सुश्री मंजुषा सुनीत मुळे
इंद्रधनुष्य
☆ “ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” – लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ माहिती संकलन : मंजुषा सुनीत मुळे ☆
३१ मे – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची जयंती. मला एका जाहीर कार्यक्रमात एकदा कुणीतरी प्रश्न विचारला होता, ‘तुम्हाला भारतीय इतिहासातली कुठली स्त्री आदर्श वाटते’?
मार्मिक प्रश्न होता, अगदी ब्रह्मवादिनी गार्गी आणि मैत्रेयीपासून ते झाशीच्या राणीपर्यंत भारतीय इतिहासात आदर्शवत वाटू शकणाऱ्या खूप स्त्रिया आहेत पण त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून माझ्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा आली ती एक शुभ्रवस्त्रावृता, विलक्षण बोलक्या डोळ्यांची एक कृश स्त्री जी आयुष्यभर केवळ इतरांसाठीच जगली. नगर जिल्ह्यातल्या जामखेड च्या चौंडी गावच्या एका साध्या धनगराची ही मुलगी, मल्हारराव होळकरांच्या दृष्टीला काय पडते, तिची कुवत त्यांच्या पारखी नजरेला काय समजते आणि त्यांच्या एकुलत्या एक मुलाची पत्नी म्हणून ती आजच्या मध्य प्रदेशाच्या इंदौर संस्थानात काय येते आणि पूर्ण देशाच्या इतिहासात स्वतःचं नाव काय कोरते, सारंच अद्भुत.
अहिल्याबाईना त्यांच्या खासगी आयुष्यात फार कमी सुखाचे दिवस लाभले. त्यांचे पती फार लवकर गेले. त्या काळच्या रीतीप्रमाणे सती जायला निघालेल्या अहिल्याबाईंना मल्हारबांनी मागे खेचलं, तिच्या राज्याप्रती असलेल्या कर्तव्यांची आठवण करून देऊन. मल्हारबांच्या शब्दाखातर अहिल्याबाईनी सतीचे वाण खाली ठेवले आणि त्याबदलात अनेक लोकापवाद झेलले पण त्यानंतर जे आयुष्य त्या जगल्या ते निव्वळ व्रतस्थ होते. त्यांना दीर्घायुष्य लाभले. थोरले बाजीराव पेशवे ते नारायणराव ही पेशवाईतली स्थित्यंतरे त्यांनी जवळून बघितली, पानिपतचा दारुण पराभव बघितला, राघोबादादाची कारस्थाने बघितली, ब्रिटिशांची भारत देशावरची हळूहळू घट्ट होणारी पकड बघितली आणि त्यांच्या डोळ्यांसमोर इतकी राजकीय स्थित्यंतरं घडत असताना त्यानी होळकरांच्या त्या चिमुकल्या संस्थानात न्याय आणि सुबत्ता तर राखलीच, पण देशभर धर्माचे काम म्हणून मुसलमानांनी उध्वस्त केलेली मंदिरे परत बांधली, गोर गरीबांसाठी जागोजाग धर्मशाळा बांधल्या, नद्यांना घाट बांधले, आणि हे सर्व केले ते स्वतःच्या खासगी मिळकतीतून.
त्यांच्या दुर्दैवाने ज्या ज्या व्यक्तिवर त्यांनी जीव लावला त्या त्या व्यक्तीकडून त्यांच्या पदरी निराशाच आली. मुलगा व्यसनी, बदफैली निघाला. त्यांच्या डोळ्यासमोर मुलाचा करुण मृत्यू अहिल्याबाईंना बघावा लागला. अत्यंत लाडकी अशी त्यांची मुलगी मुक्ता, नवऱ्यामागे सती गेली. स्वतः सती जाण्यापासून मागे हटलेल्या अहिल्याबाई काही तिला थांबवू शकल्या नाहीत. तिचा मुलगा, त्यांचा नातू, तोही त्यांच्या डोळ्यासमोर मृत्यू पावला. हे सर्व आघात त्यांनी झेलले आणि जगल्या त्या निव्वळ रयतेसाठी. निष्कलंक चारित्र्याच्या, व्रतस्थ प्रशासक असलेल्या ह्या कणखर स्त्रीचे चारित्र्य खरोखरच प्रेरक असेच आहे.
लेखिका : सुश्री शेफाली वैद्य
माहिती संकलन : मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈