सुश्री शोभना आगाशे
इंद्रधनुष्य
☆ चांगदेव पासष्ठी – भाग-1… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆
(संत श्री ज्ञानदेव महाराजांनी योगीराज चांगदेवांच्या कोर्या पत्राला दिलेलं उत्तर म्हणजे चांगदेव पासष्टी. संत ज्ञानदेवांच्या काळचं प्राकृत म्हणजेच मराठी आजच्या संदर्भात, सर्वसामान्य लोकांना कळायला अवघड आहे. म्हणून सुश्री शोभना आगाशे यांनी सध्या प्रचलित असलेल्या मराठीत या चांगदेव पासष्टीचं केलेलं रूपांतर प्रस्तुत करीत आहोत.)
जंव अप्रकट परमेश
विश्वाचा होतसे भास
प्रकट होई तो जेधवा
नुरे विश्व भास तेधवा॥१॥
अप्रकट तो जरि भासे
प्रकट परि नच दिसे
दृश्यादृश्य परे
गुणातीत असे बरे॥२॥
विशाल जसजसा होत
व्यापतसे तो जगत
भासचि हा परि जाणी
असुनि नसे घे ध्यानी॥३॥
रूपे बहु घेई जरी
अरूपातच असे खरी
अलंकार बनले जरी
सुवर्णा ना उणे तरी॥४॥
लाटांच्या झिरमिळ्या
सागरास पांघरल्या
भासचि हा जाण केवळ
सकळ असे निव्वळ जळ॥५॥
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈