🌈 इंद्रधनुष्य 🌈
☆ आपली आडनाव पडली तरी कशी? – भाग-2 ☆ प्रा. डॉ. सतीश कदम ☆
(पूर्वीपासून आतापर्यंत सर्व इतिहास…)
इतर सेवेबरोबरच धार्मिक सेवा करण्याकरिताही इनाम देण्यात आले. गावात गुरव आणि मस्जिदीकरिता मौलवींना वतन मिळाले. पूजाअर्चा आणि भाकित वर्तविण्याकरिता जोशी वृत्ती आली. त्यातून ग्रामजोशी, कुडबुडे जोशी हे प्रकार आले. गावचा आणखी एक महत्त्वाचा वतनदार म्हणजे महार वतन, ज्याला ‘हाडकी हाडोळा’ म्हटले गेले. कोतवाल, जागल्या व येसकर ही गावकामे महाराकडे होती. गावच्या संरक्षणाची जबाबदारी महार आणि मांग अशा दोन्ही समाजाकडे असली तरी सरकारकडून वतन मिळाले फक्त महारांनाच. छत्रपती शिवरायांनी तर आपल्या नातलगाला वगळून वाई गावचे वतन एका महाराला दिल्याची नोंद सापडते.
गाव वाढला की व्यापार वाढला आणि त्यातून गावात स्वतंत्र पेठ हा भाग निर्माण झाला. या पेठेची व्यवस्था लावण्याकरिता शेटे आणि महाजन हे वतनदार आले. त्यांच्याकडे बाजारपेठेशी निगडित सर्व व्यवस्था आली. प्राचीन काळी गाव हा स्वयंपूर्ण घटक होता. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे करण्याकरिता आलुतेदार आणि बलुतेदार आले. पारंपरिक कामगार म्हणजे आलुतेदार. ज्यामध्ये जंगम, गोंधळी, कोळी, सुतार, सोनार, शिंपी, माळी, गोसावी, तांबोळी, घडशी, तेली, वेसकर यांचा समावेश होता. तर बलुतेदार म्हणजे मोबदला घेऊन सेवा देणारे. यात जोशी, भाट, गुरव, सुतार, लोहार, कुंभार, मुलाणी, न्हावी, परीट, मांग व चांभार. गावची शेती व त्याला एक मानून त्या शेतीचे म्हणजे गायीचे वाटेकरी म्हणजे आलुते-बलुते आले. त्यांच्या दर्जानुसार त्यांना पहिली कास, दुसरी कास, तिसरी कास याप्रमाणे मोबदला मिळायचा. अर्थात त्यांचा मोबदला धान्याच्या स्वरूपात होता. एका नांगरामागे दोन पाचुंदे, तीन पाचुंदे बलुतेदारांना खळ्यावरच द्यावे लागायचे. अर्थात गरिबांना त्याची स्वत:च रास करावी लागायची. आताचे सरकार थेट धान्यच देते. चलनवापर नगण्य होता. परंतु तेही सोन्या-चांदीचे असल्याने त्याची पारख करण्याकरिता सोनार घेण्यात आला. त्याला पोतदार म्हटले गेले.
दहा पाटलांवर अर्थात गावावर एक देशमुख आला. देश आणि मुलुख आणि मुख म्हणजे प्रमुख अर्थातच त्याला ‘हेड ऑफ द डिस्ट्रिक्ट’ म्हटले गेले. अनेक गावचा परगणा तयार व्हायचा. त्याचा अधिकारी म्हणजे देशमुख. नवीन वसाहत वसविणे, मुलकी आणि लष्करी व्यवस्था लावणे, पाटलांकडील महसूल सरकारमध्ये जमा करण्याचे काम करावे लागे. याचबरोबर आपल्या परगण्यात वसूल आणि शांतता अशा दोहोंची जबाबदारी पाटलांवर होती. शिवाय राजाला गरज पडल्यास ससैन्य त्याच्यासोबत स्वारीवर जावे लागे. त्यामुळे संरक्षणातून व उत्पन्नातून पाटलांचे वाडे तर देशमुखांच्या गढ्या निर्माण झाल्या. नोंद ठेवण्याकरिता देशपांडे पद निर्माण झाले. देशपांडेच्या हाताखाली मोहरीर म्हणजे मदतनीस असायचा. त्यांना इतरही अधिकारी मदतीला आले. वतनदारीची पद्धत प्राचीन असली तरी १६१४ ला निजामशाहीचा प्रधान मलिक अंबरने यात सुसूत्रता आणून महसुलाचे अधिकार गावांना दिल्याने खेडी स्वयंपूर्ण झाली. परंतु वतनदारांचा वरचढपणा वाढला. कान्होजी जेधे, बाजी पासलकर, कोयाजी बांदल यासारखी सर्व मंडळी आदिलशहाची जहागिरदार असूनही स्वराज्यासाठी त्यांनी वतनावर पाणी सोडले. शिवरायांनी देशमुखीला वठणीवर आणताच अनेकजण त्यांच्या विरोधात गेले. पुढे छत्रपती राजारामांनी परत वतनदारी सुरू केली तेव्हा स्वातंत्र्यलढ्याला जोर आला.
देशमुख, देशपांडेच्या हक्कांना रुसूम आणि भिकणे म्हटले जायचे. यांना मदतीसाठी णीस म्हणजे कारकून अर्थातच चिट (स्टेनो), फड (मुख्य कार्यालय) ही विविध पदे निर्माण झाली. कर्नाटकात याला नाडगावुडा किंवा नाडकर्णी म्हणतात. एकूण उत्पन्नाच्या वसुलीतून देशमुखांना २० टक्के तर पाटलांना १० टक्के वाटा असायचा. पाटील आणि देशमुख वरवर स्वयंपूर्ण दिसत असले तरी सरकारी अधिकारी मामलेदाराची तपासणी करताना त्यांना कसरत करावी लागायची. परंतु एकदा त्याला खुश केले की, ही मंडळी राजाच. छत्रपती शिवरायांनी या वतनदारावर विसंबून न राहता कमाविसदार, महालकरी, सुभेदार असे स्वतंत्र अधिकारी नेमून राज्याची व्यवस्था लावली.
पुढे इंग्रजांनी १८७४ ला बलुतेदारी, १८७९ ला रयतवारी बंद केली तर स्वातंत्र्यानंतर १९५५ ला एका कायद्यानुसार संपूर्ण वतनदारीच संपुष्टात आली. वाडे, गढ्या, हक्क, मानमरातब जाऊन वतनदार रोजंदारीवर आले. परंतु पाटील, कुलकर्णी अथवा अशा सर्वच वतनदारांनी आपले मूळ आडनाव तेच का ठेवले समजत नाही .
हा आडनावाचा महिमा भारतातच नाही तर जपानमध्येही सापडतो. त्यानुसार तानाका (शेतीच्या मध्यभागी असणारा), यामादा (डोंगरावर शेती करणारा), हायाशी (जंगलातला ) अशी आडनावे आहेत.
असा हा वतनातून आडनावाचा महिमा मोठा आहे हेच खरे.
– समाप्त –
© प्रा. डॉ. सतीश कदम
इतिहास संशोधक,व्याख्याते
मो.क्र.9422650044
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈