सुश्री विभावरी कुलकर्णी
🌈 इंद्रधनुष्य 🌈
☆ हो ‘पोनोपोनो’… ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
डॉक्टर इलाहीकेला हयू लेन.
आज आपण एका अतिशय सुंदर ध्यान-साधने संबंधी जाणून घेऊ या।
याची माहिती मागच्या वर्षी एका अंकात आलेली आहे पण अंक कायम रहात नाहीत, ब्लॉगवर आणि पोस्ट द्वारे ही कोणीही केव्हाही वाचू शकेल।
तर काय झालं, काही वर्षांपूर्वी हवाई बेटावर एक हॉस्पिटल होतं जे केवळ खुनशी वेड्यांसाठी होतं। ज्यांना समाजाने ‘क्रिमिनली इनसेन’ ठरवून हाता – पायात साखळदंड बांधून डांबून टाकलं होतं.
त्यांना भेटायला फारसं कुणी येत नसे। ती इतकी भीषण जागा होती की नर्सिंग स्टाफ, स्वयंपाकी व डॉक्टर ही काही आठवडे, एखाद – दोन महिन्यांच्यावर तिथे टिकू शकत नसत.
अनेक रिसर्च सेन्टर्स, हॉस्पिटल, मनोवैज्ञानिक लोक मात्र येऊन येऊन वेगवेगळी संशोधनं करत।
रुग्णांवर त्याचा काहीही परिणाम होत नसे। ही थोर माणसं येऊन निष्कर्ष करून डिग्र्या घेत, ते कैदी मात्र आपल्या काळ्या विश्वात तळमळत, संतापत असत।
मग एक नवा माणूस आला. ‘ मी एक काही प्रयोग करू का?’ म्हणाला.
तिथले मोठे डॉक्टर्स म्हणाले, ‘ कर बाबा, तू ही ‘ कर।
त्याने सगळ्या रुग्णांच्या फाईल्स मागवल्या. एक छोटी खोली पुरेल म्हणाला. तो रोज सकाळी ९ला यायचा। खोलीचं दार बंद करून आतच असायचा. संध्याकाळी ५ वाजता निघून जायचा। परत दुसऱ्या दिवशी ९ला हजर.
तिथल्या लोकांनी फारसं लक्ष दिलं नाही. मग काही आठवड्यात फरक जाणवू लागला।
‘अरेच्चा ! हे खुनशी लोक जरा बरं वागतायत की.’
हळूहळू त्यांच्यात सुधारणा होऊ लागली. संताप, उद्विग्नता, क्रौर्य कमी दिसू लागलं.
ती परोलवर जाण्या योग्य झाली… बाहेरच्या कसलाही कंट्रोल नसलेल्या जगात, त्यांच्या राग – संतापाच्या नात्यात जाऊनही, ते मुदत संपल्यावर नीट परत येऊ लागले।
नर्सिंग स्टाफ, स्वयंपाकी, माळी, सुरक्षा कर्मचारी, सगळेच टिकू लागले. बदल होत होत ते रुग्ण बरेही होऊन बाहेर जाऊ लागले।
आणि चारच वर्षांनंतर एक दिवस असा उजाडला, की आता रुग्णच नाहीत म्हणून ते हॉस्पिटल चक्क बंद करावं लागलं ! असे दोनच राहिले होते ज्यांना सरकारने अमेरिकेतल्या हॉस्पिटलात हलवलं आणि ते खुनशी वेड्यांचं हॉस्पिटल बंद केलं !
सर्वच मानसोपचार तज्ञ, संशोधक, प्रसार माध्यमांना चक्रावून टाकणारी गोष्ट होती ही…..
त्यांनी विचारलं की ‘ हा चमत्कार झाला कसा?’
तिथल्या नर्सेस, डॉक्टर, सगळ्यांनी सांगितलं की ‘आधी’ व ‘नंतर’ यात ‘तो’ माणूस हा एकच फरक होता।
खरं तर तो एकाही रुग्णाला प्रत्यक्ष भेटलाही नाही. ‘ तुझं दु:ख सांग ‘ नाही, ‘ रडून मोकळा हो ‘ नाही, – काहीच नाही. त्याने नक्की काय केलं, ते आता त्यालाच विचारा, पण हे रुग्ण मुळापासून बरे झाले आहेत हे मात्र खरं।
ते गेले त्याच्याकडे। म्हणाले, ‘ नक्की काय केलात तुम्ही? इतके रुग्ण, तेही सगळी दुष्ट कर्म केलेले, वेडे, मनावर ताबा नसलेले, तुम्ही बरे कसे केलेत? काय जादू केलीत? ‘
त्या हवाईयन माणसाचं नाव होतं डॉक्टर इलाहीकेला हयू लेन.
त्याने हसून शांतपणे उत्तर दिलं…..
“आमच्या हवाईयन प्रथेत असं मानतात की बाहेरच्या जगात, समाजात जे काही चाललं आहे, ते फक्त आपल्या आत मनात जे आहे, केवळ त्याचंच प्रतिबिंब आहे. तुम्हाला बाहेरची परिस्थिती बदलायची असेल तर तुमच्या मनाची स्थिती बदला. “
त्यांनी स्वत:वर उपचार केले होते ! —-
— कसे?
त्यांनी हवाईयन संस्कृतीतलं ‘हो’पोनोपोनो’ केलं होतं. या शब्दाचा अर्थ आहे ‘ चूक दुरुस्त करणं ‘.
डॉक्टर लेननी प्रत्येक गुन्हेगाराची केस-फाईल आधी नीट वाचली. त्याने केलेले खून, दरोडे, सगळं जाणून घेतलं. मग फाईल बंद करून शांतपणे बसून त्या व्यक्तीला उद्देशून मनाशी चार वाक्यं म्हटली —
१. माझं चुकलं. (I am sorry).
२. मला माफ कर. (Please forgive me).
३. मी तुझे आभार मानतो. (Thank you).
४. माझं तुझ्यावर प्रेम आहे. (I love you).
समाजात सगळ्या प्रकारच्या वृत्ती – प्रवृत्ती असतात. संताप, निराशा, हिंसा, क्रूरपणा – मनाने दुर्बल असलेले — या वृत्ती एखाद्या स्पंजसारख्या शोषून घेतात. मग त्याच गुणाकाराने सगळीकडे वाढतात.
डॉक्टर लेननी असं मानलं की “ माझ्या मनातल्या अशा सुप्त वृत्तींचंच बाह्य प्रक्षेपण या रुग्णांतून होत आहे. यांना सुधारायचं असेल तर मला माझ्या मनातली हिंसा कमी केली पाहिजे.”
प्रत्येक रुग्णाची फाईल वाचून त्याला ‘ माझं चुकलं’, ‘मला माफ कर’, ‘मी तुझा आभारी आहे’ व ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ असं सांगून त्यांनी त्या रुग्णाला तर सबळ, सकारात्मक बनवलाच, पण स्वत:च्या मनातली सुप्त हिंसाही शांत केली.
आपल्याला जगात काय चाललंय ते कळतच नाही, ‘ लोक असे कसे वागतात न? ‘ असं म्हणायची खोड आहे, पण स्वत:च्या मनाचा अजिबात थांग नसतो. आजूबाजूच्या जगातल्या घडामोडीमधून तुम्हाला जर सतत हिंसाच दिसत असेल तर तुमच्या मनात ती भरपूर आहे. तिची खाज कमी करायच्या प्रयत्नात तुम्ही त्या बातम्या चवीने वाचता, चर्वितचर्वण करता, घरच्यांवर भडकता, सरकारला शिव्या देता व सगळ्यांना फाशी दिल्याशिवाय देशाचं काही भलं होणारच नाही असं छातीठोकपणे सांगता…..
विचार करा !—
ही चार वाक्यं एक अतिशय शक्तिशाली अशी साधना आहे. तुम्ही प्रत्येकाने ही नक्की करून बघा.
कशी करावी?—-
एक जागा निवडून तिथे डोळे मिटून २ मिनिटं {तरी!} शांत बसा.
ज्या व्यक्तीशी तुमचे संबंध चांगले नाहीत, त्रास होतो, तिला नजरेसमोर आणा.
मग तिला उद्देशून ही ४ वाक्यं मनापासून म्हणा.
मनातच म्हणायची आहेत, म्हणून माफी मागायला हरकत नसावी !
आपल्या कुटुंबियांपासून सुरुवात करा.
तुम्हीच त्यांना जन्म घेण्याआधी निवडलं आहे, म्हणून संबंध सुधारून पुढच्या प्रगतीसाठी मोकळे व्हा।
Ps: The Hawaiian word ho’oponopono comes from ho’o (“to make”) and pono (“right”). The repetition of the word pono means “doubly right” or being right with both self and others. In a nutshell, ho’oponopono is a process by which we can forgive others to whom we are connected.
ओम शांती
माहिती संग्रहिका : सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈