सुश्री विनिता तेलंग

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘पुरोगामिनी सावित्री…’ – भाग-2 ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

(माझी बुद्धी,तर्क आणि संवेदना याच्याचकडे धाव घेत आहेत.मी आता माझा निर्णय बदलणार नाही.राहिले दैव,तर मी क्षात्रकन्या आहे.मी जीवनाशीच काय, मृत्यूशीही झुंजेन! माझ्यावर विश्वास ठेवा .) इथून पुढे —

राजा राणीने कन्येच्या इच्छेचा मान ठेवला.तिच्यावर टाकलेला विश्वास,तिला दिलेला स्वयंनिर्णयाचा अधिकार त्यांनी काढून घेतला नाही. तातडीने वनात जाऊन तिचा विवाह सत्यावानाशी करून दिला.सावित्री वनात राहू लागली.सीतेप्रमाणे सर्व राजवस्त्रे,सुविधा , सवयी यांचा त्याग करून ती आश्रमीय जीवनात समरसून गेली.

अखेर तो दिवस आला.सत्यवान सावित्री वनात गेले होते.झाडावर चढलेला सत्यवान अचानक खाली कोसळला.त्याचे प्राण न्यायला यमदेव आले.

आपला प्राणप्रिय सहचर आपल्याला सोडून जात आहे हे समोर दिसत असूनही सावित्री डगमगली नाही.तिनं यमाशी संवाद केला.त्याला प्रश्न विचारले.मानवाचे प्रयत्न,त्याची अभीप्सा,त्याचं जीवनध्येय याच्याशी काही संबंध नसलेल्या यमाशी आणि आपल्या हातात मृत्यू आहे म्हणजे आपणच सर्वश्रेष्ठ या त्याच्या अहंकाराशी ती लढली.

मृत्यूपूर्वी येऊन माणसाला भ्रमित करणाऱ्या भय,अविश्वास,संभ्रम, अज्ञान, मोह या यमदूतांना तिनं ओळखलं.त्यांच्या आक्रमणामुळे तिनं आपली सकारात्मकता,जीवनेच्छा त्यागली नाही. प्रयत्न सोडले नाहीत.मनुष्याने जीवनाला योग्य रीतीनं समजून घेतलं,मृत्यूचे डावपेच ओळखून वेळीच पावलं उचलली तर मनुष्य दीर्घायुषी होऊ शकतो हे तिनं सिध्द केलं.मन शांत ठेवून विचार केला आणि संवाद सुरु ठेवला तर समस्या सोडवता येतात हे तिनं दाखवलं .

सावित्रीची कथा भाकडकथा नाही.

अश्व म्हणजे इंद्रिये. त्यांना वश केलेला राजाअश्वपती.सूर्य म्हणजे साक्षात, अखंड उर्जा व जीवनाचे प्रतीक.

त्याच्या उपासनेतून झालेली त्याची कन्या सावित्री.दृष्टी असूनही अंध झालेला व त्यामुळे राज्य गमावलेला राजा द्युमत्सेन आणि सत्याचा अविरत ध्यास घेतलेला सामान्य मानव सत्यवान.ही नावेही किती सूचक आहेत!

प्रथम इंद्रिय सुखांवर विजय मिळवा,व्यक्तिगत सुख व स्वार्थापलिकडे जाऊन विशाल अशी विश्वकल्याणाची मनीषा करा,

त्याकरता समाजाचे सहकार्य घेऊन अविरत प्रयत्न करा हे ‘राजा’ अश्वपती सांगतो.’पिता’ अश्वपती त्याच्याही पुढे जाऊन व्यवहारात कसं वागायला हवं हे शिकवतो.पुत्राऐवजी कन्या मिळाली म्हणून निराश न होता तो तिला समर्थ बनवतो.तुझा जन्म केवळ वंशवृद्धी करता नाही तर तुला मानवी जीवनाला काही नवा अर्थ द्यायचा आहे हे तिच्या मनात रुजवतो.

डोळसपणे वाढवलेल्या तरुण,देखण्या लेकीला पूर्ण विश्वासाने प्रवासाला पाठवतो आणि वरसंशोधनात पूर्ण मोकळीक देतो.तिच्या निवडीनंतरही सत्यवान धनिक नाही,राजगृहात रहात नाही या कारणांचा उल्लेखही करत नाही.लेकीचा संसार सुखाचा व्हावा या एकमात्र अपेक्षेलाही तो त्यागतो आणि तिच्या आत्मविश्वासपूर्ण निर्णयाच्या पाठीशी उभा रहातो.

राणीही आपल्या मातृसुलभ मोहाला आवरते.तिची पाठवणी करताना धनधान्य-सेवक-वस्त्रालंकार-राजवाडे-राज्य असं काहीही न देता तिचा व तिच्या कुटुंबाचा स्वाभिमान ते जपतात,तिच्या प्रयत्नवादावर पूर्ण विश्वास ठेवतात.

सावित्रीनं सत्यवानाचे प्राणच नाही तर सासरे द्युमत्सेन यांची गेलेली दृष्टी, गमावलेले राज्य परत मिळवले असे कथा सांगते.या करता सावित्रीने वर्षभर किती प्रयत्न केले असतील!

तिनं स्वतःचं ध्येय निश्चित केलं असेल त्याकरता स्नायुबल, देहबल, मनोबल, बुद्धिबल, आत्मबल एकवटलं असेल ..कदाचित तिने वनातल्या लोकांचे सहाय्य घेतले असेल तिथल्या ऋषी मुनींचे आशीर्वाद,त्यांचे ज्ञान याचे पाठबळ तिला मिळाले असेल..

चिरंजीवित्वाचे प्रतीक असलेल्या ,आपले खोड नाहीसे झाले तरी आपल्या पारंब्या मातीत घट्ट रुजवत राहिलो तर आपण अमर होतो हे तिला सांगणाऱ्या वटवृक्षाला तिनं आपलं प्रेरणास्थान मानलं असेल ..वडाच्या औषधी गुणधर्माचा तिनं वापर केला असेल .. मृत्यूवर मात या कल्पनेकडेही कितीतरी अर्थांनी पाहता येते..

सावित्रीनं जे केलं ते कोणत्याही प्रेमिकेनं केलं नसेल.या कथेद्वारे सावित्री आपल्याला आजच्या काळासाठीही उपयुक्त असं खूप काही सांगते आहे.

तिनं ईश्वर निर्मित जीवसृष्टी,मानवी जीवन व मृत्यूचा खरा अर्थ समजून घेतला असेल, निसर्गाशी साहचर्य हेच जीवन हे ती आपल्याला सांगू पाहत असेल.. 

मुलीला वाढवताना आधी तिच्या मनात तिच्या जीवन ध्येयाची पेरणी करायची आणि मग त्याला अनुकूल असे पुढचे जीवन व जोडीदार तिला निवडू द्यायचा हे ती सांगत असेल..

आईवडिलांनी ज्ञान,सामर्थ्य आणि स्वातंत्र्य दिलं तर त्याचा वापर कसा करायचा,आणि  ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यासाठी मृत्यूशीही भांडायला कचरायचं नाही,आपल्या स्वप्नाचा पाठलाग सोडायचा नाही हे ती सांगू पहात असेल ..

‘योग’ यमाने दिला आहे असं मानतात.सावित्रीनं माणसाला दीर्घायुषी करणारा योग यमाच्या संवादातून आणला असेल..

द्युम्त्सेनाला तिनं योग्य ‘जीवनदृष्टी’ दिली असेल ..

तीव्र इच्छाशक्ती,शुध्द हेतू,परिपूर्ण प्रयत्न केले आणि त्याला ईश्वरी श्रद्धेची जोड दिली तर चमत्कार वाटावे असे परिवर्तन शक्य आहे, हे ती आपल्याला सांगू पाहत असेल..

पुराणकथांना नाकारणे,त्यांची थट्टा करणे,उपहास करणे सोपे आहे.त्यांना प्रतिकात गुंडाळून त्यातली प्रेरणा घुसमटून टाकणे हेही सोपेच आहे.पण नव्या दृष्टीने त्यांच्याकडे पहिले त्याचे कालसुसंगत अर्थ लावले तर या कथा आताच्या समाजाला कितीतरी बळ पुरवतात .

सावित्री केवळ पतीच्या मागे जाणारी त्याचे अनुसरण करणारी ‘प्रति’गामी नाही .पती ज्या जीवनरेषेशी थांबला,जीवनविन्मुख झाला त्या मर्यादेला ओलांडून पुढे जाणारी व त्याला पुन्हा जीवनसन्मुख करणारी,आपल्या जीवनध्येयाच्या मागे यायला लावणारी,नेतृत्व करणारी ‘पुरो’गामिनी आहे !

सावित्रीचे व्रत म्हणजे केवळ उपवास नाही. उपहास तर मुळीच नाही!

सावित्रीच्या उपवासातून मिळवायचे आत्मबल .शिकायचा संयम.वडाच्या पूजनातून घ्यायची चिवट जिजीविषा.

जपायचं निसर्गाशी असलेलं नातं.

धागा तुटू द्यायचा नाही,पर्यावरण आणि समृद्धी यातल्या संतुलनाचा.

सात जन्म ही सोबत संपूच नये असं वाटावं असं साहचर्य,असं माधुर्य सहजीवानात निर्माण करायचं,अर्थात दोघांनी !

दैववादाच्या क्षीण धाग्यात गुंडाळून ठेवलेली सावित्रीची कथा सोडवायची आणि प्रयत्नवादाच्या भक्कम वटवृक्षाच्या रूपात रुजवून घ्यायची!

– समाप्त –

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments