श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
इंद्रधनुष्य
☆ गौरी तृतीया (तीज), आणि मत्स्य जयंती (चैत्र शुद्ध तृतीया.) ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात तृतीयेला चैत्रगौर बसविली जाते. या दिवशी देवघरातच किंवा आपल्या सोयीनुसार इतर पवित्र ठिकाणी गौरीची स्थापना केली जाते.
तृतीयेपासून चैत्र गौर बसविली जाते. या दिवसाला गौरी तीज असेही म्हणतात .देवातल्या अन्नपूर्णा देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय तृतीया ) पर्यंत तिची पूजा केली जाते. शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपातील पूजा होय. हा चैत्र महिन्यातील मराठी स्त्रिया साजरा करीत असलेला एक पारंपरिक सोहळा आहे. स्त्रिया आपापल्या घरी हा सोहळा साजरा करतात. एका छोट्या सुंदर पाळण्यामध्ये गौरीची स्थापना करतात. या दिवशी आंब्याची डाळ,कैरीचे पन्हे,बत्तासे,भिजवलेले हरभरे,टरबूज,कलिंगड यासारखी फळे असा नैवेद्य देवीला अर्पण करण्याची पद्धत आहे. महिनाभरातल्या कोणत्याही एका दिवशी आजूबाजूच्या स्त्रियांना हळदीकुंकवाला बोलावतात.काही ठिकाणी घरी आलेल्या स्त्रिया आणि कुमारिका यांचे पाय धुवून त्यांच्या हातावर चंदनाचा लेप लावतात. भिजवलेले हरभरे,फळे यांनी त्यांची ओटी भरतात आणि कैरीचे पन्हे,आंब्याची डाळ देऊन त्यांचे स्वागत करतात. काही ठिकाणी चैत्र गौरीपुढे शोभिवंत आरास मांडण्याची पद्धत आहे. या महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते . आपल्या आईकडून सर्व प्रकारची कौतुके करून घेते. मैत्रिणींबरोबर खेळते. झोपाळ्यावर बसून झोके घेते आणि अक्षय तृतीयेला परत सासरी जाते अशी कल्पना आहे. या निमित्ताने महिनाभर घराच्या अंगणात रांगोळीने चैत्रांगण काढले जाते. या चैत्रांगणाच्या रांगोळीत देवीची शस्त्रे, तिची वाहने , तिची सौभाग्याची लेणी,स्वस्तिक , कमळ , सूर्य , चंद्र , गोपद्म यासारखी शुभ चिन्ह काढली जातात. रांगोळीत मध्यभागी झोपाळ्यात बसलेल्या देवीचे चित्र,राधाकृष्ण , तुळशी वृंदावन अशी चित्रे काढली जातात . हीच ती चैत्रांगणाची रांगोळी.
मत्स्य जयंती, चैत्र शुद्ध तृतीया.
हिंदू वर्षाचा तिसरा दिवस म्हणजेच चैत्र शुद्ध तृतीया . हा दिवस मत्स्य जयंती म्हणून ओळखला जातो. विष्णूच्या प्रमुख दशावतारांपैकी पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार. हा मत्स्य या दिवशी अवतीर्ण झाला असे मानतात. पुराणकथेनुसार पृथ्वीला प्रलयापासून वाचविण्यासाठी भगवान विष्णूंनी हा अवतार घेतला अशी कथा आहे.
राजा सत्यव्रत नदीत स्नान करून जलांजली देत असताना त्यांच्या ओंजळीत एक मासा आला. त्या माशाच्या विनंतीवरून राजा त्याला घरी घेऊन गेला. हा मासा दररोज असाधारण रीतीने मोठा होऊ लागल्याने राजाने त्याला मूळ रुपात दर्शन देण्याची विनंती केली. तेव्हा भगवान विष्णू प्रकट झाले. पुढे सात दिवसांनी होणाऱ्या प्रलयाची कल्पना त्यांनी राजाला दिली पुढे त्यांनी राजाला प्राणी आणि सप्तर्षी यांना घेऊन माझ्या नावेतून चल असे सांगितले. या नावेतून जाताना मत्स्याने राजाला जी माहिती दिली ती मत्स्य पुराण म्हणून प्रचलित आहे. सत्यवत राजाने वाचविलेल्या काही प्रमुख लोकांपैकी राजा चाक्षुष हा राजा पुढे मनू म्हणून प्रसिद्धीस आला. याच मनूचे वंशज म्हणजे मानव किंवा मनुष्य, म्हणजेच आपण मानव.
या मत्स्य जयंतीच्या दिवशी “ओम मत्स्याय मनुपालकाय नम:” या मंत्राने मत्स्य अवतार प्रतिमेची किंवा भगवान विष्णूची पूजा करण्याची प्रथा आहे.
मत्स्य अवतारामागे हयग्रीव राक्षसाची पण कथा आहे. या राक्षसाने ब्राम्हदेवांचे सारे वेदांचे ग्रंथ चोरले. त्यामुळे सर्वत्र अज्ञानाचा अंध:कार पसरला. अशा वेळी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार धारण करून हयग्रीवचा वध केला आणि वेद सुरक्षितपणे ब्रम्हदेवांकडे पोहोचवले असे सांगतात.
संग्रहिका : श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.
मो. – 9561582372, 8806955070.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈