डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २५ : ऋचा ८ ते १४ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २५ (वरुणसूक्त) – ऋचा ८ ते १४

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – वरुण 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील पंचविसाव्या  सूक्तात शुनःशेप आजीगर्ती  या ऋषींनी वरुण देवतेला आवाहन केलेले  असल्याने हे वरुणसूक्त म्हणून ज्ञात आहे. आज मी आपल्यासाठी वरुण देवतेला उद्देशून रचलेल्या आठ ते चौदा या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे. 

मराठी भावानुवाद ::

वेद॑ मा॒सो धृ॒तव्र॑तो॒ द्वाद॑श प्र॒जाव॑तः । वेदा॒य उ॑प॒जाय॑ते ॥ ८ ॥

नतमस्तक हो सारे विश्व यांच्या आज्ञेत 

द्वादश मास, जनवृद्धीचे ज्ञान यांसी ज्ञात

गणना कालाची करण्याची कला त्यास अवगत

तिन्ही काळ त्यांच्या आज्ञेमध्ये सारे हो नत ||८||

वेद॒ वात॑स्य वर्त॒निमु॒रोरृ॒ष्वस्य॑ बृह॒तः । वेदा॒ ये अ॒ध्यास॑ते ॥ ९ ॥

सर्वगामी उत्तुंग जयाचा असतो संचार

गतीशील पवनाचे आहे सामर्थ्य अति थोर

ऊर्ध्व राहती या वायूच्या विभिन्न ज्या देवता 

या सर्वांना वरुणदेवते तुम्ही ओळखुनि असता  ||९||

नि ष॑साद धृ॒तव्र॑तो॒ वरु॑णः प॒स्त्या३ स्वा । साम्रा॑ज्याय सु॒क्रतुः॑ ॥ १० ॥

आज्ञा अपुल्या गाजवूनिया समग्र विश्वावर

वरुणदेवता समर्थ करिते सुराज्य जगतावर

साम्राज्या प्रस्थापित करण्या विराज सप्तलोकी

अतिव आदरे सारे त्यांना घेती हो मस्तकी ||१०||

अतो॒ विश्वा॒न्यद्‍भु॑ता चिकि॒त्वाँ अ॒भि प॑श्यति । कृ॒तानि॒ या च॒ कर्त्वा॑ ॥ ११ ॥

निर्मिली देवे किती अद्भुते विश्वाला सजविती

ज्ञानी समर्थ देव तया कौतुके अवलोकिती 

मानस त्याचा अजुनी आहे नवाश्चर्य निर्मिण्या 

समर्थ तरीही त्यांना अपुल्या चक्षूने पाहण्या ||११||

स नो॑ वि॒श्वाहा॑ सु॒क्रतु॑रादि॒त्यः सु॒पथा॑ करत् । प्र ण॒ आयूं॑षि तारिषत् ॥ १२ ॥

समर्थ आहे हा आदित्य राजा विश्वाचा 

मार्ग आम्हाला दावित जावो सदैव सन्मार्गाचा

जीवन अमुचे करुन निरामय सुखी अम्हाला करा

आरोग्यमयी आयुष्याला वृद्धिंगत हो करा ||१२||

बिभ्र॑द्द्रा॒पिं हि॑र॒ण्ययं॒ वरु॑णो वस्त नि॒र्णिज॑म् । परि॒ स्पशो॒ नि षे॑दिरे ॥ १३ ॥

वस्त्र आपुले दिव्य नेसुनी मिरवितसे शोभेने 

कवच सुवर्णाचे तयावरी झळाळते तेजाने

सेवक त्याचे त्याच्या भवती नम्र उभे ठाकले

भव्य तयाच्या  रूपाने साऱ्या विश्वा दिपविले ||१३|| 

न यं दिप्स॑न्ति दि॒प्सवो॒ न द्रुह्वा॑णो॒ जना॑नाम् । न दे॒वम॒भिमा॑तयः ॥ १४ ॥

कपटीकृत्यांचा दुष्टांच्या यांना धाक नसे

मनुष्यजातीच्या द्वेष्ट्यांची भीतीही ना वसे

पातक करिती दुर्जन खल यांना भिववीती कसे

सर्वसमर्थ शक्तीशाली धाक कुणाचा नसे ||१४||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu.be/iPapZo5FexU

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments