श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ छत्रपती शिवाजी महाराज — एक उत्तम “व्यवस्थापन गुरू” ☆ श्री राजीव गजानन पुजारी

“छत्रपती शिवाजी महाराज” हे नुसतं नाव जरी वाचलं तरी प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. ते फक्त जाणते राजे नव्हते तर, मराठी माणसासाठी ते दैवत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक शासक नव्हते तर तर ते उत्तम ‘ मॅनेजमेंट गुरु ‘ देखील होते. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य अद्वितीय होते. त्यांना प्रचंड दूरदृष्टी होती आणि त्या काळात त्यांनी दूरदृष्टीने भविष्याचा विचार करून विविध योजना आखल्या. त्यांनी दिलेल्या व्यवस्थापन तंत्रातील मुद्दे खालील प्रमाणे आहेत :

१)कुशल कार्यबळ तयार करणे 

चांगले काम करणारे आणि कामासाठी कायम उत्सुक असणारे कर्मचारी तयार करणे हे कुठल्याही टीम लीडरसाठी एक कसब असते. त्याला स्वतःच्या कामातून स्वतःच्या सहकाऱ्यांसाठी आदर्श घालून द्यावा लागतो. शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांमध्ये स्वराज्य स्थापनेची तीव्र इच्छा निर्माण केली. त्यांच्या मनात मातृभूमीविषयी आदर आणि प्रेम जागृत केले.

२) पायाभूत सुविधा उभारणे

कुठलाही उद्योग उभा करताना मूलभूत सुविधा असणे अत्यंत आवश्यक असते. महाराजांनी त्या काळी सुद्धा पायाभूत सुविधा उभारण्याला खूप महत्व दिले.— स्वराज्यात अनेक ठिकाणी नद्या व कालवे अडवून धरणे बांधली, वाहतुकीसाठी घाटरस्ते बांधले, शेतीसाठी जमिनीचे सपाटीकरण करवले, शेतीमधून रोजगारनिर्मिती केली.

३) अर्थव्यवस्थापन

कुठल्याही व्यवसायासाठी आर्थिक भांडवल अतिशय आवश्यक असते. महाराजांनी त्यांच्या काळात उत्तम आर्थिक व्यवस्थापन करत मोठमोठ्या मोहीम यशस्वी केल्या. एखाद्या मोहिमेतून आर्थिक फायदा झाला की ते लगेच गुंतवणूक करत असत. नवीन किल्ला बांधणे व तिथल्या आसपासच्या परिसराचा विकास करणे, मुलुखाचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून तिथे पायाभूत सुविधा उभारणे, शेतीला उत्तेजन देणे तसेच इतर पूरक व्यवसायांना चालना देणे ह्यात ते गुंतवणूक करत असत. आपल्या स्वराज्यातील मुलुख विकसित झाला की स्वराज्याच्या महसुलात आपसूकच वाढ होणार आहे हे सूत्र त्यांना माहिती होते, आणि म्हणून ते योग्य ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करत असत.

४) सतत नव्या गोष्टी शिकण्याची तयारी

कुठल्याही माणसाला जर प्रगती करायची असेल तर त्याने सतत जगाबरोबर चालणे आवश्यक असते. त्यामुळे सतत नवे काहीतरी शिकण्याची इच्छा असणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे ह्यामुळे माणूस प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकतो. शिवाजी महाराज सुद्धा सतत नव्या युद्धनीतींबद्दल जाणून घेत असत आणि त्या अमलात आणण्याचा प्रयत्न करत असत. ते वेळोवेळी विविध प्रकारच्या शस्त्रांबद्दल जाणून घेत असत आणि त्यांच्या सैनिकांकडे चांगली व योग्य शस्त्रे असावीत ह्यावर त्यांचा कटाक्ष होता.

५)दूरदृष्टी

जवळजवळ संपूर्ण भारत मुघल आणि इतर मुस्लिम राज्यकर्त्यांच्या तावडीत सापडलेला असताना महाराजांनी भविष्याचा विचार करून स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि अखंड कष्ट करून ते स्वप्न पूर्ण केले. स्वतंत्र भारताचे स्वप्न बघून ते स्वप्न त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात देखील रुजवले. तसेच त्यांच्या शासनकाळात मोक्याच्या ठिकाणी गड किल्ले बांधणे, परकीय शत्रूवर बारीक नजर ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग ह्यासारखे गड बांधणे, आरमार उभारणे, परकीय लोकांशी डोळ्यात तेल घालून चर्चा आणि व्यवहार करणे ह्यासारखी दूरदृष्टी त्यांच्याकडे होती.

६) जल व्यवस्थापन

स्वराज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्यात पाण्याचा साठा असणे महत्वाचे होते. त्यामुळे पाण्याचे संधारण आणि साठा साधारण वर्षभर पुरेल अशी उपाययोजना महाराजांनी केली होती… म्हणजे चुकून गडावर हल्ला झाला तरी आणीबाणीच्या परिस्थितीतसुद्धा गडावर आवश्यक तेवढा पाणीसाठा कसा राहील ह्याची काळजी घेतली गेली होती.

७) पर्यावरण व्यवस्थापन

पर्यावरण आणि माणूस ह्यांचे परस्परांशी असलेले नाते आणि अवलंबित्व महाराजांनी ओळखले होते आणि म्हणूनच स्वराज्यातील पर्यावरणाचा ऱ्हास त्यांनी होऊ दिला नाही. त्यांच्या मुलुखात असलेल्या वनराईची कायम काळजी घेतली गेली. तसेच गडकोटांच्या परिसरात वड, शिसव, बाभूळ, नारळ, आंबा ह्या वृक्षांची लागवड केली होती. आरमार बांधण्यासाठी साग आणि शिसवीचा वापर केला जात असे.

८) रायगड एक सुनियोजित गांव 

रायगड ही नुसतीच स्वराज्याची राजधानी नव्हती. तर ते त्या काळात योजनाबद्ध रीतीने बांधण्यात आलेले सुनियोजित गांव होते. तसेच त्या ठिकाणचा बाजार म्हणजेच मार्केट देखील खूप मोठे होते व योग्य नियोजन करून बांधण्यात आले होते.

९)प्रशासकीय कौशल्ये

महाराजांच्या शासनकाळात करवसुली होत असे आणि कर गोळा करण्यासाठी त्यांनी माणसे नियुक्त केली होती. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात कर्ज मिळत असे. त्यांच्या दरबारात अष्टप्रधान मंडळ असे, जे राज्यकारभार चालवत असे. शिवाय त्यांच्या दरबारात परराष्ट्र धोरण सांभाळण्यासाठी ‘ डबीर ‘ हे स्वतंत्र मंत्रिपद होते. तसेच त्यांचे स्वतःचे सक्षम गुप्तहेर खाते होते. ह्यातून महाराजांच्या प्रशासकीय व्यवस्थापनाची झलक बघायला मिळते.

१०) लोकशाही

महाराजांच्या काळात हुकूमशाहीची चलती होती. लोकशाहीचा विचार देखील कुणाच्या डोक्यात आला नव्हता. पण महाराजांनी त्यांचे सरकार जनतेच्या कल्याणासाठी चालवले. त्यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली.

११)आरमार

शिवाजी महाराज हे पहिले भारतीय राजे होते ज्यांनी नौदल किंवा आरमार उभारले. त्यांच्याकडे ३०० शिपयार्ड (जहाजे बांधणे व दुरुस्त करणे यासाठी असलेला कारखाना), अनेक जलदुर्ग, शेकडो लढाऊ नौका (गलबत) होत्या. जवळजवळ ३०० मैल सागरकिनाऱ्यावर त्यांचे बारीक लक्ष होते. म्हणूनच महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असे म्हटले जाते.

१२)गनिमी कावा

शत्रू जर आपल्यापेक्षा बलाढ्य असेल तर त्याला हरवण्यासाठी महाराजांनी गनिमी कावा शोधून काढला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही उक्ती त्यांनी वारंवार खरी करून दाखवली आणि बेसावध शत्रूला गनिमी काव्याने वारंवार धूळ चाटवली. त्यांच्या ह्या गनिमी काव्याचा ‘ युद्धनीती ‘ म्हणून आजही जगभरातील सैन्यांद्वारे अभ्यास केला जातो.

१३) बदलीचे धोरण

महाराजांच्या शासनकाळात किल्लेदार किंवा हवालदार ह्यांची दर तीन वर्षांनी, सरनौबत ह्यांची चार

वर्षांनी, कारखानीस ह्यांची पाच वर्षांनी, तसेच सबनीस ह्यांची चार वर्षांनी बदली होत असे. ह्यामुळे भ्रष्टाचार आणि इतर गैर कृत्यांना आळा बसत असे. तसेच देशमुख, पाटील , देशपांडे, कुलकर्णी, चौघुले ह्यांना जवळच्या किल्ल्यावर न ठेवता लांबच्या गावची वतनदारी दिली जात असे. हा सुद्धा त्यांच्या मॅनेजमेंटचाच एक भाग आहे.

१४) कामाचा मोबदला देण्याची पद्धत

मॅनेजमेंटमध्ये कामाचा मोबदला ही खूप महत्वाची गोष्ट आहे. महाराजांची कामाचा मोबदला देण्याची पद्धत सुद्धा विशिष्ट होती. सेवकांची वेतने ठरवल्याप्रमाणे होत असत. पण एखाद्याने बक्षीस मिळवण्यालायक काही महत्त्वाचे किंवा चांगले काम केले तर त्याला वेतनवाढ  दिली न जाता, काही रक्कम बक्षीस म्हणून दिली जात असे.

१५) स्वच्छता व्यवस्थापन

महाराजांनी किल्ले बांधताना त्या काळात शौचकुपांची व्यवस्था केली होती. त्या काळी बांधलेली ड्रेनेज सिस्टीम बघून आश्चर्य वाटते. पहाऱ्यावर असणाऱ्या सैनिकांना नैसर्गिक विधींसाठी लांब जायला लागू

नये ,त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी चोख व्यवथा करून घेतली होती.

— वरील सर्व बाबींकडे बघून असे वाटते की महाराजांनी दिलेल्या व्यवस्थापन तंत्राचे जर आपण काटेकोरपणे पालन केले तर नक्कीच आपला देश सुजलाम् सुफलाम् होईल.

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments