मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतातील पहिल्या 100 श्रीमंतात एक शिक्षक सुध्दा !! ☆ संग्राहक – श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ भारतातील पहिल्या 100 श्रीमंतात एक शिक्षक सुध्दा !! ☆ संग्राहक – श्री विनय माधव गोखले ☆ 

फोर्ब्स’ने भारतातील सर्वाधिक श्रीमंतांची नुकतीच एक यादी प्रसिद्ध केली. या यादीमध्ये एकेकाळी ट्युशन्स घेणार्‍या एका शिक्षकाचाही समावेश केला आहे. ‘फोर्ब्स’ च्या म्हणण्यानुसार त्याची सध्याची संपत्ती १.८ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

एका शिक्षकाकडे असलेली इतकी रक्कम वाचून कदाचित आपणांस आश्चर्य वाटत असेल. पण, इतकी संपत्ती मिळविण्यामागे संघर्षही मोठाच आहे.

कोण हा शिक्षक ? काय आहे त्याचा संघर्ष ?

केरळ मधील कन्नूर जिल्ह्यातील अझिकोड या ठिकाणी एका शिक्षक दांपत्याच्या पोटी १९८० सालच्या दरम्यान त्याचा जन्म झाला. घरच्या शैक्षणिक वातावरणामुळे त्याच्यावर उत्तम संस्कार झाले. त्यामुळेच त्याने मेकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आणि तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करू लागला.

सुट्टीच्या निमित्ताने काही दिवस तो बेंगलोर ला गेला. तेथे त्याचे काही मित्र CAT परीक्षेची तयारी करत होते. त्या मित्रांना त्याने गणित विषयासाठी मार्गदर्शन केले. त्याचे ते सर्वच मित्र त्या परीक्षेत यशस्वी झाले.

त्या मित्रांनी त्याला ट्युशन सुरू करण्याविषयी आग्रह धरला. मित्रांच्या आग्रहाचा सकारात्मक विचार केला.

नोकरी सोडली आणि आपले संपूर्ण लक्ष ट्युशन देण्यावर केंद्रित केले.

त्याच्या शिकविण्याच्या पद्धतीने अल्पावधीतच तो लोकप्रिय झाला. त्याचा क्लास छोट्याशा खोलीतून हॉलमध्ये गेला. हॉल मधून ऑडीटोरियममध्ये आणि तेथून थेट स्टेडियममध्ये गेला. एकाच वेळी तब्बल २५००० विद्यार्थ्यांची त्याने ट्युशन घेतली. इतका तो प्रचंड प्रसिद्ध झाला.

प्रत्येक वेळी वेगवेगळ्या शहरात जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याने पैसा, वेळ आणि श्रम तिन्हींचा अपव्यय होऊ लागला. एकाच वेळी, एकाच ठिकाणाहून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल. असे साधन निर्माण करण्याचा विचार त्याच्या मनात डोकावू लागला आणि त्याला एक कल्पना सुचली. त्याने एक ऑनलाईन शिकवणी घेणारी ‘Think and Learn Private Ltd.’ ही कंपनी सुरू केली. त्याच्या माध्यमातून एक वेबसाईट सुरू केली. त्यावर अनेक व्हिडिओ अपलोड केले. अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होऊ लागला. ती साईट ही लोकप्रिय झाली.

मग त्याने एक ऍप तयार केले. या ऍपच्या माध्यमातून ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्याना सोप्या भाषेत सर्व विषयांचे शिक्षण, अगदी घरबसल्या मिळू लागले. अल्पावधीतच या ऍपने पालकांचे, विद्यार्थ्यांचे लक्ष आकर्षित केलेच शिवाय अनेक गुंतवणूक दारांचे ही लक्ष आकर्षित केले. आणि त्याला यशाच्या शिखरावर पोहचविले.

ते ऍप म्हणजेच BYJU’s आणि त्याचा संस्थापक बायजू रविंद्रन होय.

BYJU’s ही भारतातील नव्हे तर जगातील सर्वोत्तम एडटेक कंपनी आहे. एका खोलीत सुरू झालेल्या ट्युशन चा पसारा साऱ्या जगभर पसरला आहे. यासाठी बायजू रविंद्रनचे कष्ट, कामावरील श्रद्धा आणि स्वतःवरील विश्वास या गोष्टी कारणीभूत आहेत.

प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील सर्वोत्तम गुणाची जाण असणे फार गरजेचे आहे. एखादी गोष्ट अतिशय सोपी करून सांगणे हा सर्वोत्तम गुण बायजू यांच्याकडे होता.

त्याचा त्यांना शोध लागला. त्यामुळेच ते यशाच्या शिखरावर पोहोचू शकले.

आज भारतातील सर्वाधिक १०० श्रीमंतांच्या यादीत “बायजू रविंद्रन” यांचा समावेश आहे.

 

संग्राहक : श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈