श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ SSLV-D2 प्रक्षेपकाचे सफल प्रक्षेपण ☆ श्री राजीव गजानन पुजारी

१० फेब्रुवारी २०२३ रोजी इस्रोने त्याच्या नवीन विकसित केलेल्या SSLV (Small Satellite Launch Vehicle) श्रेणीमधील प्रक्षेपकाचे दुसरे विकासात्मक उड्डाण यशस्वीरित्या पार पाडले. त्याला SSLV-D2 (Small Satellite Launch Vehicle-Development flight 2) असे नाव दिले आहे. सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरीकोटा येथील पहिल्या प्रक्षेपण तळावरून भारतीय वेळेनुसार सकाळी ०९:१८ मिनिटांनी प्रक्षेपक अवकाशात झेपावला. प्रक्षेपकावर तीन उपग्रह अधिभार म्हणून होते. EOS-07, JANUS-1 आणि AzaadiSAT-2. प्रक्षेपणानंतर साडेतेरा मिनिटांनी EOS-07 प्रक्षेपकापासून विलग झाला चौदा मिनिटांनी JANUS-1 वेगळा झाला आणि पंधरा मिनिटांनी AzaadiSAT वेगळा झाला. तीनही उपग्रहांना त्यांच्या निर्धारित कक्षेत म्हणजे ४५० किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत ३७ डिग्री कलासह (inclination) यशस्वीरीत्या प्रस्थापित केले गेले व इस्त्रोने एक मैलाचा टप्पा पार केला.

७ ऑगस्ट २०२२ रोजी SSLV च्या पहिल्या विकासात्मक उड्डाणावेळी प्रक्षेपकाच्या तीनही टप्प्यांनी व्यवस्थित काम करून प्रक्षेपकाला योग्य ती उंची व गती प्राप्त करून दिली,पण संगणक आज्ञावलीतील एका चुकीमुळे उपग्रह ३५६ किलोमीटर x ७६ किलोमीटर या लंबवर्तुळाकार कक्षेत प्रक्षेपित केले गेले. या कक्षेतील ७६ किलोमीटर हे अंतर पृथ्वीपासून एवढे जवळ आहे की वातावरणातील ओढीमुळे दोन्ही उपग्रह पृथ्वीकडे ओढले गेले. ही चूक  दुसऱ्या विकासात्मक उड्डाणात सुधारण्यात आली.  

SSLV हा घन प्रणोदक असणारा तीन टप्प्याचा प्रक्षेपक आहे. हा प्रक्षेपक द्रव प्रणोदनाधारित गती वियुज अनुखंडाद्वारे (velocity trimming midule) उपग्रहाला निर्धारित कक्षेत प्रस्थापित करतो. या प्रक्षेपकाद्वारे दहा किलोग्राम ते पाचशे किलोग्राम पर्यंतच्या लघु, सूक्ष्म व अती सूक्ष्म (mini, micro and nano) उपग्रहांना क्षैतीज कक्षेत (planar orbit) प्रस्थापित केले जाऊ शकते.  अंतरिक्षात गरजेनुसार उपग्रह त्वरित सोडण्याची संधी SSLV कमीत कमी किंमतीत पुरवू शकतो. कार्यवाहीसाठी लागणारा कमीत कमी वेळ, एकाधिक उपग्रहांना सामावून घेण्याची लवचिकता, मागणीनुसार प्रक्षेपणाची व्यवहार्यता, प्रक्षेपणासाठी पायाभूत सुविधांची किमान आवश्यकता यामुळे SSLV हा जगातील एक अग्रेसर प्रक्षेपक ठरणार आहे.

SSLV-D2 हा ३४ मीटर उंचीचा व दोन मीटर व्यासाचा प्रक्षेपक असून उड्डाण समयी त्याचे वजन ११९ टन होते.

EOS-07 हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह इस्त्रोने डिझाईन केलेला, विकसित केलेला आणि उत्पादित केलेला आहे. त्याच्या नवीन प्रयोगांमध्ये मिलिमीटर तरंग आर्द्रता ध्वनीजनक (Millimeter- wave Humidity Sounder) आणि वर्णपट निरीक्षक (spectrum monitoring) पेलोड्सचा समावेश आहे. उड्डाण समय त्याच्या वजन १५६.३ किलोग्रॅम होते त्याची आयुर्मयादा एक वर्ष असून त्याला २७.२१Ah च्या लिथियम आयन बॅटरीद्वारा ऊर्जा पुरवठा केला जातो. या उपग्रहाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. (अ) सूक्ष्म उपग्रह बस (micro satellite bus)¹आणि भविष्यातील कार्यरत उपग्रहांना हव्या असलेल्या नवीन तंत्रज्ञानाशी सुसंगत अधिभाराचा आराखडा व विकास करणे.

(ब)नवीन तंत्रज्ञान सामावून घेणाऱ्या सूक्ष्म उपग्रहांची निर्मिती कमीत कमी वेळात करणे.

JANUS-1 हा १०.२ कि.ग्रॅ.वजनाचा अंटारीस सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आधारित, तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दर्शविणाऱ्या कुशाग्र उपग्रहांच्या (smart satellite) मालिकेतील पहिला उपग्रह आहे. हा घटकीय वाहक (modular bus) प्रकारचा असून ऑनबोर्ड एज कॉम्प्युटिंग² च्या मदतीने मल्टी टेनंट पेलोड्स³,प्रोग्रॅमेबल स्मार्ट EPS⁴, S/X बँड⁵ SDR⁶, सिक्युअर TT&C⁷, SaaS⁸ प्लॅटफॉर्मसह डिजिटल ट्वीनिंग⁹ यांचे प्रात्यक्षिक दाखवितो.

AzaadiSAT-2 या उपग्रहाचे वजन ८.८ कि.ग्रॅ. आहे. या उपग्रह मोहिमेचा उद्देश अव्यवसायी आकाशवाणी संप्रेषण (Amareur radio communication) व LoRa¹⁰ या तंत्रज्ञानांचे प्रात्यक्षिक दाखविणे, अंतराळातील किरणोत्सर्गाच्या (radiation) पातळीचे मोजमाप करणे व विस्तारयोग्य उपग्रहांच्या बांधणीचे प्रात्यक्षिक दाखविणे हा आहे. भारताच्या सर्व राज्यांमधील ७५० विध्यार्थिनींना या उपग्रहावरील आधीभार तयार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले होते. स्पेस किडझ् इंडियाच्या विध्यार्थी संघाने या अधिभारांची जोडणी केली.

टिपा :-

  1. Satellite bus- हा उपग्रहाचा मुख्य भाग आणि संरचनात्मक घटक आहे. यामध्ये पेलोड्स व वैज्ञानिक उपकरणे असतात.
  2. Edge computing- ही एक संगणन क्रिया असून ती वापरकर्त्याजवळ किंवा विदेच्या उगमाजवळ केली जाते. संगणक सेवा वापरकर्त्याजवळ किंवा विदेच्या उगमाजवळ पुरविल्यामुळे वापरकर्त्याला किंवा संस्थेला जलद व विश्वासनीय सेवा मिळते.
  3. Multi-tanent payloads – एकाचवेळी एकाधिक वापरकर्त्यांना वापरता येण्याजोगे अधिभार.
  4. EPS- Encapsulated Post Script. याद्वारे व्हेक्टर ग्राफिक्सचे व्यवस्थापन केले जाते आणि घेतलेल्या प्रतिमांना उच्च विभेदन (high resolution) छपाईसाठी तयार केले जाते.

Vector graphics- कॉम्पुटरला क्रमाने दिलेल्या आज्ञा किंवा गणिती विधानांद्वारा तो रेषा किंवा आकार काढतो.

  1. Band- मायक्रोवेव्ह श्रेणीतील लहरींच्या वारंवारीतेनुसार त्यांचे गट केले आहेत, त्यांना बँड म्हणतात. त्यांनाs, x वगैरे नांवे दिली आहेत.
  2. SDR- Software Defined Radio ही एक रेडिओ दूरसंवाद प्रणाली आहे. जी विविध संकेतांवर (signals) कॉम्प्युटर सॉफ्टवेअरद्वारा प्रक्रिया करते.
  3. TT& C- Telimetry, Tracking and Command म्हणजे उपग्रहाकडून आलेल्या संकेतांची (signals) उकल (decoding) करणे, त्याद्वारे उपग्रहाची स्थिती व त्याचे ठिकाण ठराविणे आणि त्यानुसार उपग्रहाला आज्ञा पाठविणे.
  4. SaaS- Software as a Service यामुळे वापरकर्त्याला इंटरनेटवरील क्लाऊड आधारित ऍप्सशी संपर्क साधता येतो.
  5. Digital twining – एकाद्या भौतिक वस्तू, प्रक्रिया किंवा प्रणालीचे डिजिटल प्रतिरूप. याचा उपयोग प्रतिमानविधान (simulation), एकीकरण (integration), चाचणी (testing), देखरेख (monitoring) व देखभाल (maintenance) यांसाठी केला जातो.
  6. 10. LoRa- Long Range हे एक खाजगी मालकीचे आकाशवाणी दूरसंवाद तंत्र आहे. हे चिर्प स्प्रेड स्पेक्ट्रम (CSS) तंत्रज्ञानापासून घेतलेल्या स्प्रेड स्पेक्ट्रम मोड्युलेशन तंत्रावर आधारित आहे.

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments