मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆  स्टोव्ह ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ स्टोव्ह  ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆ 

स्टोव्ह मध्ये राॅकेल भरायला नरसाळे, पत्र्याची नळी असलेला पंप,पुढे काही वर्षांनी प्लॅस्टिकचा फुग्याचा व काॅक असलेला पंप आल्यावरचा आनंद विसरणे शक्य आहे का ? 

जमिनीवर थोडेफार सांडलेल्या राॅकेलचा वास अजूनही चांगला आठवतो आहे.

स्वयंपाक करताना अन्नाला राॅकेलचा वास येऊ नये म्हणून घेतलेली काळजी.

आईचे आपल्या कुटुंबावर किती प्रेम आहे, हे आता जाणवते.

स्टोव्ह पेटवण्यासाठी काकडा व तो बुडवण्यासाठी बिटको काला दंत मंजन च्या छोट्या रिकाम्या झालेल्या काचेच्या बाटलीत राॅकेल भरून ठेवायचे. 

काडेपेटी व ती ठेवण्यासाठी हिंगाची रिकामी झालेली पत्र्याची डबी असा सगळा थाट असायचा. 

पीन करणे एक कौशल्याचे काम होते. हात अगदी सरळ धरून. पीन वाकडी होणार नाही याची काळजी घ्यावी लागत असे जर पीन निपलमधे तुटली तर सगळाच खोळंबा व्हायचा. त्याकरीता निप्पल पाना, सायकलची तार, कातडी वायसर इत्यादी हत्यारे घरीच ठेवलेली असायची. 

स्टोव्हची टाकी गळत असेल तर तिथे लावण्यासाठी  501 नं.चा साबण बार. 

स्टोव्ह बिघडल्यावर घरातली होणारी चिडचिड तर विचारूच नका आणि दुरूस्त करून आणल्यावर आईची प्रसन्न मुद्रा, ओसंडून वाहणारा आनंद पाहिला की घरातली माणसे अगदी खूष व्हायची. 

स्वयंपाक झाल्यावर आईने सोडलेला सुस्कारा जितका मनाला शांत करतो ना अगदी तसाच शांतपणा स्टोव्हची चावी सोडल्यावर येणारा स्सूsssssss आवाजही खूप मनाला प्रसन्न करणारा होता.

मित्रांनो कोणाकोणाच्या आठवणी जाग्या झाल्या?

 

संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈