इंद्रधनुष्य
☆ “ऋग्वेदाच्या काठाकाठाने चालताना…” – लेखिका – सुश्री केतकी कानिटकर ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆
“वैदिक जीवन”
गायत्री मंत्र हा ऋग्वेदाचा साक्षात आत्मा अथवा कणा असल्याने तो आत्मसाक्षात्कार, आत्मशोध, स्व अनुभूती यांना परमेश्वराहूनही अधिक प्राधान्य देतो. डोळे उघडून प्रश्न विचारण्यास बाध्य करतो. यमनियमात बांधत नाही तर विचार करण्यास मुक्त करतो. हा निव्वळ धर्म नाही तर एक संयुक्तिक जीवनपद्धती व योग्यायोग्यतेची अचूक कारणमीमांसा आहे. स्वतःला जाणण्याकडे त्याचा कल अधिक आहे. सखोल अशा आत्मचिंतनावर ऋग्वेदाचा अधिक भर आहे. बाह्य जगताचा अभ्यास हा दुय्यम आहे. वैदिक शास्त्रांमध्ये; मग ते गणित असो वा विज्ञान, आतून बाहेर असा तत्त्वज्ञानाचाही प्रवास झाला आहे व अभ्यासाला उपासनेचे महत्त्व आले आहे. या अर्थाने ऋग्वेद हा तेजस्वी कर्मयोगी आहे. “आत्मा हा सचेतन जीवित तत्व आहे. तो शरीर धारण करतो व कालांतराने शरीर सोडून निघून जातो”, ही संकल्पना मूलतः ऋग्वेदाची आहे. ‘दशयंत्र’ या सूक्तात ‘यंत्र’ हा शब्दप्रयोग ‘इंद्रिय’ या अर्थाने केला आहे. पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये अशी दहा इंद्रिये म्हणजे ‘दशयंत्र’ होय.
ऋग्वेद हा जगातील सर्वप्राचीन ग्रंथराज इतक्या विस्तृत काळात लिहिला गेला की सुक्तांची भाषा, संस्कृतिक व धार्मिक परिस्थिती, वैदिक जीवन ते आताच्या हिंदू धर्मापर्यंतचा प्रवास यातून मानवी समाजाच्या उत्क्रांतीच्या पायऱ्या अधिकाधिक सुस्पष्ट होत जातात. अत्यंत कृतज्ञतेने प्रेरित होऊन झालेला सश्रद्ध प्रवास प्रश्न व शंकांवर येऊन थांबतो; ते अस्य वामीय तत्त्वज्ञान सूक्त, ऋग्वेदाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आत्मीयतेने स्वीकारलं जातं. नेम भार्गव ऋषी सुरवातीला सर्वेसर्वा असणाऱ्या इंद्राच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह करतात. ते म्हणतात, “असाक्षात्कारी अशा इंद्राची आम्ही का म्हणून स्तुती करावी? कोण हा इन्द्र, कशावरून तो सत्य आहे?” यावर सखोलपणे विचार होऊ लागला आणि आपण बघतो की वेदकालातच इंद्र ही देवता संपुष्टात आली. “हे असंच का आहे व हे सारं कुणी निर्माण केलं?” यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरं एकटी इंद्र ही देवता होऊ शकत नाही, हे लक्षात आलं. मग “इंद्राला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ तरी का करावा, यज्ञ करण्यामध्ये काही अर्थ आहे का नाही? ” अशीही शंका उत्पन्न होऊ लागली. ‘कण्व’ हे ऋग्वेदात गुप्त अग्नीचे प्रतीक मानले जातात. वास्तविक यज्ञयाग हा ऋग्वेदाचा गाभा..! ईशपूजा, एकत्रीकरण व दान ही समाजाभिमुख जगण्याची कला म्हणजे यज्ञ. त्या काळाची धार्मिक व सामाजिक संस्था म्हणजेच यज्ञसंस्था. यज्ञसंस्थेचा परिघ असा विस्तारला असल्याकारणाने ती काळानुसार टिकली. कालांतराने विचारात किती बदल होतात आणि वैदिक संस्कृती किती वैचारिक स्वातंत्र्य व समृद्धी प्रदान करू शकते याचे हे कळस उदाहरण आहे.
जेव्हा सगुणत्व सुटत नाही, तेव्हा “सृष्टीची उत्पत्ती परमेश्वराने केली की इतर कारणांमुळे ती झाली असावी, ” असा संशय व्यक्त झाला आहे. “अनेकत्व सर्व मिथ्या आहे विविध देवता या निव्वळ कल्पना असून एकाच उत्पादकतत्वाच्या विकृती आहेत.” ही काहीशी निरिश्वरवादाकडे व नास्तिकवादाकडे झुकणारी वृत्ती अस्य वामीय तत्त्वज्ञान सूक्तात प्रकट केली आहे. (कदाचित म्हणूनच जैन धर्म हा नास्तिकवादावर आधारित असून सुद्धा त्यात उच्च कोटीची भूतदया व विश्वाप्रती संवेदनशीलता आपल्याला दिसते.) त्यातून निर्माण झालेली नासदीय सूक्तासारखी विचारांना चालना देणारी सुंदर अशी अभिव्यक्ती. आपल्यालाही उमगत जातं की, “मी कोण? माझ्या असण्याचा उद्देश काय?” इथपासून ते “हे विश्व कुणी निर्माण केलं?” मग ईश्वर म्हणा, वा निसर्गातील एकतत्व; या संकल्पनेला एका निर्गुण निराकार अशा तत्त्वात आकारणं, हा सारा आपल्या व्यक्तिगत व सामाजिक विकासाचा टप्पा बनत जातो. आपली आकलनकक्षा विस्तारत जाते, तसतसा आपल्याबरोबर आपला धर्म देखील विस्तारत जातो. प्रत्येक आत्म्याचे स्वतःचे असे संचित असते त्याप्रमाणे प्रत्येक आत्म्याचा ध्येय व मुक्तीपर्यंत पोहोचण्याचा मार्गही निराळा असतोच.
(एकप्रकारे हा व्यक्तित्ववादाचा पायंडा आहे.) साहजिकपणे कुणाबद्दल कुठलेही सरधोपट विधान करणे हे मूलतः चुकीचे आहे, याचा विचार या प्राचीन ग्रंथांतही केला आहे. प्रत्येकाचा स्वधर्म हा त्याच्या स्थान व परिस्थितीप्रमाणे बदलत जातो. तो कुठल्याही चौकटीत बांधता येत नाही, हे आपल्याला टप्प्याटप्प्याने उमगत जातं. सुरुवातीला आपण धर्मावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत गेलो असलो तरी नंतर मात्र तोच आपल्याला चिंतनास प्रवृत्त करत जातो. आपल्यातील स्वतंत्र गुणवैशिष्ट्यांचा तो आदर करतो. आणि कदाचित म्हणूनच भारतीय संस्कृतीचे मूलाधार असलेले ग्रंथ, वेद हे अपौरुषेय मानले आहेत. ईश्वर हा वेदांचा प्रवक्ता आहे, कर्ता नव्हे. वेदांचे प्रामाण्य हे सामाजिक संमतीने स्थिरावत गेले आहे. वेद हे एका सिद्ध जीवन पद्धतीचे प्रतिबिंब बनत गेले व लोकमान्य परंपरा म्हणून स्थिरावले. वैदिक धर्म अद्वैतापासून ते नास्तिकवादापर्यंत प्रत्येकाच्या स्वभावधर्माप्रमाणे आपल्यात सहजतेने सामावून घेतो. आपल्या आकलनाच्या कित्येक पुढे जाऊन तो आपल्याला असीम ज्ञान, उद्देश्य व सकारात्मकता प्रदान करत जातो. आपल्या चार पावलं पुढे राहून आपल्याला मार्गदर्शन करत आपल्याबरोबर उत्तरोत्तर प्रवास व प्रगती करत जाणं हे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे आणि म्हणूनच तो कालासमवेत टिकणारा आहे. Change is the only permanence.. हे आपल्या कित्येक आधी ह्याला ठाऊक आहे. आनंदाची, सुख समाधानाची व्याख्या व्यापक करणारा आहे. मला नाही वाटत की जगातील इतर कुठलाही धर्म स्वतःवर, धर्माचा जो आधारभूत त्या ईश्वरावर, यम नियम, त्यातल्या परंपरांवर, त्यावरील विश्वासावर, वर्षानुवर्षे निरीक्षणाने, लोकमताने सिद्ध झालेल्या विश्लेषणांवर, त्यावरच्या न दिसणाऱ्या श्रद्धांवर इतके प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य देत असेल. याचा अर्थ सरळ आहे. प्रत्येकाला मुळातून विचार करण्यास बाध्य करावे असे या धर्माला वाटत असेल. मानवाने ईश्वराला शोधून काढून त्याच्यावर सर्वतोपरी आपला भार टाकण्यापेक्षा त्याने आत्मशोध घेणे महत्त्वाचे वाटत असेल. स्वतःत रमणाऱ्या, आत्मचिंतन करणाऱ्या माणसाला इतर काही शिकवण्याची क्वचितच गरज भासत असेल. वेद हे अपौरुषेय आहेत, हे ही त्या मागचं एक कारण असू शकतं. याही अर्थाने ईश्वर हा मानवी मनाचा प्रवक्ता आहे, कर्ता नव्हेच.
निरनिराळ्या देवता – मान्यता – श्रद्धा या सामाजिक एकीकरणाच्या दृष्टीने अद्वैतवादाच्या एकखांबी तंबूखाली येऊन विसावतात. त्याची सश्रद्ध अनुभूती आपल्याला अक्षर पुरुषसूक्तात येते.
गणपती ही देवता ऋग्वेदकालात होती की नव्हती याबद्दलही बरेच वाद आहेत. ऋग्वेदातील आठव्या मंडळातील ८१ व्या सूक्तात गणपतीच्या बाह्यरुपाचे वर्णन आहे. सुरुवातीला इंद्र हे सर्वनाम (श्रेष्ठ) या अर्थाने आढळते. यात म्हटले आहे की रिद्धी – सिद्धी आणि बुद्धी यांचा अधिपती तो गणपती. इंद्राचा डावा – उजवा हात ही गणपतीची डावी किंवा उजवी सोंड असा निर्देश आहे.
सुभाषितं ही आपल्याला ऋग्वेदाची अमूल्य अशी देण आहे. प्रथम ओळीत एखादे मूल्य अथवा सत्य मांडणे व दुसऱ्या ओळीत त्याचे उदाहरण देणे,अशी बहुतेक सुभाषितांची रचना असते. सुभाषितं ही व्यवहारी शहाणपणा व ज्ञानाचा आदर्श परिपाठ आहेत. संस्कृत भाषेतील सुभाषितं ही प्राचीन साहित्याचा मनोरंजक व मार्गदर्शक विभाग आहे
आत्मानुभव सूक्त हे देखील असीम शांतता मिळवून देणारे आहे. स्वतःला जाणणे म्हणजेच आत्मानुभव. प्रत्येक सजीव व निर्जीवात एक जागृत असे आत्मतत्त्व असते. त्या अमर आत्मतत्त्वाचा अनुभव घेणे म्हणजेच आत्मानुभव. सृष्टीची उत्पत्ती, परमेश्वराचे स्वरूप आणि सामर्थ्य, सृष्टीचे मूल, आत्मा, चैतन्य आणि अचेतन सृष्टीतील गूढ तत्वांचे विवेचन या सूक्तात आढळते.
महामृत्युंजय म्हणजे त्र्यंबकेश्वर. तीन दिवस उपवास करून दुधात भिजवलेल्या भाताच्या शताहुती शिवास वाहतात. महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली असून याला रुद्रमंत्र व मृत संजीवनी मंत्र असेही म्हणतात. त्र्यंबकम मंत्र हा शिवाचे त्रिनेत्र दर्शवतो. महामृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणे. त्यामुळे दीर्घायुष्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे.
दानव, असुर, पिशाच,यक्ष, राक्षस या सर्वांचा मिळून एक राक्षससंघ वैदिक काळात मानला जात होता. वैदिक साहित्यात ‘रक्षस्’ शब्द आलेला असून त्यापासून राक्षस हा शब्द आला. राक्षस ही मायावी, अद्भुत, कपटी, मांसभक्षक, जादूटोणा करणारी, ज्ञानी लोकांचा व यज्ञयागांचा द्वेष करणारी जमात म्हणून ओळखली जाते. राक्षस हे दिवसा निष्क्रिय तर रात्री क्रियाशील असतात. पुलस्त्यापासून राक्षस उत्पन्न झाले. ब्रह्मदेवाने भूतलावरील जलाच्या रक्षणार्थ राक्षसांना निर्मिले अशा कथाही आहेत. कश्यपानंतर ब्रह्मधनेपासून ब्रह्मराक्षस वंश प्रवर्तित झाला असे म्हटले आहे. पुढे आर्य व राक्षस या दोन संस्कृतींचा समन्वय होत गेल्याचे निदर्शनास येते. आर्य व राक्षस यांच्या चालीरीती व सामाजिक व्यवहार यात साम्य तसेच भिन्नताही होती. राक्षसांचा वंश मातेवरून चालत असे. पळवून आणलेल्या स्त्रियांशी विवाह करण्याची प्रथा राक्षसांत होती. त्यावरून मनुस्मृतीत राक्षस विवाहाचा संदर्भ आला असावा. त्यांचे विवाह अग्नीच्या साक्षीनेच होत. कदाचित राक्षस ही आर्यांचीच एक शाखा असावी जी कालांतराने दक्षिण भारतात स्थिरावली व तिने आपले वैभवशाली राज्य व संस्कृती निर्माण केली. (रावण व त्याची लंका) निरनिराळ्या प्रचंड वास्तूंशी राक्षसांचा संबंध जोडलेला दिसतो. हेमाडपंथी देवालयांसाठी ज्या अतिप्रचंड शीलांचा वापर होतो त्यावरून हे काम राक्षसांनी केले असावे, अशी समजूत होती. ऋग्वेदात मृत्यू देवता निऋऀत्ती ही राक्षस मानली जाते. ऋग्वेदातही तंत्रविद्या, भानामती,जारणमारण यासंबंधी अभिचार सूक्ते आहेत. ह्या वाममार्गालाच अभिचार योग असेही म्हणतात. (याचाही प्रभाव बुद्ध धर्मावर प्रकटपणे दिसून येतो.) ऋग्वेदकाल ते आजपर्यंतच्या काळात राक्षस जमात देखील किती उत्क्रांत होत गेली ते आपण बघतोच आहे. मुख्य म्हणजे त्यात जात-पात, वंश-वर्णभेद असा कसलाही दावा नाही.
सत्व रज तम हे गुण व त्यांची प्रतिकात्मक रूपं ही आपल्याला प्राचीन ग्रंथांमध्येही दिसून येतात. प्रत्येक व्यक्ती ही त्रिगुणात्मक असते. त्या गुणांचे नियमन व त्यांना व्यक्तिगत व जीवनोपयोगी तत्त्वांत परावर्तित कसे करावे, हे ही भगवद्गीतेसारखे महान ग्रंथ सांगतात. उपनिषदांसारखे ग्रंथ जीवन मृत्यु विषयक संकल्पना, गुंतागुंतीची उकल सोप्या शब्दात सांगतात. वैदिक कालापासून चालत आलेलं हे चिंतन एखाद्या सावलीसारखं इतकं आपल्या मागोमाग, अन हातात हात घालून चालत आलेलं असतं, की आज नाही तर एक दिवस आपण अपूर्णातून पूर्ण व शून्यातून शून्य हे ध्येय गाठू शकू, इतपत आपणही धडपडत राहतो, सश्रद्ध होऊन जातो.
आपल्यालाही उमगत जातं की, One that had granted us the Bliss of Ignorance, also acquires the Power to grant us the Strength to bear the Complete Knowledge…making us humble enough to believe that, “I know, that I do not know anything; yet not Insignificant in any way..”
ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।
लेखिका : सुश्री केतकी कानिटकर
संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈