डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २७ (अग्निसूक्त) : ऋचा १ ते १२ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २७ – ऋचा १ ते १२
ऋषी – सुनःशेप आजीगर्ति : देवता – १ ते १२ अग्नि; १३ देवगण
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील सत्ताविसाव्या सूक्तात शुनःशेप आजीगर्ती या ऋषींनी अग्नी देवतेबरोबरच इतरही देवतांना आवाहन केलेले असल्याने हे अग्नि व अनेक देवतासूक्त म्हणून ज्ञात आहे. आज मी आपल्यासाठी हे संपूर्ण सूक्त आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
मराठी भावानुवाद ::
☆
अश्वं॒ न त्वा॒ वार॑वन्तं व॒न्दध्या॑ अ॒ग्निं नमो॑भिः । स॒म्राज॑न्तमध्व॒राणा॑म् ॥ १ ॥
जिराहधारी वारू तव चरणी नतमस्तक
आम्ही तुमच्या पायांवरती ठेवितो मस्तक
वंदन करुनी अनेकदा करितो तव बहुमान
यज्ञे यज्ञे तुम्ही असता सदैव विराजमान ||१||
☆
स घा॑ नः सू॒नुः शव॑सा पृ॒थुप्र॑गामा सु॒शेवः॑ । मी॒ढ्वाँ अ॒स्माकं॑ बभूयात् ॥ २ ॥
योगाच्या सामर्थ्याने हा युक्त दिव्य दाता
एक समयी सर्वव्यापी हा सकलांचा त्राता
सौख्याचा वर्षाव करी तो समस्त भक्तांवरी
कृपा करुनिया आम्हावरती सदैव धन्य करी ||२||
☆
स नो॑ दू॒राच्चा॒साच्च॒ नि मर्त्या॑दघा॒योः । पा॒हि सद॒मित्वि॒श्वायुः॑ ॥ ३ ॥
सर्व सृष्टीचा आत्मा तू तर सकलांचे जीवन
सन्निध अथवा दूर असो आम्ही तुमचे दीन
अवनीवरती कितीक जगती करुनी पापाचरण
त्यांच्या पासून तुम्ही करावे अमुचे संरक्षण ||३||
☆
इ॒ममू॒ षु त्वम॒स्माकं॑ स॒निं गा॑य॒त्रं नव्यां॑सम् । अग्ने॑ दे॒वेषु॒ प्र वो॑चः ॥ ४ ॥
आर्त होउनीया श्रद्धेने किति स्तोत्रे रचिली
अर्पण करण्या देवांना भक्तीभावे गाईली
श्रवण अग्निदेवा करता तव मनास भावली
देव समुदायामध्ये तू स्तुती त्यांची केली||४||
☆
आ नो॑ भज पर॒मेष्वा वाजे॑षु मध्य॒मेषु॑ । शिक्षा॒ वस्वो॒ अन्त॑मस्य ॥ ५ ॥
प्राप्त कराया उत्तम मध्यम कसलेही सामर्थ्य
सन्निध अमुच्या सदा असावे मनात आम्ही आर्त
परम कोटीच्या संपत्तीला कसे करावे प्राप्त
कॢप्ती शिकवा आम्हा अग्ने होउनी अमुचे आप्त ||५||
☆
वि॒भ॒क्तासि॑ चित्रभानो॒ सिन्धो॑रू॒र्मा उ॑पा॒क आ । स॒द्यः दा॒शुषे॑ क्षरसि ॥ ६ ॥
अलौकीक कांती तेजोमय देदीप्यमान
दान करावे संपत्तीचे हा तुमचा मान
कृपा प्रसादाचा तू असशी थोर महासागर
प्रसाद लहरी सन्निध त्याला संपत्तीचा पूर ||६||
☆
यम॑ग्ने पृ॒त्सु मर्त्य॒मवा॒ वाजे॑षु॒ यं जु॒नाः । स यन्ता॒ शश्व॑ती॒रिषः॑ ॥ ७ ॥
तुझे लाभले रक्षण ज्याला युद्धात घोर
तुझ्या प्रेरणे निखरून येते ज्याचे शौर्य थोर
संपत्तीवर राज्यावरती त्याची सत्ता अचल
तुझ्या कृपेने त्यासी नाही बंधन दिक्काल ||७||
☆
नकि॑रस्य सहन्त्य पर्ये॒ता कय॑स्य चित् । वाजो॑ अस्ति श्र॒वाय्यः॑ ॥ ८ ॥
तुझ्या कृपेचा भाग्यवंत जो काय तयासी विघ्न
बलशाली हे देवा तव सामर्थ्य तया संलग्न
कीर्तिमंत तो होई विश्वे कृपा तुझी लाभता
दुजी वांच्छना मनात नुरते अशा भाग्यवंता ||८||
☆
स वाजं॑ वि॒श्वच॑र्षणि॒रर्व॑द्भिरस्तु॒ तरु॑ता । विप्रे॑भिरस्तु॒ सनि॑ता ॥ ९ ॥
विद्वानांसह संपत्तीचा लाभ आम्हा होवो
अमुच्या अश्वांसवे अम्हाला पराक्रमी यश देवो
अतीघोर असलेल्या कार्यी विजयश्री लाभो
देवा तव संचार त्रिस्थळी कृपा तुमची लाभो ||९||
☆
जरा॑बोध॒ तद्वि॑विड्ढि वि॒शेवि॑शे य॒ज्ञिया॑य । स्तोमं॑ रु॒द्राय॒ दृशी॑कम् ॥ १० ॥
स्तवनांनी जागृत होशी हे स्तोत्रप्रिय देवा
यागाकर्मा कसे करावे मार्ग आम्हा दावा
प्रसन्न करण्या रुद्रासीया स्तोत्राला शिकवा
मनुष्य जाती वरती तुमचा वरदहस्त ठेवा ||१०||
☆
स नो॑ म॒हाँ अ॑निमा॒नो धू॒मके॑तुः पुरुश्च॒न्द्रः । धि॒ये वाजा॑य हिन्वतु ॥ ११ ॥
धूम्र चिन्ह केतनावरती कीर्ती दिगंत
गुणास नाही गणना काही थोर गार्ह्यपत्य
बुद्धिशालि करी आम्हा देवा देई सामर्थ्य
आर्जव अमुचे तुमच्या ठायी गाउनिया स्तोत्र ||११||
☆
स रे॒वाँ इ॑व वि॒श्पति॒र्दैव्यः॑ के॒तुः शृ॑णोतु नः । उ॒क्थैर॒ग्निर्बृ॒हद्भा॑नुः ॥ १२ ॥
वैभवशाली हे सम्राटा आवसथ्य देवा
मोहित होऊनिया स्तुतींनी आम्हाला पावा
तेजे प्रखर सौंदर्याने दिव्य नटलेला
ऐका हो प्रार्थना आमुची देई प्रसादाला ||१२||
☆
नमो॑ म॒हद्भ्यो॒ नमो॑ अर्भ॒केभ्यो॒ नमो॒ युव॑भ्यो॒ नम॑ आशि॒नेभ्यः॑ ।
यजा॑म दे॒वान्यदि॑ श॒क्नवा॑म॒ मा ज्याय॑सः॒ शंस॒मा वृ॑क्षि देवाः ॥ १३ ॥
नमः महत्ऽभ्यः नमः अर्भकेभ्यः नमः युवभ्यः नमः आशिनेभ्यः ।
वंदन करितो मी श्रेष्ठांना आणि सानांना
नमस्कार तरुणांना आणिक वंदनीय वृद्धांना
आपण सारे याग मांडुया देवांच्या सन्माना
स्तुती विसरण्याचा देवांची प्रमाद व्हावा ना ||१३||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
Attachments area
Preview YouTube video Rugved Mandal 1, Sukta 27
अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈