श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ रणी जो सहकारी माझा… ☆ श्री संभाजी बबन गायके 

रणी जो सहकारी माझा…. तो प्राणांहूनी प्रिय मजला ! अर्थात Leave nobody behind… Leave no buddy behind! 

भारतीय सेना…. नाईक अमोल तानाजी गोरे या पॅरा कमांडो ची दृढ हिम्मत व बलिदानाची सत्यकथा.

“साहेब, मी जाऊ का?… माझा जोडीदार तिथे जखमी होऊन पडलाय… मी त्याला इथं सुरक्षित घेऊन येतो !” जवानाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आग्रहाच्या स्वरात परवानगी मागितली… आणि परवानगी नाही मिळाली तरी तो जाणारच होता असं स्पष्ट दिसत होतं. 

साहेब म्हणाले, “ तू जाऊ शकतोस तुला हवं असेल तर. पण तू तर पाहतोयस… तुफान गोळीबार सुरू आहे. आपल्या सैनिकांचे मृतदेह चहूबाजूला विखुरलेले दिसताहेत. आणि तुझा तो जोडीदार तर इतका जखमी आहे की तो जिवंत असेल अशी शक्यता नाही. कशाला जीव धोक्यात घालतोयस ? ” 

साहेबांनी उच्चारलेलं “ तू जाऊ शकतोस….!” हे एवढंच वाक्य प्रमाण मानून तो जवान मोकळ्या मैदानात धावत निघाला… 

चहु बाजूंनी गोळीबार सुरूच होता. मोकळ्या मैदानातलं लक्ष्य टिपणं शत्रूच्या बंदुकांना काही फार अवघड नव्हतं. पण याच वायुवेगानं धावणं आणि धावता धावता फैरी झाडणं यामुळे शत्रूलाही थोडे जास्त कष्ट घ्यावे लागले होते. पण गडी जबर जखमी व्हायचा तो झालाच…आगीत उडी घेतल्यावर दुसरं होणार तरी काय म्हणा?”

यानेही जमेल त्या दिशेला फायरिंग सुरू ठेवलं आणि पळणंही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या सहकारी सैनिकाला त्याने पटकन खांद्यावर उचलून घेतलं आणि जीवाच्या आकांताने तो खंदकात परत आला ! 

“ मी तुला म्हटलं होतं ना बेटा… तू सुद्धा जखमी होशील… तसंच झालं ना? अरे हा तर केंव्हाच खलास झालाय आणि तूही जगणार नाहीस….! ” साहेबांनी कापऱ्या आवाजात म्हटलं ! 

“ साहेब, मी पोहोचलो… तेव्हा याचे श्वास सुरू होते ! ‘ मला माहित होतं… तू  माझ्यासाठी जरूर येशील ! ‘ हे त्याचे शब्द होते साहेब… शेवटचे ! माझ्या खांद्यावरच प्राण सोडला त्याने… ‘ येतो मित्रा !’ म्हणत ! मी मित्राप्रती असलेलं माझं कर्तव्य निभावलं साहेब ! त्याच्या जागी मी असतो ना तर त्यानेही माझ्यासारखंच केलं असतं साहेब ! हेच तर शिकवलं आहे ना फौजेनं आपल्याला ! ” असं म्हणून या जवानानेही डोळे मिटले… कायमचे ! त्याचा मित्र मरणाच्या वाटेवर फार पुढं नसेल गेला… तोवर हाही निघालाच त्याच्या मागे. 

युद्धात कुणाचं तरी मरण अपरिहार्यच असते. सगळा शिल्लक श्वासांचा खेळ. किती श्वास शिल्लक आहेत हे देहाला ठाऊक नाही आणि मनालाही. असे अनेक देह झुंजत असतात देश नावाच्या देवाच्या रक्षणार्थ. या देवाचे भक्त एकमेकांच्या विश्वासावरच तर चालून जातात मरणावर… मारता मारता झुंजतात.

…  क्षणभरापूर्वी सोबत असलेला आपलाच सहकारी सैनिक देहाच्या ठिकऱ्या उडालेल्या अवस्थेत पाहताना फार वेळ त्याच्याकडे पहात बसायला, शोक व्यक्त करायला शत्रू उसंत देत नाही ! जखमी झालेल्या, वेदनेने विव्हल झालेल्या आणि प्रियजनांच्या आठवाने व्याकूळ झालेल्या जोडीदाराला आपल्या बाहूंच्या बिछान्यावर घडीभर तरी निजवावे अशी इच्छा असते त्याच्या जोडीदाराची… त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याचा हात सोडू नये अशी अनिवार इच्छा असते… तो जाणारच आहे हे दिसत असतानाही ‘ सगळं ठीक होईल !’ असं सांगत राहण्याची हिंमतही असावी लागते म्हणा !

पण हेच जातिवंत सैनिकांचं वैशिष्टय. खांद्याला खांदा लावून लढायचं… जोडीदाराच्या दिशेने येणाऱ्या मृत्यूला आपल्या जीवाचा पत्ता सांगायचा… कुणी पडला तर त्याला खांद्यावर वाहून आणायचं… नाहीच तो श्वासांचा पैलतीर गाठू शकला तर ओल्या डोळ्यांनी त्याची शवपेटी खांद्यावर घेऊन चालायचंही ! डोळ्यांतील दु:खाची आसवं आटताच त्याच डोळ्यांत प्रतिशोधाचा अंगार पेटवायचा आणि शत्रूवर दुप्पट वेगाने तुटून पडायचं… हेच सैनिकी कर्तव्य आणि सैनिकी जीवनाचं अविभाज्य अंग ! नाम-नमक-निशान  लढायचं आणि प्रसंगी मरायचं ते पलटणीच्या नावासाठी… देशानं भरवलेल्या घासातल्या चिमुटभर मिठाला जागण्यासाठी रक्ताचं शिंपण करायचं आणि पलटणीचा झेंडा गगनात अखंड फडकावत ठेवायचा… ही आपली भारतीय सेना ! 

अनेक सहकाऱ्यांचा जीव वाचत असेल तर आपल्या एकट्याच्या जीवाचं काय एवढं मोल? म्हणत मरणाला सामोरं जाणाऱ्या सैनिकांच्या कथांनी तर आपल्या भारतीय सेनेचा इतिहास ओतप्रोत भरलाय. 

१४ एप्रिल २०२३ रोजीचा प्रसंग. शत्रू सतत आपल्या सीमेमध्ये घुसण्याच्या प्रयत्नांत असतो म्हणून सीमेवर गस्त घालत राहणं अत्यावश्यकच. राजकीय करारामुळे शत्रू सीमेपलीकडून गोळ्या नाही झाडत सध्या, पण हवामान नावाचा छुपा शत्रूही सतत डोळे वटारून असतो चीन सीमेवर. बर्फाच्या कड्यांना,नद्यांच्या जीवघेण्या वेगाला देशांच्या सीमा ठाऊक नाहीत.

… त्यादिवशी नाईक अमोल तान्हाजी गोरे आपल्या सहकारी जवानांसोबत बर्फातून वाट काढत काढत अत्यंत सावधानतेने गस्त घालीत होते. आणि… अचानक भयावह वेगाने वारा वाहू लागला, आभाळातल्या काळ्या ढगांनी उरात साठवून ठेवलेला जलसागर एकदमच ओतून दिला. नद्यांमध्ये हे पाणी मावणार तरी कसे? आधीच बर्फ, त्यातून हा वरून कोसळणारा मुसळधार पाऊस. उधाणाच्या भरतीला समुद्रात उसळते तशी एक मोठी लाट उसळली नदीत… आता नदी आणि तिचा काठ यात काहीही फरक उरला नव्हता… पाण्यासोबत दगड-गोटे वेगाने वाहात येत होते. 

नाईक अमोल साहेबांचे दोन मित्र कधी नदीच्या प्रवाहात ओढले गेले ते समजले सुद्धा नाही क्षणभर. नाईक अमोल साहेब पट्टीचे पोहणारे. पॅरा कमांडो आणि पोहण्यात विशेष प्रशिक्षण घेतलेले. अंगापिंडानं एखाद्या खडकासारखा मजबूत.  त्याने दुसऱ्याच क्षणाला त्या प्रपातामध्ये झेप घेतली. शरीरातली सर्व शक्ती आणि अत्यंत कठोर परिस्थितीत घेतलेलं कमांडो प्रशिक्षण पणाला लावलं! दोन्ही दोस्त हाती लागले…  Leave no man behind ! अर्थात जोडीदाराला सोडून जायचं नाही.. प्रसंगी प्राणांवर बेतलं तरी बेहत्तर ! हे शिकले होते अमोलसाहेब. आणि सैन्यात शिकलेलं आता अंमलात नाही आणायचं तर कधी? उद्या ही वेळ आपल्यावरही येऊच शकते की ! 

सैन्यात सहकाऱ्यास ‘बडी’ म्हणजे सवंगडी-मित्र-दोस्त म्हणतात.. एकमेकांनी एकमेकांचा जीव वाचवायचा… त्यासाठी जीव द्यायचा किंवा घ्यायचाही ! कर्तव्यापुढे स्वत:च्या ‘अमोल’ जीवाचं मूल्य शून्य ! 

…. हाडं गोठवणारं थंड, वेगवान पाणी अमोल साहेबांना रोखू शकत नव्हतं. पण नदीच्या वरच्या उंचावरून गडगडत आलेला एक मोठा पत्थर… मानवी शिराचा त्याच्या प्रहारापुढे काय निभाव लागणार? त्या दोघा जीवाभावाच्या बांधवांना काठावर आणताना अमोल साहेबांना आपल्या डोक्यावरचा हा प्राणांतिक आघात लक्षातही आला नसावा… वाहत्या पाण्यासवे त्यांचं रुधिरही वेगानं वहात गेलं… त्या लाल रक्तानं त्या पाण्यालाही आपल्या लाल रंगात रंगवून टाकलं… पण रक्ताशिवाय प्राण कसा श्वास घेत राहणार? 

नाईक अमोल तान्हाजी गोरे साहेब दोन जीव वाचवून हुतात्मा झाले ! भारतीय सैन्याची उच्चतम परंपरा त्यांनीही पाळलीच. 

 

        २४ एप्रिल २०२३ रोजी, म्हणजे अवघ्या दहा दिवसांनी ते घरी सुट्टीवर येणारच होते… आपल्या चार वर्षांच्या मुलाला, पत्नीला, आई-वडीलांना आणि सवंगड्यांना भेटायला…..  आणखी बरीच वर्षे देशसेवा करायची होती. पण अरूणाचल प्रदेशातील ईस्ट कामेंग मधल्या त्या नदीच्या पाण्याला अमोल साहेबांना आपल्या सोबत घेऊन जायचं होतं… कायमचं ! —  

— एक देखणं, तरूण, शूर, शरीरानं आणि मनानं कणखर परोपकारी आयुष्य असं थांबलं !  पण दोन जीव वाचवून आणि आपला जीव गमावून… एकाच्या बदल्यात दोन आयुष्यांची कमाई करून दिली अमोल साहेबांनी ! 

नियतीचा असा हा तोट्याचा सौदा सैनिक हसत हसत मान्य करतात… हीच तर आपली सैनिकी परंपरा. अशाच सैनिकांमुळे आपले अस्तित्व टिकून आहे…

जयहिंद! 🇮🇳

पश्चिम विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील सोनखस या गावातील सैनिक १४ एप्रिल,२०२३ रोजी चीन सीमेवर गस्त घालताना झालेल्या दुर्घटनेत हुतात्मा झाले. त्यांच्या चितेच्या ज्वाळा अजून पुरत्या विझल्याही नसतील. आपण आपल्या या वीरासाठी आपल्या आराध्य देवतेकडे प्रार्थना करूयात… त्यांच्या सर्व कुटुंबियांना हा प्रचंड आघात सहन करण्याची शक्ती मिळो ! त्यांच्या चार वर्षांच्या बाळासाठी आशीर्वाद मागूयात. 

हुतात्मा नाईक अमोल तान्हाजी गोरे…..अमर राहोत !

🇮🇳 जयहिंद! जय महाराष्ट्र! 🇮🇳

(मला जमलं तसं लिहिलं ! अशा बातम्या वृत्तपत्रे, वाहिन्या आठ-दहा वाक्यांत उरकतात. एखाद्या रस्ते अपघाताची बातमी द्यावी तसं सांगतात.. लिहितात. त्यामुळे बरेचदा सैनिकांचे शौर्य जनमानसापर्यंत पोहोचू शकत नाही, असं मला वाटतं, म्हणून मी जरा वेगळ्या पद्धतीने लिहिले. तांत्रिक बाबींमध्ये काही तफावत असूही शकते. उद्देश फक्त एकच… हौतात्म्याचं स्मरण व्हावं, त्यांच्या नावाचं उच्चारण व्हावं !)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments