श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

इस्रोची तिसरी चंद्रमोहीम – चंद्रयान ३ ☆ श्री राजीव गजानन पुजारी

ISRO ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे आणि त्याचे बेंगळुरू (कर्नाटक) या शहरात मुख्यालय आहे. १५ ऑगस्ट १९६९ रोजी स्थापना झालेल्या ISRO ने पूर्वीच्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) या संस्थेची जागा घेतली. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची कार्ये देशभरातील विविध केंद्रांमधून संचलीत होत असतात.

प्रत्येक मिशनला लागणाऱ्या संवेदकांचा विकास हा स्पेस एप्लीकेशन सेंटर अहमदाबाद येथे होत असतो तर  सॅटेलाईटची रचना, विकास, जुळणी आणि चाचण्या बंगलोर  येथील यु.आर. राव  उपग्रह केंद्रात केल्या जातात. प्रक्षेपकांचा विकास हा  विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, तिरुअनंतपुरम् येथे केला जातो तसेच उपग्रहांचे प्रक्षेपण  श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रातून केले जाते. बरीचशी महत्त्वाची प्रशासकीय कामे  व विदा व्यवस्थापनेची कामे  हसन, भोपाळ आणि हैदराबाद येथून केली जातात.

इस्रोने आजपर्यंत बऱ्याच अंतराळ यंत्रणा विकसीत केल्या असून, सर्वात महत्त्वाच्या INSAT प्रणालीचा (भारतीय राष्ट्रीय उपग्रह यंत्रणा) उपयोग मुख्यतः दूरसंचार, दूरदर्शन  प्रसारण, हवामानशास्त्र व नैसर्गिक आपत्ती बाबत पूर्व सूचना देण्यासाठी होतो.

  • 19 एप्रिल 1975 रोजी भारताने सोवियत संघाच्या सहकार्य ने आपला‘आर्यभट्ट’ नावाचा पहिला उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला.
  • 1980 साली पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या तंत्रज्ञानावर आधारितSLV-3 प्रक्षेपकाद्वारे‘रोहिणी’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. 
  • 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वीरित्या पार पडली
  • ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात आणि खूप कमी खर्चात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.
  • २२जुलै २०१९ रोजी इस्रोने चंद्रयान-२ द्वारे चंद्राच्या उत्तर ध्रुवाजवळ अवतरणाचा प्रयत्न केला, पण कांही तांत्रिक अडचणींमुळे तो यशस्वी होऊ शकला नाही.—

— आता याच मोहिमेची अनुसरण मोहीम म्हणून इस्रोने चंद्रयान-३ मोहिमेचे नियोजन केले आहे. सर्वकाही व्यवस्थित पार पडले तर जुलै २०२३ च्या दुसऱ्या आठवड्यात LVM-3 या प्रक्षेपकाद्वारा सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरीकोटा येथून चंद्रयान-३ चे प्रक्षेपण केले जाईल. ऑगस्ट २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात यान चंद्राच्या उत्तर ध्रुवानजीक उतरेल.

चंद्रयान-३ मध्ये स्वदेशी लँडर मॉड्युल (LM), प्रॉपल्शन मॉड्युल (PM) आणि रोव्हर यांचा समावेश आहे. प्रॉपल्शन मॉड्युलचे मुख्य काम म्हणजे लँडर मॉड्युलला अगदी प्रक्षेपकापासून विलग झाल्यापासून ते चंद्राभोवतीच्या १०० कि. मी. वर्तुळाकार ध्रुवीय कक्षेपर्यंत नेणे हे आहे. त्यानंतर प्रॉपल्शन मॉड्युल लँडर मॉड्युलला स्वतःपासून विलग करेल. नंतर लँडर मॉड्युल थ्रस्टर्सच्या सहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. त्यानंतर रोव्हर लँडर मॉड्युलपासून विलग होऊन १४ पृथ्वी दिवसांपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर विहार करून महत्वाची वैज्ञानिक माहिती गोळा करून ती पृथ्वीकडे पाठवेल. प्रॉपल्शन मॉड्युलमध्ये मूल्यवर्धनासाठी चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या वर्णक्रमीय(spectral) आणि ध्रुवमितीय (polarimeyric) मोजमापांचा अभ्यास करण्यासाठी स्पेक्ट्रो-पोलारिमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ (SHAPE) हा वैज्ञानिक अभिभार आहे, जो लँडर मॉड्युल विलग झाल्यावर कार्यान्वित केला जाईल. या मोहिमेचा उद्देश अंतर्ग्रहीय मोहिमांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान विकसित करणे व त्याचे प्रात्यक्षिक करणे हे आहे. लँडरमध्ये चंद्राच्या विशिष्ठ जागेवर हळुवार उतरण्याची (soft landing) व रोव्हरला चंद्रभूमीवर तैनात करण्याची क्षमता आहे. त्यानंतर रोव्हर त्याच्या वाटचालीदरम्यान चंद्राच्या पृष्ठभागाचे जागेवरच रासायनिक विश्लेषण करेल. 

लँडर व रोव्हरवर चंद्राच्या पृष्ठभागावर प्रयोग करण्यासाठी वैज्ञानिक अभिभार आहेत. ते पुढील प्रमाणे :

अ) लँडर वरील अभिभार –

१) चंद्राज सरफेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट (ChaSTE)- हा अभिभार औष्मिक प्रवाहकता (thermal coductivity) व तापमान यांची मोजणी करेल.

२) इन्स्ट्रुमेंट फॉर ल्यूनार सेईस्मिक ऍक्टिविटी (ILSA)- हा अभिभार अवतरणाच्या जागेभोवतालची भूकंपशिलता (seismicity) मोजेल.

३)लँगमुईर प्रोब (LP)- हा प्लाविकाची (plasma) घनता व त्याच्यातील फेरफार यांचा अंदाज लावेल.

४)नासाकडून प्राप्त पॅसीव लेसर रेट्रोरिफ्लेक्टर ऍरे – हा अभिभार चंद्राचे लेसर श्रेणीय अध्ययन करेल.

ब ) रोव्हर वरील अभिभार – रोव्हर उतरलेल्या जागेची मुलद्रैविक संरचना प्राप्त करण्यासाठी रोव्हरवर अल्फा पार्टिकल एक्स रे स्पेक्ट्रोमीटर (APXS) आणि लेसर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रॉस्कोप हे दोन अभिभार आहेत.

चंद्रयान ३ मोहिमेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत :

१)चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि हळुवार उतरण्याचे प्रात्यक्षिक करणे.

२)चंद्रावर रोव्हरच्या वाटचालीचे प्रात्यक्षिक करणे.

३)चंद्राच्या पृष्ठभागावर वैज्ञानिक प्रयोग करणे.

ही उद्दिष्टे गाठण्यासाठी लँडरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. जसे की… 

१)उर्ध्वतामापक (Altimeters)- लँडरवर लेसर व रेडिओवारंवारीता आधारीत उर्ध्वतामापक आहेत.

२)वेगमापक (velicitymeters)- लँडरवर लेसर डॉप्लर वेगमापक व लँडर क्षैतिज (horizontal) वेग छायाचित्रक (camera) आहेत.

३)जडत्व मापन (inertial measurement)- लँडरवर एकात्मिक लेसर घुर्णदर्शी आधारित (gyrobased) जडत्व संदर्भयन् आणि प्रवेगमापक (accelerometer) आहेत.

४)प्रणोदन प्रणाली (propulsion system)- लँडरवर ८०० N थ्रोटलेबल द्रव इंजिन, ५८ N ऍटीट्युड थ्रूस्टर्स आणि थ्रोटलेबल इंजिन कंट्रोल इलेक्ट्रॉनिक्स आहेत.

५)दिक् चलन, मार्गदर्शन व नियंत्रण (navigation, guidance and control)- लँडरवर समर्थित अवतरण विक्षेपमार्ग (powered descent trajectory) आराखडा आणि संबंधित सॉफ्टवेअर घटक आहेत.

६)धोका शोधणे आणि टाळणे (Hazard detection and avoidance)- लँडरवर धोका शोधक आणि वर्जक छायाचित्रक आणि प्रक्रिया अज्ञावली (processing algorithm) आहेत.

७)अवतरण पाद यंत्रणा (Landing leg mechanism) यामुळे हळुवार अवतरणाला मदत होते.

पृथ्वीच्या परिस्थितीत वर सांगितलेल्या प्रगत तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करण्यासाठी लँडरच्या अनेक विशेष चाचण्या नियोजित करून यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. त्या म्हणजे …. 

१)एकात्मिक थंड परीक्षण (Integrated cold test)- एकात्मिक संवेदक आणि दिक् चलन कार्यक्षमता परीक्षणासाठी परीक्षण मंच म्हणून हेलिकॉप्टर वापरून ही चाचणी केली गेली.

२)एकात्मिक उष्ण परीक्षण (Integrated hot test)- संवेदक(sensors), प्रवर्तक (actuators) व NGC (navigation, guidance and control) यांसह बंद वळसा कार्यक्षमतेच्या परीक्षणासाठी (closed loop performance test) परीक्षण मंच म्हणून टॉवर क्रेनचा वापर करून ही चाचणी केली गेली.

३)अवतरण पाद यंत्रणा परीक्षण (landing leg mechanism test)- चंद्र सदृष्य पृष्ठभाग तयार करून विविध अवतरण परिस्थितीत ही परीक्षणे केली गेली.

चंद्रयानाचे वजन पुढीलप्रमाणे असणार आहे:…. 

१)प्रणोदन कक्ष (propulsion module)-२१४८ कि.ग्रॅ.

२)अवतरण कक्ष (lander module)-१७२६ कि.ग्रॅ.

३) बग्गी (rover)- २६ कि.ग्रॅ.

    लँडर व रोव्हरचे अपेक्षित आयुष्य १४ पृथ्वी दिवस असणार आहे.

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments