? इंद्रधनुष्य ?

॥ पारिजातक कथा ॥ ☆ प्रस्तुती – सुश्री वर्षा सुनील चौगुले ☆

रात्रीच पारिजात का फुलते, बहरते, त्यामागे एक अतिशय गोड प्रेमकथा आहे. अशी कथा की जी सर्व काळातील सर्वोत्कृष्ट प्रेमकथांंना सुद्धा लाजवेल….  

या कथेनुसार, राजकुमारी पारिजातक सूर्याच्या… होय भगवान सुर्य देवाच्या प्रेमात पडली. सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पुर्णपणे जाणीव होती. तरीही एका अटीवर तिच्याशी त्याने लग्न करण्याचे वचन दिले. अट अशी होती की, काहीही झाले तरी तिने त्याच्याकडे कधीही पहायचे नाही. अट विचित्रच होती खरी…पण प्रेमात रममाण झालेल्या परीजातने याचा कधी विचारच केला नाही.  

त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केले आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतचा काळ कसा भरकन निघून गेला. उन्हाळा येताच सूर्य देवाची शक्ती पूर्वीपेक्षा अफाट वाढली…. इतकी, की पारिजात त्याच्या एका कटाक्षात भस्म होऊन जाईल. अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य पारिजातच्या दारात खाली उतरला आणि पारिजात भान हरपून त्याच्याकडे पाहातच राहिली. वचनभंगामुळे तो प्रचंड क्रोधीत झाला आणि रागाच्या भरात अजूनच तापला. या सगळ्यात पारिजात राख होऊन स्वतःच्याच राखेत बुडून गेली….  तथापि, जेव्हा त्याचा राग शांत झाला तेव्हा त्याला पारिजातच्या जीवापाड प्रेमाची जाणिव झाली. शरीर भस्म झाल्याने देवांनी तिला एका झाडाच्या रुपात पुन्हा जिवंत केले. आणि पुन्हा असं घडू नये यासाठी रात्रीच सूर्यदेव तिच्या भेटीला जातात. या भेटीत परिजातची फुले रात्रीच्या वेळी बहरुन इतकी सुवासिक असतात की जणू सूर्याने त्यांंचं चुंबन घेतलं असेल आणि प्रेमात ती दोघं स्वतःला विसरुन जात असतील…. 

पहाट होताच देव आपल्या कामावर रुजू होतात आणि त्यांच्या पहिल्या किरणांनी जमिनीला स्पर्श करताच फुले खाली गळून पडतात. याच कथेच्या दुसर्‍या आवृत्तीत असे म्हटले जाते की सुर्यदेवाने पारिजातचे प्रेम नाकारले आणि राजकन्या ते सहन करू शकली नाही. तिने स्वतःला ठार मारले आणि तिचे प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठी तिच्याच राखेतून एक झाड वाढले.  पडलेली फुलं तिचे अश्रू मानली जातात, ती फुले वाहते, तिच्या प्रियकराची नजर सहन करण्यास ती फुलं असमर्थ असतात……!

पारिजातक वृक्ष थेट स्वर्गातून आलेला आहे. समुद्रमंथनातून निघालेले हे तेरावं रत्न देवांचा राजा या नात्याने इंद्राकडे होतं. स्वर्गातील इंद्राच्या रोपवाटिकेत तो लावला होता. एकदा नारदमुनींनी ही फुलं रुक्मिणी आणि सत्यभामेला दिली आणि मग या वृक्षासाठी दोघींनी  हट्ट केला. रुक्मिणीलाही या वृक्षाची फुले हवी होती. सत्यभामेला तर आख्खा वृक्षच हवा होता….श्रीकृष्णाने सत्यभामेसाठी हा वृक्ष इंद्राशी लढाई करून पृथ्वीवर आणला. कृष्णाने वृक्ष सत्यभामेच्या दारात लावला पण फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असत…

याशिवाय असं म्हटलं जातं की पारिजातका खाली उभं राहून एखादी गोष्ट मागितली तर पारिजातक ती इच्छा पूर्ण करतो. इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं…. 

तुम्ही कितीही थकून आलात आणि पारिजातकाच्या खोडाला स्पर्श केल्यास ते तुमचा थकवा काढून घेऊन तुम्हाला उत्साह देतो असंही म्हणतात.

लेखक : अज्ञात

संग्राहिका :  सुश्री वर्षा सुनील चौगुले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments