सुश्री सुनीला वैशंपायन 

? इंद्रधनुष्य ?

☆ ऐ वतन, मेरे वतन… भाग-2 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

(“सैनिकाने लढताना नीतिमत्ता विसरता कामा नये” हे वाक्य बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. उदाहरण म्हणून, कारगिल युद्धातली एक सत्य घटना त्यानेे सांगितली.) इथून पुढे —- 

एका चकमकीत, त्याच्या युनिटच्या जवानांनी पाकिस्तानी घुसखोर सैनिकांच्या चौकीला वेढा घातला होता. बराच वेळ धुमश्चक्री सुरु होती. शेवटी, निकराचा हल्ला चढवून भारतीय सैनिकांनी पाकिस्तान्यांचा कडवा प्रतिकार मोडून काढला. चौकीमध्ये पाकिस्तानी सैनिकांची प्रेते इतस्ततः पडलेली होती. भारतीय हद्दीत छुपी घुसखोरी केलेली असल्याने त्या सैनिकांच्या अंगावर युनिफॉर्मऐवजी स्थानिक रहिवाश्यांसारखेच कपडे होते. मात्र, हे आपल्या आयुष्यातले शेवटचेच युद्ध असल्याचे ओळखून, मुलकी कपड्यांमधल्या त्या प्रत्येक सैनिकाने छातीवर आपापली पदके लावलेली होती! एक सच्चा सैनिक म्हणून वीरमरण पत्करण्यासाठी त्यातला प्रत्येकजण सज्ज होता!

चौकीवर विजय मिळवल्यानंतर या भारतीय मेजरने सर्वप्रथम, पाकिस्तानी सैनिकांच्या ओळखपत्रांवरून प्रत्येकाची ओळख पटवली. एका पत्राद्वारे त्या नावांची यादी पाकिस्तानी सेनेकडे पाठवून, त्या सर्व मृत सैनिकांचा यथोचित सन्मान व्हावा अशी इच्छा त्याने व्यक्त केली! 

काही काळानंतर त्याला समजले की त्याच्या विनंतीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून त्या शहीदांचा सन्मान केला गेला होता!   

त्याच युद्धात, बॉम्बचा तुकडा गालफडात घुसल्यामुळे त्याचा चेहरा असा विचित्र, आणि ओबड-धोबड झालेला होता, हेही सहजच बोलल्यासारखे त्याने सांगितले. इतकेच नव्हे तर, त्याच्या मणक्यांमध्ये आणि पायांमध्ये शस्त्रक्रियेद्वारे रॉड बसवलेले होते. म्हणूनच, सोबतच्या महिला सहप्रवाश्यांना तो स्वतःचा खालचा बर्थ देऊ शकला नव्हता हेही त्याने काहीश्या दिलगिरीच्या स्वरातच सांगितले! 

आर्मीच्या डॉक्टरांचे तो तोंड भरून कौतुक करीत होता. “माझे फाटलेले थोबाड छान शिवून मला एक नवीन चेहरा त्यांनीच तर दिला ना!” हे म्हणताना त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नव्हता. त्याउलट, एक मिश्किल भावच मला जाणवला! मी थक्क होऊन त्याच्याकडे पाहत होते. त्याच्या त्या बदललेल्या चेहऱ्याबद्दल घरच्या मंडळींना काय वाटले? असे आम्ही विचारताच तो हसून म्हणाला, “माझी बायको, आणि आमची सहा वर्षांची मुलगी म्हणतात, आता मी पहिल्यापेक्षा जास्त देखणा दिसतो!”

काश्मिरातल्या खेड्या-पाड्यांमधल्या घरात लपून बसलेले अतिरेकी शोधणे आणि त्यांना ठार करणे, हे त्याच्या मते सगळ्यात अवघड काम होते. (त्यावेळी नुकताच मुंबईवर अतिरेकी हल्ला होऊन गेला होता.  सैन्यदलाच्या आणि नौदलाच्या कमांडो सैनिकांनी ‘ताज’ हॉटेलमध्ये आणि इतरत्र केलेली कारवाई माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली). 

“Cordon & Search कारवाई म्हणजे एक जीवघेणा लपंडावाचा खेळ असतो. त्यामध्ये आमच्या सतर्कतेची आणि संयमाची अक्षरशः अग्निपरीक्षाच असते. अशा कारवाया बहुदा रात्रीच्या अंधारातच होतात. संपूर्ण खेड्याला आम्ही वेढा घालतो आणि एकेक घर तपासत जातो. अतिरेकी नेमका कुठे लपला असेल याचा पत्ता लावायचा असतो. त्याला बेसावध गाठून आम्ही ठार करणार, की तोच आधी आमचा वेध घेणार हे मात्र ‘काळ’च ठरवतो!”

मेजर शांतपणे बोलत राहिला, “आम्ही आता पूर्वीपेक्षा अधिक अनुभवी झालो आहोत.  पण, अतिरेकीसुद्धा अधिक शहाणे झाले आहेत. ते आता आमच्या डोक्यावर किंवा छातीवर नेम धरत नाहीत. मांड्यांवर गोळ्या झाडतात. मांडीमधली रक्ताची धमनी फुटलेल्या सैनिकाला तातडीने हॉस्पिटलात न्यावेच लागते. नाही तर अत्यधिक रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्या जवानाला सुखरूपपणे हलवण्यात आमचे मनुष्यबळ आणि वेळ खर्च होतो आणि अतिरेक्यांना नेमके तेच हवे असते.” 

ऐकता-ऐकता आमच्या डोळ्यावरची झोप केंव्हाच उडून गेली होती. मी आणि इतर सहप्रवासी अचंबित होऊन, जणू तो थरार प्रत्यक्ष अनुभवत होतो. 

मी सहज त्याला विचारले, “अतिरेक्यांविरुद्धच्या तुझ्या कामगिरीबद्दल तुला एखादे शौर्यपदक मिळाले असेल ना?”

“नाही, मॅडम.”

मी आश्चर्यानेच विचारले, “का बरं? का नाही मिळालं?”

“मॅडम, मी जे केलं, ते करणाऱ्या प्रत्येकाला जर आर्मीने शौर्यपदक देणं सुरु केलं, तर पदकांचा स्टॉकच संपून जाईल!” तो हसत-हसत म्हणाला. 

त्याच्या या अनपेक्षित उत्तराने आम्ही सगळेच अवाक झालो होतो. आमच्या मते जे अतुलनीय शौर्य होते, ती त्याच्या दृष्टीने जणू एखादी सामान्य घटनाच होती. 

कदाचित, जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांसोबत लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाचे आणि अधिकाऱ्याचे तेच दैनंदिन जीवन असेल! 

निःस्वार्थ सेवा म्हणजे काय, ते मला माझ्या डोळ्यासमोर, मूर्तस्वरूपात दिसत होते, आणि मी ते रूप मनात साठवून घेत होते.  

एका सहप्रवाशाने अचानकच विचारले, “कुठून येते ही एवढी प्रेरणा तुम्हा लोकांमध्ये?”

“या देशावर, देशवासीयांवर असलेले प्रेम, आणि मी एक भारतीय असल्याचा सार्थ अभिमान. आणखी काय?”

अगदी सहजपणे त्याने उच्चारलेले ते वाक्य ऐकून माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. मला माझे लहानपण आठवले. त्या काळी, सिनेमा संपल्यावर राष्ट्रगीत वाजत असे. आम्ही सगळे उठून उभे राहायचो. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे निव्वळ मौजमजा करण्याचे, सुट्टीचे दिवस नव्हते. आम्ही सकाळी आनंदाने घराबाहेर पडायचो, आणि अभिमानाने ध्वजवंदन करायचो. “जय जवान, जय किसान” हे वाक्य उच्चारत, मातृभूमीच्या त्या दोन सच्च्या सेवकांना मनापासून अभिवादन करायचो. 

आजदेखील जवानांची आणि किसानांची आपल्या देशाला पूर्वीइतकीच नितांत गरज आहे. मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या मनात, खोल कुठेतरी, त्यांच्याबद्दलचा आदर आणि अभिमान दडलेलाही आहे. मात्र, तो मनातच न ठेवता, बाहेर काढून, झाडून, झटकून, छातीवर मिरवायची आज गरज आहे. आपल्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासोबत त्याची जाणीव आपल्याला होत राहिली तरच आपल्या वागण्या-बोलण्यातही तो आदर दिसत राहील. 

“… मी एक भारतीय असल्याचा सार्थ अभिमान. आणखी काय?” —- “जय हिंद”

– समाप्त –

मूळ इंग्रजी अनुभव लेखिका : सौ. स्मिता (भटनागर) सहाय. [भारतीय नौदलातील कॅप्टन सहाय यांच्या पत्नी]

मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट [सेवानिवृत्त]— ९४२२८७०२९४ (#केल्याने भाषाटन) 

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments