श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “जाणून घेऊ अवयवदान…” ☆ श्री सुनील देशपांडे

(या वर्षीपासून तीन ऑगस्ट हा राष्ट्रीय अवयवदान दिन म्हणून पाळावा असे केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने आवाहन केले आहे. त्यासाठी नेत्रदान, त्वचा दान, देहदान व अवयवदान याविषयी शक्य तितक्या सोप्या भाषेत या विषयाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठीचा हा प्रयत्न आहे.)

प्रथम हे जाणून घेतले पाहिजे की अवयवदान आणि देहदान असे या विषयाचे दोन भाग आहेत. अवयवदान आणि देहदान हे विषय एकमेकांपासून वेगळे आहेत. जेव्हा आपण अवयवदान करतो तेव्हा देहदान होऊ शकत नाही आणि जेव्हा देहदान करतो तेव्हा शरीराच्या अंतर्गत अवयवांचे अवयवदान होऊ शकत नाही. मुळातच देहदान आणि अवयवदान या दोन वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये करण्याच्या गोष्टी आहेत. अवयवदान हे एखादी व्यक्ती जिवंतपणी काही मर्यादित स्वरूपात व मेंदू मृत झाल्यानंतर विस्तृत स्वरूपात करू शकते.  देहदान हे नैसर्गिक मृत्यूनंतर म्हणजेच हृदयक्रिया बंद पडून झालेल्या मृत्यू नंतर करता येते.  अशावेळी देहदान करण्यासाठी देह वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यूनंतर सहा तासांच्या आत पोहोचवावा लागतो. तत्पूर्वी फक्त नेत्रदान आणि त्वचादान होऊ शकते.  अवयवदानाच्या बाबतीत मात्र अवयवदान हे जिवंतपणी आणि मेंदूमृत अशा दोन्ही परिस्थितीत होऊ शकते. याबाबत आपण विस्तृत पणाने जाणून घेऊया. 

जिवंतपणी कोणतीही व्यक्ती आपल्या जवळच्या नातेवाईकांना काही अवयवांचे दान करू शकते ते अवयव म्हणजे

१) दोन पैकी एक किडनी म्हणजेच मूत्रपिंड.  

२) लिव्हरचा म्हणजेच  यकृताचा काही भाग.  

३) फुफ्फुसाचा काही भाग, 

४) स्वादुपिंडाचा काही भाग,

५) आतड्याचा काही भाग.

६) गर्भाशय

कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य एका किडनी वर म्हणजेच मूत्रपिंडावर व्यवस्थित व्यतीत होऊ शकते. त्यामुळे एक किडनी दान केल्याने त्याला कोणताही शारीरिक धोका संभवत नाही.  त्याच प्रमाणे इतर ज्या अवयवांचे काही भाग आपण दुसऱ्या शरीरात प्रत्यारोपित करतो ते अवयव दोन्ही शरीरात काही कालावधीनंतर पूर्ण आकार धारण करून संपूर्ण पणे कार्यरत होतात.  तशी शक्यता असेल तरच डॉक्टर अशा अवयवांचा काही भाग काढून घेण्यास मान्यता देतात. त्यामुळे एखाद्याच्या शरीरातून असे काही भाग काढून घेतल्यास त्याला पुढील आयुष्यात कोणताही शारीरिक धोका संभवत नाही. 

एखाद्या स्त्रीचे गर्भाशय चांगल्या रीतीने कार्यरत असून त्या स्त्रीला पुढे मूल नको असल्यास त्या स्त्रीच्या शरीरातून गर्भाशय काढून ज्या स्त्रीच्या शरीरात गर्भाशय नाही किंवा असलेले गर्भाशय नीट कार्यरत होऊ शकत नाही अशा स्त्रीच्या शरीरात ते प्रत्यारोपित करता येते व त्यामुळे त्या स्त्रीला मूल होऊ शकते.

जिवंतपणी वरील प्रमाणे सर्व अवयव दान करून गरजू रुग्णाच्या आयुष्यात आनंद फुलवता येतो आणि दात्याला कोणताही शारीरिक धोका नसतो हे जाणून घेतले पाहिजे.

मृत्यूनंतर म्हणजेच ब्रेनडेड किंवा मेंदू मृत्यू नंतर. ( याला मस्तिष्क स्तंभ मृत्यू असेही म्हणतात)  हा मृत्यू कसा होतो आणि कोणत्या परिस्थितीत होतो हे जाणून घेणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मेंदू कार्य करणे बंद होते किंवा अपघातामुळे मेंदूला मार लागल्यावर मेंदूचे कार्य थांबते.  किंवा मेंदूच्या खालच्या बाजूला मानेच्या पाठीमागे मस्तिष्क स्तंभ म्हणजेच ब्रेन स्टेम हा जो भाग असतो याला मार लागल्याने त्याचे कार्य बंद होते अशावेळी होणारा मृत्यू यास मेंदू मृत्यू किंवा मस्तिष्क स्तंभ मृत्यू असे म्हणतात.  हा मृत्यू झाला हे कोणत्या परिस्थितीत समजते ते जाणणे आवश्यक आहे.  मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊ लागल्यानंतर प्रचंड डोके दुखू लागते. कधी कधी या डोकेदुखीने पेशंट बेशुद्धावस्थेत जातो, किंवा अपघातामुळे एखाद्याचे मेंदूला किंवा मेंदू स्तंभाला मार लागतो.  या सर्व परिस्थितीत त्या रुग्णास त्वरित रुग्णालयात दाखल केले गेल्यास रुग्णालयामध्ये त्याला अतिदक्षता विभागात नेतात आणि व्हेंटिलेटरच्या सहाय्याने त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात येतो. अशा वेळेला जर डॉक्टरांच्या लक्षात आले आणि जर काही विशिष्ट परीक्षणानंतर याची खात्री झाली की त्या व्यक्तीचा मेंदू किंवा मस्तिष्क स्तंभ कार्य करण्याचे पूर्णपणे थांबला आहे, तर त्या रुग्णाला मेंदू मृत असे घोषित करण्यात येते.  मेंदू मृत म्हणजे मृत्यूच असतो..  तो अंतिम मृत्यूच होय. जरी कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या साह्याने  रुग्णाच्या छातीची धडधड चालू असेल तरीही वेंटीलेटर काढल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू शंभर टक्के निश्चित असतो.  अशा रुग्णाला मेंदूमृत म्हणतात.  म्हणजे मेंदूमृत रुग्ण हा नेहमी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात व व्हेंटिलेटरवर असतो.  विशिष्ट परीक्षणांद्वारे त्याचा मेंदू पूर्णपणाने कार्य करण्याचे थांबलेला आहे हे निश्चित करता येते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.  त्यावेळेला त्या रुग्णाच्या शरीरातील आठ ते नऊ अवयव एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी प्रत्यारोपित करता येतात.  

सुमारे चाळीस ते पन्नास अवयव हे एखाद्या रुग्णाच्या आयुष्यात त्याच्या अवयवाची कमी झालेली कार्यक्षमता वाढविण्यासाठी अथवा अवयवांमधे निर्माण झालेले दोष दूर  करण्यासाठी प्रत्यारोपित करता येतात. त्यात प्रामुख्याने पुढील अवयवांचा समावेश होतो……. 

दोन मूत्रपिंडे, यकृत, हृदय, दोन फुफ्फुसे, स्वादुपिंड, आतडी,  नेत्र. काही अवयव दुसऱ्या रुग्णाच्या शरीरातील दोष दूर करण्यासाठी उपयोगी पडतात, उदाहरणार्थ हात (मेंदू मृत रुग्णाचे हात एखाद्या व्यक्तीच्या तुटलेल्या हातांच्या जागी प्रत्यारोपित करून नैसर्गिक हातांसारखे कार्य करू शकतात) गर्भाशय, कानाचे पडदे, हाडे, कूर्च्या, झडपा वगैरे.  

वरील विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की कोणत्याही प्रकारे व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे अवयव किंवा मृतदेह यांचा मानवी कल्याणासाठी उपयोग करता येतो.  त्यामुळे प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी विशेषत: वारस नातेवाईकांनी जर अवयवदान/ देहदान यास संमती दिली, तर अनेक रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो. आपल्या देशात दरवर्षी पाच लाख रुग्णांचा मृत्यू हा त्यांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध न झाल्याने होत असतो.  यातले कित्येक मृत्यू आपण फक्त आपल्या संकल्पाने आणि आपल्या वारस नातेवाईक यांनी केलेल्या संकल्पपूर्तीने आपण वाचवू शकतो.  

आज आपण अवयवदान / देहदानाचा संकल्प करूया आणि या संकल्पाची माहिती आपल्या कुटुंबियांना देऊन त्यांनाही या कार्यात सहभागी करून घेऊया.   या माणुसकीच्या कार्यासाठी आपल्याला सजग राहता येईल आणि अनेकांचे प्राण वाचवले याचे पुण्य पदरी पाडून घेता येईल. दरवर्षी येणारा हा ‘अवयवदान दिन ‘ ही त्याची सुरुवात करण्याची नांदी ठरावी.  ज्यांनी असे संकल्प केले नाहीत त्यांनी त्याची सुरुवात करावी, ज्यांनी केले आहेत त्यांनी हा विचार आपल्या कुटुंबात, नातेवाईकांमध्ये  व सर्व समाजात पसरवून त्यांचे प्रबोधन करावे. हे आवाहन माणुसकी असणाऱ्या प्रत्येक सजग नागरिकास मी करीत आहे.

(अवयवदानाचा संकल्प नोटो या केंद्र सरकारच्या संस्थेच्या वेबसाइटवर जाऊन अवयवदानाचा फॉर्म भरून करता येतो. त्यांच्या वेबसाईटचा पत्ता पुढील प्रमाणे :  www.notto.gov.in तसेच देहदानाचा संकल्प करण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागाकडून देहदानाचे संकल्पपत्र उपलब्ध होऊ शकते.  वैद्यकीय महाविद्यालयांच्या वेबसाइटवरही असे संकल्प पत्र उपलब्ध होऊ शकेल.  ते संकल्पपत्र भरून आपण देहदानाचा ही संकल्प करू शकता.  त्याचप्रमाणे कोणत्याही नेत्रपेढी मार्फत नेत्रदानाचे संकल्प पत्र उपलब्ध होऊ शकते.)

© श्री सुनील देशपांडे

  • माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन (ऑर्गन डोनेशन) रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०.
  • उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई.
  • संचालक, मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन, नाशिक.
  • सदस्य, मानवी अवयव प्रत्यारोपण प्राधिकार समिती (महाराष्ट्र शासन)

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments