच्छा देण्याची प्रथा नव्हती, त्या वेळी नामवंत कवी विंदा करंदीकर यांनी  ‘ झपताल ‘ या नावाची किती सुरेख कविता लिहून तत्कालीन  स्त्रीचे  जीवन  रेखाटले होते ते दर्शविण्यासाठी ती कविता  खाली देत आहे. आता सर्रास इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या तरुण पिढीला  हे  कोण विंदा ? असा प्रश्न पडणे साहजिकच  आहे . पण घरातील कोणा शिकलेल्या  आजी … आजोबा  , काका…काकू ,मामा… मावशी ,आई …बाबा  याजकडून ते माहीत करून घ्यावे … 

विंदांच्या या ‘झपताल’ कवितेचं वैशिष्ट्य हे की ती कविता कोणी स्त्रीने लिहिलेली तक्रारवजा कविता नाही, तर त्या जुन्या काळांतल्या एका पुरुषाने, एका संवेदनशील पतीने आपल्या पत्नीचं केलेलं कौतुक आहे. 

आपल्याकडे महाराष्ट्रातल्या साधारणपणे मध्यम आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात सत्तरऐंशी वर्षांपूर्वी घरी चोवीस तास ‘आई’ किंवा ‘पत्नी’ म्हणून कामाच्या रगाड्यात भरडल्या जाणा-या आणि चाळीतल्या सव्वा-दीड खोलीत आयुष्य काढीत उभं आयुष्य फक्त सहन, सहन आणि सहन करीत करीत काढलेल्या महिलांची काय स्थिती होती, ते विंदांनी त्यांच्या ‘झपताल’ या कवितेत समर्पकपणे मांडलेलं आहे. 

आमच्या मागच्या पिढीतल्या नऊवारी लुगड्यातल्या कोणाही आजी, आई, मावशी, आत्या, काकू, मामी…. यांना स्वत:ची ‘मतं’ तर दूरच राहिली, स्वत:ची ‘पर्स’ही त्यांना माहीत नव्हती. तरी घटस्फोट न घेता, (ब्रेक-अप न करता) आणि कोणतंही ‘लोन’ न घेता, भांडततंडत का असेना, पटलं न पटलं तरी, पन्नास पन्नास, साठ साठ वर्ष चार, पाच, सहा मुलं वाढवून, पुढे त्यांना मार्गी लावून, ‘त्याचसाठी अट्टाहास करीत  ‘शेवटच्या दिसापर्यंत’ टुकीने संसार निभावले.   

विंदांची ही कविता हल्लीच्या तरुणींना समजेलच असं नाही, त्यात त्यांची चूकही नाही. कारण त्यांना हे मुळातच काही माहीतच नाही. त्यातल्या काही अस्सल ‘मराठी’ शब्दांचा अर्थही समजणार नाही, उदा. ओचें,  उभे नेसून,  पोतेरें,  मुतेली, बाळसे, चूल लाल होणे, मंमं, आणि संसाराची दहा फुटी खोली.. वगैरे. घरी एखादी आजी असलीच तर तिला त्यांनी या शब्दांचे अर्थ विचारावे. ते दिवस आणि तो काळ  ज्यांनी पाहिला आहे, भोगला आहे, त्यांनाच ही कविता चांगली समजेल, घरोघरच्या साठी-सत्तरी उलटून गेलेल्या केवळ महिलांनाच नव्हे तर घरोघरच्या संवेदनशील असलेल्या पुरूषांनाही समजेल. 

☆  झपताल

ओचें बांधून पहांटे उठते तेव्हांपासून झपाझपा वावरत असतेस

कुरकुरणा-या पाळण्यामधून दोन डोळे उमलूं लागतात 

आणि मग इवल्या इवल्या मोदकमुठीतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते …… 

 

उभे नेसून वावरत असतेस.. तुझ्या पोते-याने म्हातारी चूल पुन्हां एकदां लाल होते

आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील तीन मुतेली वाळवूं लागतो 

म्हणून तो तुला हवा असतो…… 

 

मधून मधून तुझ्या पायांमध्यें माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात 

त्यांची मान चिमटीत धरून तूं त्यांना बाजूला करतेस, 

तरी पण चिऊकाऊच्या मंमं मधील एक उरलेला घास त्यांनाही मिळतो …… 

 

तूं घरभर भिरभिरत असतेस, लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात 

स्वागतासाठी तूं ‘सुहासिनी’ असतेस..वाढतांना ‘यक्षिणी’ असतेस .. भरवतांना ‘पक्षिणी’ असतेस, 

सांठवतांना ‘संहिता’ असतेस .. भविष्याकरतां तूं ‘स्वप्नसती’ असतेस .. 

संसाराच्या दहा फुटी खोलीत दिवसाच्या चोवीस मात्रा चपखल बसवणारी …… 

 

… तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही.

कविवर्य – विंदा करंदीकर

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments