श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “शत्रूचं आभाळ झाकोळून टाकणारा मेघ !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
— लेफ्टनंट कर्नल मेघ सिंग राठौर ! पॅरा एस.एफ.!
नकळत काही अपराध घडल्यामुळे देवलोकातून शाप दिला जाऊन मृत्यूलोकात ढकलल्या गेलेल्या आणि शापाचा कालावधी आणि नेमून दिलेलं कर्म पूर्ण केल्यानंतर पुन्हा देवलोकात सन्मानाने प्रवेश दिल्या गेलेल्या गंधर्वांच्या कथा आपण ऐकल्या असतीलच !
मृत्यूलोकातल्या अशाच एका आधुनिक गंधर्वाची ही रोमांचकारी कथा. त्यांचं नाव मेघ सिंग….
मेघ सिंग राठौर……एक पक्का राजस्थानी राजपूत लढवय्या ! जन्म मार्च १९२२, म्हणजे आजपासून शंभर वर्षांपूर्वीचा. मेघ सिंग तारुण्यात पदार्पण करताच सेनेत भरती झाले. तो काळ ब्रिटिश राजवटीचा. दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांच्या फौजेत असताना ‘गनिमी कावा’ पद्धतीने लढून जपान्यांच्या सैन्याला नाकी नऊ आणण्याचा, जखमी होण्याचा, युद्धबंदी बनून दिवस काढण्याचा मोठा अनुभव गाठीशी बांधून, पुढे स्वातंत्र्यानंतर मेघ सिंग अर्थातच भारतीय सेनेत अधिकारी बनले. कालांतराने लेफ्टनंट कर्नल हुद्द्यावर असताना एका बटालियनचे नेतृत्व करते झाले.
लष्करी भाषेत एखादा अधिकारी एखाद्या अपराधाबद्दल चौकशीच्या फेऱ्यात अडकला की त्याला ‘to come under cloud’ असं म्हटलं जातं. साहेबांचं नाव मेघ, आणि त्यांच्या बाबतीत वापरल्या गेलेल्या इंग्लिश वाकप्रचारातील शब्द ‘क्लाऊड’ म्हणजेही मेघ (ढग) हा एक योगायोगच म्हणायचा !
लष्करी न्यायालयाने लेफ्टनंट कर्नल या हुद्द्यावरून मेघ सिंग साहेबांचा हुद्दा मेजर असा केला…. शिक्षा म्हणून. आणि त्यांना एका लष्करी प्रशिक्षण संस्थेत नियुक्तीवर धाडले. वर्ष होते १९६५.
१९६२ मध्ये चीनकडून प्रचंड फसवणूक आणि लाजीरवाणा पराभव पत्करल्याने भारतीय सैन्याचे मनोधैर्य काहीसे खचलेले होते. याचा फायदा घेऊन पाकिस्तानने, १९४७ मध्ये वेषांतर करून कश्मिरमध्ये आक्रमण केले होते, तसेच पण उघड आक्रमण करण्याचे धारिष्ट्य केले. चवताळलेल्या भारतीय सैन्याने अनेक आघाड्यांवर पाकड्यांवर कुरघोडी करत आणली होती. परंतू काही ठिकाणी ते आपल्याला वरचढ होऊ पहात होते. भारताचा सर्वथैव अविभाज्य भाग असलेलं कश्मीर हातून निसटतं की काय अशी शंका निर्माण व्हावी, अशी विषम परिस्थिती निर्माण झाली होती. अर्थात सैन्य असं काहीही होऊ देणार नव्हतं !
पण आपण पारंपारिक पद्धतीने युद्ध करीत होतो. शत्रू आपल्या हद्दीत आला की त्याला त्याच्या सीमेत पिटाळून लावायचे. शत्रू आपल्या हद्दीत घुसण्याच्या तयारीत असताना त्याला त्याच्याच प्रदेशात घुसून आधीच नेस्तनाबूत करण्याची अतिप्राचीन युद्धनीती आपण बहुदा बाजूला ठेवली होती. कश्मिरच्या मोर्चावर सेनेचे नेतृत्व करीत असलेले लेफ्टनंट जनरल हरबक्षसिंग साहेब हे आधुनिक विचार, नवीन युद्धनीती या अपरंपरागत बाबींच्या विरोधात अजिबात नव्हते. त्यासाठी ते गरज पडली तर व्यवस्थेच्या विरूद्ध जाऊनही निर्णय घेण्याच्या पक्षात होते.
पदावनत करण्यात आलेल्या आणि अगदी सेनेतून स्वेच्छानिवृत्ती पत्करावी अशा निर्णयाप्रत आलेल्या आपल्या ह्या कथानायकास, मेजर मेघसिंग साहेबांना, युद्धाची परिस्थिती पाहून प्रशिक्षण संस्थेतून पुन्हा युद्धभूमीवर जाण्याचे आदेश प्राप्त झाले ! एका सैनिकास आणखी काय पाहिजे असते? मेजर मेघ सिंग साहेब थेट लेफ्टनंट जनरल हरबक्षसिंग साहेबांना भेटले आणि आपण पाकिस्तानात घुसून, आपल्या सीमेत घुसलेल्या त्यांच्या सैन्याच्या मागे जाऊन त्यांच्यावर प्रतिआक्रमण करण्याचा विचार मांडला. आणि हे काम मी करतो, मला त्याचा पुरेसा अनुभव आहे, असे पटवून दिले…
मेघसिंग साहेबांचा सैनिकी इतिहास ठाऊक असलेल्या हरबक्षसिंग साहेबांनी त्वरित तशी व्यवस्था केली. आणि यासाठी त्यांनी शासकीय परवानगी घेण्याची औपचारिकता विचारात घेतली नाही. तेव्हढा वेळही नव्हता. आणि आपण आक्रमण करायचे नाही, या आपल्या राष्ट्राच्या सर्वसामान्य विचारप्रणालीच्या ते विरुद्ध समजले जाण्याचीही शक्यता होतीच.
हरबक्षसिंग साहेबांनी मेघसिंग साहेबांना सांगितलं होतं, ” यशस्वी होऊन आलात तर मी माझ्या हातांनी तुमच्या खांद्यावर तुमच्या बढतीच्या हुद्द्याचं पदक लावेन !”
अपमानाचा डाग धुऊन काढण्याची आंतरीक इच्छा असलेला सच्चा सैनिक ही संधी कशी सोडेल? मेघ सिंग साहेबांच्या अंगी आता दहा हत्तीचं बळ एकवटलं. त्यांनी भारतीय सैन्याच्या पायदळातून त्यांना हवी तशी माणसं काळजीपूर्वक निवडून घेतली, त्यांना केवळ एक दोन आठवड्याचं प्रशिक्षण दिलं. हे प्रशिक्षण जरी कमी कालावधीचं वाटत असलं तरी शत्रू प्रदेशात हलक्या पावलांनी घुसून प्रचंड विध्वंस घडवून आणण्याचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या माणसाकडून दिले गेले होते, हे विसरता कामा नये !
या सैनिकांच्या जथ्याला एक अनौपचारीक नाव दिले गेले…. ‘मेघदूत फोर्स !’ मेघ सिंग साहेबांची मेघदूत सेना ! या सेनेच्या बहाद्दर जवानांनी पाकिस्तानी प्रदेशात खोलवर घुसून त्यांच्या अनेक लष्करी महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करून त्यांचे प्रचंड नुकसान केले. मागून अचानक आणि अगदी अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सेनेचे धाबे दणाणून गेले होते. असे एक नव्हे तर तीन यशस्वी हल्ले या ‘मेघ’दूतांनी केले. पाकिस्तानचे अवघे आकाश या मेघांनी काळवंडून टाकले होते !
आणि विशेष म्हणजे स्वत:चे फारसे नुकसान होऊ न देता.
कामगिरी यशस्वी करून मेघसिंग साहेब मेघदूतांसह परतले… पण काहीसे लंगडत. त्यांच्या मांडीमध्ये शत्रूच्या सैनिकाची गोळी घुसून आरपार गेली होती. पण त्या जखमेची त्यांना तमा नव्हती….. दिलेली कामगिरी पूर्णत्वास नेल्याचं खास सैनिकी समाधान त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं !
पदमभूषण,वीर चक्र विजेते, जनरल ऑफिसर इन कमांड (वेस्टर्न कमांड १९६५) लेफ्टनंट जनरल हरबक्षसिंग साहेबांनी आपल्या या बहादूराच्या खांद्यावर लेफ्टनंट कर्नलचं चिन्ह स्वत:च्या हातांनी लावलं….. गंधर्व पुन्हा देवलोकात परतला होता… ताठ मानेने !
मेघदूतांसारखा आपला असा अधिकृत सैन्यविभाग असावा, ही गोष्ट देशाचा सैन्य कारभार चालवणाऱ्यांच्या लक्षात आली. असा विभाग निर्माण करण्याचं उत्तरदायित्व अर्थातच लेफ्टनंट कर्नल मेघसिंग साहेबांच्याकडे आले… आणि त्यांनी ते निभावले सुद्धा !
१ जुलै १९६६ रोजी ‘नाईन पॅरा स्पेशल फोर्स’ हा विभाग अधिकृतरित्या भारतीय लष्कराचा एक अपार महत्त्वाचा भाग बनला. पॅरा म्हणजे पॅराट्रूपर्स अर्थात हवाई मार्गाने शत्रूप्रदेशात उतरणारे सैनिक ! या विभागात भारतीय सैन्यातील अपार शौर्य गाजवण्याची महत्त्वाकांक्षा असलेले सैनिक स्वयंस्फूर्तीने प्रशिक्षणास येतात. या सैनिकांना नव्वद दिवसांच्या कठोरतम अग्निपरीक्षेस सामोरे जावे लागते ! या सैनिकांचे आणि अधिका-यांचे सर्व हुद्दे काढून त्यांना प्रशिक्षणार्थींचा दर्जा दिला जातो. हे सर्व पूर्वप्रशिक्षित आणि अगदी तयार सैनिक असतात हे लक्षात घेतले पाहिजे ! परंतू यातील केवळ पंधरा ते वीस टक्के लोकच अग्निपरीक्षेत उत्तीर्ण होतात.. यावरून पॅरा एस.एफ. च्या प्रशिक्षणाची काठिण्य पातळी ध्यानात यावी !
पहिले पस्तीस दिवस शारीरिक आणि कौशल्य प्रशिक्षण, यात तासनतासांचा शारीरिक व्यायामाचा, डोळ्यांवर पट्टी बांधून विविध प्रशिक्षणे घेण्याचा, हत्यारे चालवण्याचा, एखादे ठिकाण नष्ट करण्याचा सराव करण्याचा, अनोळखी प्रदेशातून, जंगलातून माग काढण्याचे प्रशिक्षण घेण्याचा, विषारी प्राणी हाताळण्याचे प्रशिक्षण, वैद्यकीय ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या, अन्न शिजवण्याच्या शिक्षणाचा आणि इतर कित्येक बाबींचा समावेश असतो. सलग चार दिवस पूर्ण उपाशी राहणे, तीन दिवसांत फक्त एक लिटर पाणी पिणे, आणि सलग सात दिवस अजिबात न झोपणे या गोष्टी अनिवार्य असतात. दहा किलो वजनाची वाळू भरलेली बॅग सतत शरीरावर बांधलेली असते या काळात. सर्व युद्धसाहित्य अंगावर घेऊन दहा, वीस, तीस आणि चाळीस किलोमीटर्स मार्चिंग करीत चालणे हे तर असतेच.
विमानातून, हेलिकॉप्टरमधून दिवसा आणि रात्रीच्या वेळी किमान पन्नास वेळा अचूक उडी मारण्याचे प्रशिक्षण तर अत्यावश्यकच. युद्धाच्या साहित्यासह एकूण सत्तर किलोचे वजन घेऊन दहा किलोमीटर्स वेगाने चालणे ही असतेच. आपल्या सहकारी सैनिकास आपल्या खांद्यावर सलग कित्येक किलोमीटर्स वाहून घेऊन जाणे आहेच. सलग छत्तीस तासांची शारीरिक, मानसिक क्षमता चाचणी घेतली जाते. चाळीस ते ऐंशी किलो वजनाच्या वस्तू एका ठिकाणाहून उचलून विशिष्ट ठिकाणापर्यंत घेऊन जाव्या लागतात. पाण्यात बुडी घेऊन कित्येक मिनिटे श्वास रोखून धरावा लागतो, हात मागे बांधून पाण्याखाली खेचले जाते. यापैकी सोळा तासाच्या प्रशिक्षणात अन्नाचा एक कण, पाण्याचा एक थेंबही दिला जात नाही.
अशा स्थितीत स्मरण चाचण्या, परिसराचा शोध घेण्याच्या क्षमतेच्या चाचण्या घेतल्या जातात ! त्यानंतर पुन्हा दहा किलोमीटर्स वेगाने चालणे आणि त्यानंतर सहा तास सलग व्यायाम ! शेवटी शत्रूवर लपून हल्ला करणे, इतरांनी लपून अचानक केलेल्या हल्ल्याला प्रतित्युत्तर देणे, छावण्या उभारणे, जखमी सैनिकांसाठी स्ट्रेचर्स तयार करणे, जखमी सैनिकांना सुखरूप हलवणे इत्यादी क्षमता तपासल्या जातात…. आणि हे कधी तर ….सैनिक गेली सलग कित्येक तास अजिबात झोपलेले नाहीत अशा स्थितीत !
अखेरच्या सत्रात दहा किलो युद्धसाहित्य, सात किलो वजनाची शस्त्रे घेऊन डोंगर, टेकड्यांतून, जंगलातून शंभर किलोमीटर्स धावणे…… याला तेरा ते पंधरा तास लागू शकतात ! या दरम्यान उंचावरच्या ठिकाणी लढण्याचे प्रशिक्षण तर असतेच असते. या सर्वांत टिकून राहिलेल्या सैनिकांना मग शेवटच्या टप्प्यात अतिरेकी विरोधी युद्धाचे अत्यंत खडतर प्रशिक्षण दिले जाते !…… नव्वद दिवस आगीच्या अंगाखांद्यावर खेळलेले हे सैनिकी सोनं शेवटी काय रूप घेऊन बाहेर येत असेल? केवळ अतुलनीय ! केवळ अवर्णनीय ! केवळ शब्दातीत !
असे असतात आपले पॅरा एस.एफ.चे जवान…. भारताच्या सार्वभौमत्वाचे संरक्षक ! कमीत कमी माणसांत जास्तीत जास्त मोठं आणि यशस्वी कामगिरी असे ध्येय बाळगणारे! आपल्या बडी वर, अर्थात सहकाऱ्यावर जीव ओवाळून टाकणारे, ‘हू केअर्स हू विन्स…’ म्हणजे कोण जिंकतंय याची तमा न बाळगता फक्त प्राणपणाने लढणारे! कुणी धर्म आणि जात विचारता, “पॅरा एस.एफ.” असं उत्तर देणारे ! या आणि अशा वीरांमुळेच भारत इतक्या आव्हानांना तोंड देऊनही सुरक्षित आहे!
हा अलौकीक सैन्यविभाग निर्माण करणाऱ्या वीरचक्र विजेत्या लेफ्टनंट कर्नल मेघ सिंग साहेबांना मानाचा मुजरा! २०१० मध्ये हा मेघ काळाच्या आभाळात अंतर्धान पावला!
या विभागाचे पहिले प्रमुख लेफ्टनंट जनरल हरबक्षसिंग साहेबांना वंदन ! एक जुलै या स्थापनादिनाच्या निमित्ताने देशभरातील सर्व पॅरा युनिट्सना कडक सॅल्यूट आणि ….
…… जय् हिंद ! 🇮🇳
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈