डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ – ऋचा १५ ते २१ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ ऋचा १५ ते २१
देवता : विष्णू
आज मी आपल्यासाठी मेधातिथि कण्व या ऋषींनी विष्णुदेवतेला उद्देशून रचलेल्या ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळातील बाविसाव्या सूक्तातील सोळा ते एकवीस या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
मराठी भावानुवाद :
स्यो॒ना पृ॑थिवि भवानृक्ष॒रा नि॒वेश॑नी । यच्छा॑ नः॒ शर्म॑ स॒प्रथः॑ ॥ १५ ॥
कनवाळू हे पृथ्वीमाते रक्षण हे तव कर्म
विध्वंस न करणे कोणाचा हाची तुझा गे धर्म
सकलसमावेशक तू असशी आम्हावरी धरि दृष्टी
सौख्यदायि होउनी आम्हाला दान करी संतुष्टी ||१५||
☆
अतो॑ दे॒वा अ॑वन्तु नो॒ यतो॒ विष्णु॑र्विचक्र॒मे । पृ॒थि॒व्याः स॒प्त धाम॑भिः ॥ १६ ॥
जेथे म्हणुनी श्रीविष्णूंनी केले आक्रमण
अवनीच्या सप्तप्रदेशांचे केले ते खंडन
सर्वप्रदेशी हे देवांनो करा अमुचे रक्षण
तुम्हाविना संरक्षण करण्या आहे दुसरे कोण ||१६||
☆
इ॒दं विष्णु॒र्वि च॑क्रमे त्रे॒धा नि द॑धे प॒दम् । समू॑ळ्हमस्य पांसु॒रे ॥ १७ ॥
श्रीविष्णूंनी अखील विश्व केले पादाक्रांत
वामनरूपे तीन पाऊले ठेउनिया जगतात
निमग्न झाली त्यांच्या चरणाच्या धुळीत सृष्टी
आम्हावरती धरा सदैव कृपापूर्ण तव दृष्टी ||१७||
☆
त्रीणि॑ प॒दा वि च॑क्रमे॒ विष्णु॑र्गो॒पा अदा॑भ्यः । अतो॒ धर्मा॑णि धा॒रय॑न् ॥ १८ ॥
संरक्षण करतो जगताचा विष्णू अपराजित
स्थापियले अवनीवरती धर्माचे नियम समस्त
विशाल अपुली तीन पावले टाकुनिया त्याने
अवघ्या विश्वाला व्यापीले अपुल्या मायेने ||१८||
☆
विष्णोः॒ कर्मा॑णि पश्यत॒ यतो॑ व्र॒तानि॑ पस्प॒शे । इंद्र॑स्य॒ युज्यः॒ सखा॑ ॥ १९ ॥
पराक्रमी विष्णूंची कर्मे अलौकीक गाजती
कृत्यांच्या योगे ते साऱ्या कर्मांना पाहती
इंद्राचा हा सहाय्यकारक असे स्नेही त्याचा
श्रद्धेच्या दृष्टीने पहावे कर्मांना त्याच्या ||१९||
☆
तद्विष्णोः॑ पर॒मं प॒दं सदा॑ पश्यन्ति सू॒रयः॑ । दि॒वीव॒ चक्षु॒रात॑तम् ॥ २० ॥
पंडित जेव्हा विष्णूच्या त्या परमपदा पाहती
महती त्याची जाणून घ्याया जिज्ञासू होती
चकित होऊनी विस्मयकारक विष्णूलोकाने
नेत्र तयांचे विस्फारत जणु व्योमाच्या दर्शने ||२०||
☆
तद्विप्रा॑सोःविप॒न्यवो॑ जागृ॒वांसः॒ समिं॑धते । विष्णो॒र्यत्प॑र॒मं प॒दम् ॥ २१ ॥
सदैव जागृत भक्त स्तवितो बुद्धिशाली विद्वान
परमपदाने विष्णूच्या त्या प्रभावीत होऊन
ज्ञात जाहल्या विष्णूलोकाचे करिती स्तवन
अखील विश्वामध्ये प्रसार करिती त्या गाउन ||२१||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे.या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
Attachments area
Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 25 Rucha 15 – 21
Rugved Mandal 1 Sukta 25 Rucha 15 – 21
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈